Sunday, November 18, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 58

*2002 सालची ही घटना. एक पुरोगामी विचाराचे,पेशाने इंजिनियर असलेले वडील. आपल्या कन्येला घेऊन,नागपूरमधील एका इंजिनियरींग कॉलेजमध्ये प्रवेशाबाबत चौकशी करण्यासाठी गेले. त्याठिकाणी एका मुलीला पाहून आणि त्या कॉलेजमध्ये तिच्या इंजिनियरींग प्रवेशाबाबत ऐकल्यावर तेथील लोकांनी,"तिला हे जमणार नाही. ती टिकणार नाही. तिने आर्मी किंवा नेव्हीत प्रयत्न करावेत." असा सल्ला देऊन परत पाठविले. कारणही तसंच होतं. 1954 पासून आतापर्यंत तिथं एकाही मुलीनं प्रवेश घेतला नव्हता. नेमकं ते कोणत्या प्रकारचं इंजिनियरींग होतं?आतापर्यंत तिथं एकाही मुलीनं प्रवेश का घेतला नव्हता? त्या मुलीनं पुढं काय केलं? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..*

ती कॉलेजमध्ये असताना एन.सी.सी.मध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे तिच्या मनात खाकी वर्दीचे आकर्षण निर्माण झाले होते. तिला सैन्यात भरती व्हायची आणि अंगावर खाकी परिधान करण्याची इच्छा होती. पण, घडलं काहीसं वेगळंच.

तिचे वडील तिला घेऊन आशियातील एकमेव असलेल्या, नागपूरमधील फायर इंजिनियरींग कॉलेजमध्ये प्रवेशाबाबत चौकशी करण्यासाठी गेले. यापूर्वी त्या कॉलेजमध्ये एकाही मुलीने प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे साहजिकच तिला तिथं पाहून कॉलेजमधील प्रशासन आश्चर्य चकित झाले आणि त्यांनी "तिला हे जमणार नाही."असे सांगितले. यामुळे तिचा स्वाभिमान दुखावला आणि तिने जाणीवपूर्वक याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारी ती पहिलीच ठरली. या काळात तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेक कठीण प्रसंग तिच्या समोर उभे राहिले. तरीही तिने जिद्दीने आपले संपूर्ण शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आणि 2006 साली तिची निवड ओ.एन.जी.सी. (ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन) मध्ये अग्निशमन अधिकारी पदी झाली. कॉलेजमध्ये पाहिलेलं वर्दी चढविण्याचं स्वप्न तिनं पूर्ण केलं. स्वतंत्र झाल्यानंतर भारताला 58 वर्षानंतर *पहिली महिला फायरवुमन मिळाली. ती फायरवुमन म्हणजेच हर्षिनी कान्हेकर.*

*कॉलेजमधील प्रवेश, तेथील अभ्यासक्रम पूर्ण करताना आणि पहिली महिला फायरवुमन बनताना हर्षिनी यांच्या समोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. आगीप्रमाणेच त्यातील थोड्या नैसर्गिक होत्या आणि बऱ्याच मानवनिर्मित होत्या. यशाची पायरी चढताना प्रत्येक पायरीवर त्यांच्यापुढे "तुला हे जमेल का?" हा प्रश्न निर्माण केला गेला.पण,त्या मोठ्या धाडसाने,धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामोरे गेल्या. प्रत्येकवेळी त्यांनी "होय, मी हे करणारच." असे ठामपणे सांगितले. आपल्या स्वाभिमानाला लागलेली आग त्यांनी पहिली महिला फायरवुमन होऊनच विझवली. पुरुषांच्या बालेकिल्ल्यात त्यांनी केलेल्या चंचू प्रवेशाने अनेक महिलांचा प्रवेश सुकर काही केला. हर्षिनी कान्हेकर या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*


No comments: