Sunday, November 18, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 60

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 60*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


1995 सालची ही घटना. एक 45 वर्षाची इंजिनियर महिला,जिचा पती एक बलाढ्य कंपनीचा मालक होता. ती विचार करत बसली होती कि,"आपण आपल्या आयुष्यातील 25 वर्षे स्वतःचं करियर घडविण्यासाठी घालवली आणि 20 वर्षे पतीच्या कंपनीसाठी दिली. ईश्वराने आज मला खुप संपत्ती दिली आहे. ती नक्कीच माझ्या हातून काहीतरी चांगले घडावं म्हणूनच ना? मग आपण काहीतरी केलं पाहिजे." या विचाराने एका सेवाभावी संस्थेचा जन्म झाला. आज त्या संस्थेचा,त्या परोपकारी महिलेचा सर्वत्र बोलबाला आहे.ती महिला कोण? ती संस्था कोणती? का यांचा इतका बोलबाला आहे? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...

19 ऑगस्ट 1950 साली तिचा जन्म कर्नाटक मधील एका खेड्यात झाला. बालपणापासूनच ती धाडसी अन हुशार. जे काही केलं,त्यात पहिलाच नंबर. ज्या काळात मुली इंजिनियरिंग निवडत नव्हत्या, त्याकाळात तिने इंजिनियरिंग करायचं ठरवलं. नुसतं ठरवलंच नाही, तर तिनं इंजिनियरिंगमध्ये पहिल्या क्रमांकाने पास होत, गोल्ड मेडल देखील मिळवलं. आता शोध होता नोकरीचा.

एकेदिवशी वर्तमान पत्रात नोकरीसाठी एका नावाजलेल्या कंपनीची जाहिरात वाचली आणि ती आनंदी झाली. पण,तिचा हा आनंद क्षणभंगूर ठरला. त्या कंपनीत महिलां इंजिनियर ना नोकरी नव्हती. ती नाराज झाली. कंपनी करत असलेल्या अन्यायाविरुद्ध ती पेटून उठली. तिने कंपनीला एक पत्र लिहले आणि महिलांवर कंपनी करत असलेल्या अन्यायाविरोधात जाब विचारला. ते पत्र कंपनीच्या प्रमुखांनी वाचले आणि तिला मुलाखतीसाठी बोलाविले. कंपनीच्या प्रमुखांनी स्वतः तिची मुलाखत घेतली आणि तिची नेमणूक केली. ज्या कंपनीत तिला नोकरी मिळाली, ती कंपनी होती टेल्को आणि कंपनीच्या ज्या प्रमुखांनी तिची मुलाखत घेतली ते होते, जे.आर.डी.टाटा..टेल्कोत दाखल होणारी ती पहिली महिला इंजिनियर होती. तिच्या या लढ्यामुळे त्या कंपनीत अनेक महिलांना संधी मिळाली.

सन 1981 साली तिच्या ध्येयवादी नवऱ्याने कंपनी सुरु करण्याचे ठरविले. तिने केवळ आपल्याजवळची रक्कमच दिली नाही, तरआपल्या पतीच्या पाठीमागे  ठाम उभी राहिली. त्यांचे कष्ट,प्रामाणिकपणा यामुळे थोड्याच दिवसात त्यांची ती कंपनी नावारूपाला आली.

वयाच्या 45 व्या वर्षी आपल्याकडे आलेल्या संपत्तीचे कारण शोधत असताना, तिला जाणीव झाली की,"ईश्वराने इतरांचे भले करण्यासाठी आपल्याकडे संपत्ती दिलेलीआहे. त्याचा वापर समाजासाठीच आपण करायला हवा." या विचारातून एका सेवाभावी संस्थेचा जन्म झाला. *ती संस्था म्हणजे इन्फोसिस फौंडेशन आणि ज्यांच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत, त्या या फौंडेशनच्या अध्यक्षा म्हणजे सुधा मूर्ती.* 

*सुधा मूर्ती या स्वभावाने अतिशय साध्या, प्रेमळ अशा आहेत. 2 अब्ज कोटी रुपयांच्या कंपनीच्या सहमालकीण असूनही त्यांचे राहणीमान अतिशय साधे आहे. त्या परोपकारी आहेत. त्यांनी  इन्फोसिस फौंडेशन च्या माध्यमातून देशभरात अनेक सामाजिक कामं केली आहेत. दरवर्षी त्या 250 कोटी रुपयांची मदत या फौंडेशन च्या माध्यमातून केली जाते. काही लोकं यशस्वी होण्यासाठी, मोठं स्वप्न उराशी बाळगून जगत असतात. तर काही लोकांच साधेपणाने आणि परोपकारीवृत्तीने जगण्यामुळेच यशस्वी बनतात. असंच काहीसं सुधा मूर्तीच्या बाबतीत वाटतं. त्यांच्या या कार्यामुळे भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*


No comments: