Sunday, November 18, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 57

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 57*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*तिला बाईक्स ची खुप आवड. या बाईक्स च्या आवडीमुळेच तिचा प्रेमविवाह सैन्य दलातील एक कर्नलशी झाला. त्यांच्या संसाराच्या वेलीवर दोन फुले उमलली होती. सर्व काही उत्तम चाललं होतं. अचानक तिच्या आयुष्यात अशी घटना घडली कि, ती वयाच्या तिसाव्या वर्षी अपंग झाली. काय घडले असावे ? तिला अपंगत्व का आले असावे? तिच्या पुढच्या आयुष्यात काय घडले असेल?? जाणून घेऊ आजच्या भागात..*

ती एका सैन्य अधिकाऱ्याची मुलगी. 30 सप्टेंबर 1970 चा तिचा जन्म. कर्नल विक्रम सिंह यांच्यासोबत तिचा प्रेमविवाह झाला.

1999 चा काळ. तिच्या सुखी संसारात आता दोन मुली आल्या होत्या. तिचे पती कारगिल युद्धात सहभागी झालेले होते. अचानक तिला पाठीच्या दुखण्याचा त्रास सुरु झाला. तिला पाठीचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. तिकडे नवरा भारतमातेसाठी, देशासाठी सीमेवर लढत होता आणि इकडे ही दोन मुलींची आई आपल्या चिमुकल्यांसाठी जीवनमरणाचा लढा देत होती. तिचे ऑपरेशन झाले. पण, तिच्या छातीपासूनचे खालचे संपूर्ण शरीर लकाव्याने प्रभावित झाल्याने तिला कायमचे अपंगत्व आले. आता व्हिलचेयर ची चाक चं तिचे पाय बनले होते. 

आता तिच्या नजरेसमोर केवळ अंधार आणि अंधारच होता. नवरा टाकून देईल. अशी भीती आणि अंधकारमय भविष्य. पण, तिच्या नवऱ्याने तिला टाकले नाही. तो तिच्या पाठीशी ठाम राहिला. यामुळे तिच्या मनाने उभारी घेतली.

अपंगत्व येऊन सहा वर्षे उलटली होती. ती आता एक छानसं रेस्ट्रॉरंट चालवत होती. या निमित्ताने नवीन मित्रमैत्रिणी रोज भेटायला येत होते. त्यामुळे दिवस मजेत जात होते.

तिची बाईक्स मधील रुची एका तरुण अधिकाऱ्याने ऐकली आणि त्याने तिला या अवस्थेत बाईक शिकण्यास प्रेरित केले. सुरुवातीला तिचा नकारघंटाच वाजला. पण, ती तयार झाली. तिचा व्यायाम सुरु झाला. त्यात तिचा पोहण्याचा व्हिडिओ एका खेळ अधिकाऱ्याने पाहिला आणि तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी बोलावले.

संधी तुमचे दार ठोठावते. तेंव्हा,त्यातून जाण्याचे धैर्य ज्याच्या अंगी असते. तोच विजेता बनतो. नेमकं हेच तिने हेरलं आणि या संधीचं तिनं सोनं केलं. तिनं आपल्या मेहनतीच्या बळावर पदक जिंकलं. तिचा आत्मविश्वास वाढला.

*पोहणे,गोळाफेक आणि बाईक चालविणे या गोष्टी ती आता लिलया करू शकत होती. 2016 साली तिने पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत भारतासाठी पहिलंवहिलं रौप्यपदक मिळवलं. ते पदक मिळविणारी ती म्हणजेच दीपा मलिक.*

राष्ट्रीय स्तरावर 54 सुवर्ण पदके, आंतरराष्ट्रीय स्तरावर 13, तीन वेळा विश्वविजेत्याचा किताब, एक रौप्य पदक आणि सगळ्या स्पर्धांमध्ये कमीत कमी पहिल्या पाचात स्थान मिळविले. धडधाकट खेळाडूंबरोबर स्पर्धा करताना, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये, त्या पॅरा-स्पोर्टस् विभागातील आदर्श बनल्या.
त्यांनी प्रवाहाविरुद्ध पोहत यमुना नदी पार करुन चार लिम्का वर्ल्ड ऍडवेंचर रेकॉर्डस् केले. हिमालयन रेस मध्ये भाग घेतला, जे अतिशय अवघड मार्ग आहेत. या ठिकाणी शून्याच्या खालील तापमानात आठ दिवसांच्या काळात समुद्रसपाटीपासून 18000 फूट उंचीवरून 1700 किमी बाईक चालविली.

*दीपा यांची ही कामगिरी संपूर्ण जगाला आवाक करणारीच आहे. कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी सकारात्मक राहणाऱ्या आणि आपल्या उदाहरणातून इतरांना प्रेरणादायी ठरणाऱ्या दीपा मलिक यांनी भारत सरकारने पद्मश्री हा मानाचा किताब देऊन सन्मानित केलं आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*


No comments: