Sunday, November 18, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 59

*2011 सालची घटना. ती एक नामांकित खेळाडू. अतिशय महत्त्वाची अशी आशियाई स्पर्धा चीनमध्ये भरणार होती. येणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ही स्पर्धा फार महत्वाची होती. त्या स्पर्धेत तिला सहभागी व्हायचे होते. पण,तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचे हृदयाचे ऑपरेशन करायचे होते. ज्या मुलाला आपण नऊ महिने पोटात वाढविले,दूध पाजले,त्याच्यासाठी थांबावे कि जे स्वप्न उराशी घेऊन आपण जगतोय. तिकडे जावे. तिच्यासमोर आजपर्यंतच्या आयुष्यातला सर्वात कठीण असा प्रसंग उभा राहिला होता. तिने काय निवडले? काय घडले असेल पुढे? ती खेळाडू कोण? जाणून घेऊ आजच्या भागात..*

मणिपूर राज्याच्या दुर्गम खेड्यात,गरीब आई वडिलांच्या पोटी 1 मार्च 1983 ला तिचा जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेमच. तरीही ती शिकली.

ती जेमतेम 16 वर्षांची असेल. बँकॉक मधील आशियाई स्पर्धेत माणिपूरच्या डिंको सिंह या बॉक्सर ने सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या या यशाने ती अधिक प्रभावित झाली आणि तिने ठरविले कि आपण बॉक्सर व्हायचे. घरच्यांच्या विरोधानंतर ही तिने आपले बॉक्सर व्हायचे स्वप्न सुरूच ठेवले.2000 साली वयाच्या 17 वर्षीच तिने चुणूक दाखवायला सुरु केली. तिने राज्यस्तरीय जेतेपद पटकाविले आणि घरच्यांचा विरोध मोडीत काढला. मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर तिने आपली ओळख निर्माण केली. तिने सलग पाचवेळा विश्व बॉक्सिंग स्पर्धा जिंकली. त्यातील तीन लग्नापूर्वी आणि दोन आई झाल्यावर जिंकली आहेत.

2011 ची घटना आपल्या मुलाचे हृदयाचे ऑपरेशन करण्यासाठी न थांबता ती चीनमधील आशियाई स्पर्धेसाठी निघून गेली. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, " विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात." नेमकं हेच तिने केलं. ती नुसती गेलीच नाही तर तिने सुवर्णपदक जिंकले. म्हणून तिला सुपरमॉम म्हंटले जातं. *या  सुवर्णपदक जिंकणाऱ्या सुपरमॉमने 2012 साली भारताला ऑलम्पिक मध्ये ब्रॉन्झ मिळवून दिलं आहे. ती आयर्न लेडी,अनब्रेकेबल वुमन, सुपरमॉम म्हणजेच मेरी कोम होय.*

*मेरी यांचा प्रवास अतिशय खडतर असा आहे. घरच्यांचा विरोध, टीका, महिला म्हणून मिळालेली वागणूक,झालेले अपमान, स्वाभिमानाला पोहचवलेली ठेच. या प्रत्येक संकटाला 'पंच' मारत. त्या यशस्वी झाल्या आहेत. त्याचा ध्यास,कष्ट करण्याची तयारी,धाडसीवृत्ती हे गुण घेण्यासारखे आहेत. 2016 सालच्या रियो ऑलम्पिकमध्ये मेरी पात्र होऊ शकल्या नाहीत. त्यांची कारकीर्द संपली असे वाटत असतानाच, मेरी यांनी 2017 मध्ये व्हिएतनाम मधील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. ते ही वयाच्या 35 व्या वर्षी, तीन मुलांची आई आणि राज्यसभेची खासदार असताना शिवाय अकादमीची जबाबदारी सांभाळताना. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा द्वितीय सर्वोच्च मनाचा किताब देवून सन्मानित केले आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*


1 comment:

Unknown said...

Nice story and salute to मेरी कोम