Thursday, April 29, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 181

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 181*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/04/181.html


भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील पहिलं शतक झळकावणाऱ्या आणि भारताला पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवून देणाऱ्या एका जिगरबाज कर्णधाराची ही प्रेरणादायी कथा...

11 सप्टेंबर 1911 रोजी पंजाबच्या कपूरथला राज्यात नैनिकचा जन्म झाला. त्याला बालपणापासून क्रिकेटची खूप आवड. त्यानं याचं खेळात आपलं भवितव्य घडविण्याचा निर्णय घेतला आणि झपाटून खेळायला सुरुवात केली. शालेय क्रिकेटमध्ये नैनिकनं जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करून, अनेकांची मनं जिंकली. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी तर केलीच शिवाय, भारतीय कसोटी संघाचे दरवाजेही खुले केले. 

1933 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी नैनिकने इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. या सामन्यात त्याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यातील दुसऱ्या डावात 118 धावांची खेळी करून, भारतासाठी पहिले कसोटी शतक झळकावले आणि एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.

1936 साली विजयनगर चे महाराज 'विज़ी' यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. 'विज़ी' यांनी या दौऱ्यात नैनिकला दुय्यम वागणूक दिली. त्यांनी नैनिकला योग्यवेळी फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची संधी दिली नाही. यामुळे नैनिकला राग अनावर झाला. त्याने संघाच्या कर्णधारसोबत वाद घातला. हा वाद इतका टोकाला गेला कि, नैनिकला थेट घरचा रस्ता दाखविण्यात आला. 

मायदेशी परतल्यानंतर नैनिकने स्वतःला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये झोकून दिले. उत्तम कामगिरी करून 10 हजार धावांचा टप्पा पार केला. या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर तब्बल दहा वर्षानंतर त्याची पुन्हा निवड भारतीय संघात झाली. भारत स्वतंत्र झाला आणि अशातच भारतीय कसोटी संघाची धुरा नैनिकच्या खांद्यावर आली. स्वतंत्र भारताचा, कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नैनिक ओळखला जाऊ लागला. भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील पहिलं शतक झळकावणारा, स्वतंत्र भारताचा पहिला कसोटी कर्णधार असणारा 'नैनिक म्हणजेच लाला अमरनाथ' होय.  

अन्याय सहन न करता, त्या विरोधात बंड केले पाहिजे. असे केले नाही तर, थंड होण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. लाला अमरनाथ यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वेळीच आळा घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून त्यांना दहा वर्षे दूर राहावे लागले असले तरी, त्यांना आज एक स्वाभिमानी खेळाडू म्हणून ओळखले जाते. 'विजी' यांच्या विरोधात बंड करून, मायदेशी परतल्यावर त्याच्या स्वागतासाठी शेकडो प्रेमी आले होते. एकंदर काय ? तुमच्या ध्येयाच्या वाटेत आडव्या येणाऱ्या प्रत्येक संकटाशी तुम्हांला बंड करावेच लागेल. अन्यथा ही संकटं तुम्हांला नामोहरण केल्याशिवाय राहणार नाहीत. 

लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी सामना तर जिंकलाच शिवाय, पहिली कसोटी मालिकाही आपल्या खिशात टाकली. क्रिकेटमधील त्यांच्या सेवेबद्दल 1991 मध्ये त्यांना भारत सरकारने 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 


*कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*



No comments: