Sunday, November 18, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 56

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 56*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*एका नामांकित विद्यालयाच्या कार्यक्रमासाठी त्या राज्याचे राज्यपाल आले होते. राज्यपालांच्या दिमतीला सैन्यातील काही अधिकारी होते.  त्या अधिकाऱ्यांचा रुबाब पाहून नववी च्या वर्गातील काही मुली अतिशय प्रभावित झाल्या. त्यातील काही मुलींनी मोठेपणी एखाद्या सैन्य अधिकाऱ्याशीच लग्न करण्याचे इच्छा व्यक्त केल्या. पण, एका मुलीने आपली सैन्य अधिकाऱ्याशी लग्न करण्याची इच्छा नाही. असेच ठामपणे सांगितले. तिने असे का सांगितले? यामागचे कारण काय?काय असावी तिची महत्वाकांक्षा? ती मुलगी कोण?तिचे पुढे काय झाले? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...*

तिचा जन्म शिमल्यातला. वडील पोलीस अधिकारी. त्यामुळे घरी प्रचंड शिस्त. पण,ती लहानपणापासून खोडकर. जणू टॉमबॉयच.

शाळेतील एका समारंभात तिने Aide-de-camp(ADC) अर्थात सेनाधिकाऱ्यांचा मदतनीस अधिकारी यांना प्रथमच पाहिले आणि ती प्रभावित झाली. त्यावेळी ती म्हणाली, "मी सैन्य अधिकाऱ्याशी लग्न करणार नाही. तर मी स्वतःच एक सैन्य अधिकारी बनणार." पण, त्या अजाण मुलीला हे माहित नव्हते की, भारतीय सैन्यदलात महिलांना अधिकारी होण्याची संधी नव्हतीच.

शालेय शिक्षण संपल्यावर ती वकिली चे शिक्षण घेत होती. तिला वकील होण्यात मुळीच रस नव्हता. तिला सैन्य अधिकारी व्हायचे होते. एकदा सैन्यातील भरती बाबतची एक जाहिरात तिने पाहिली. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण,हा आनंद क्षणभंगूर ठरला. तिने जाहिरात वाचली. तिच्या लक्षात आले की, यात महिलांसाठी एकही जागा नाही. सोबतच सैन्यात महिलांची भरती केली जात नाही. याचीही तिला माहिती मिळाली. ती नाराज झाली. पण, तिने आपले प्रयत्न थांबविले नाहीत.

तिने एक पत्र सेना अधिकऱ्यांना लिहले आणि त्यात महिलांना सैन्यात भरती न करण्यामागचे कारण विचारले. यावर काही दिवसातच उत्तर आले कि, लवकरच भारतीय सैन्य दलात महिलांची भरती केली जाईल. या उत्तराने ती खूपच आनंदित झाली. पण,भरतीची जाहिरात यायला 4 वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला. एकदाची जाहिरात आली. तिने अर्ज भरला,परीक्षा दिली आणि ती यशस्वी देखील झाली. *ती बनली भारतीय सैन्य दलात दाखल होणारी पहिली महिला अधिकारी. ती महिला सैन्य अधिकारी म्हणजेच प्रिया झिंगन होय.*

*प्रिया झिंगन यांनी सैन्यात भरती होण्याचे स्वप्नं तेंव्हा पाहिले होते, जेंव्हा भारतीय सैन्य दलात महिलांची भरती केली जात नव्हती. स्वप्नांचा पाठलाग कसा करावा? हे प्रिया यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. सैन्य दलात महिलांना भरती होण्याचा मार्ग हा केवळ प्रिया यांच्या प्रखर निर्धाराने, महत्वाकांक्षेने, प्रयत्नानेच शक्य झाला आहे. त्यामुळे कित्येक महिला आज सैन्यदलात कर्तव्य पार पाडत आहेत. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*


No comments: