Saturday, November 17, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 55

*1983 सालची ही घटना. दिल्लीतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम एका महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वीकारले होते. एकेदिवशी एक चारचाकी वाहन रस्त्यातच अनधिकृतपणे पार्किंग केल्याचे, त्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ते वाहन जप्त करण्याचे आदेश दिले व तशी कृतीही लगेचच झाली. जप्त केलेले ते वाहन भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे होते. तरीही रीतसर दंड भरूनच ते वाहन सोडण्यात आले. ते वाहन जप्त करणारी, दंड भरूनच जप्त केलेले वाहन सोडणारी कायदाधार्जिणी, कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी कोण ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..*

तिचा जन्म 9 जून 1949 चा, पंजाबमधील अमृतसरचा. एका पुरोगामी विचारसरणी असलेल्या मातापित्यांच्या पोटी तिचा जन्म झाला. तो काळ मुलींचा नव्हताच मुळी. तो केवळ मुलांसाठीच होता. शिक्षण,व्यापार आणि नोकरीत केवळ पुरुषांचीच मक्तेदारी. पण, तिच्या वडिलांनी आपल्या चार ही मुलींना उत्तमप्रकारे शिक्षण देण्याचा निर्धार तर केलाच, पण तशी कृतीही केली. वडिलांचा हा निर्णय तिच्या आजोबांच्या विरोधातील होता. म्हणून,  त्यांनी तिच्या वडिलांना संपत्तीतून बेदखल केले.

तिच्या सोबतच्या इतर मुली हुंडा देऊन, लग्न करून सासरी जायच्या. त्यावेळी ती टेनिसचे रॅकेट घेऊन शाळेत जायची. ती टेनिसची उत्तम खेळाडू बनली. विविध पातळ्यावर बक्षिसे जिंकली. टेनिसमध्ये देशाचे नेतृत्वही केले. तिने प्राध्यापिका म्हणून काम सुरु केले. सोबत ती स्पर्धा परीक्षेची तयारीदेखील करत होती. अशातच 1972 साली तिचे लग्न झाले. लग्न झाले की,"ना शिक्षण, ना नोकरी, केवळ चूल आणि मूल" अशा विवंचनेत महिला अडकतात. पण,या साऱ्याला ती अपवाद ठरली.

लग्नानंतर, ती स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाली अन् तिला देशसेवा करण्याची संधी मिळाली. त्याकाळी महिला आय.ए.एस. किंवा आय.आर.एस.ची निवड करायच्या. पण, तिने वेगळाच पर्याय निवडला. तो म्हणजे आय.पी.एस.. आय.पी.एस.च्या 80 प्रशिक्षणार्थीं मध्ये ती एकमेव महिला होती. आय.पी.एस.चे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून, ती बनली भारतीय पोलीस सेवेची पहिली महिला अधिकारी. *ती अधिकारी महिला आय.पी.एस. म्हणजेच  किरण बेदी.*

 
*किरण बेदी अतिशय कडक शिस्तीच्या, कायदाधार्जिणी, कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी होत्या. म्हणूनच त्यांनी पंतप्रधानांची जप्त गाडी केलेली गाडी, दंड भरल्यावरच सोडली. त्या केवळ अधिकारीच बनल्या नाहीत, तर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने त्यांनी पोलीस प्रशासनाची नवी व्याख्याच तयार केली. केवळ शिक्षा करण्यापेक्षा,चुका दुरुस्त करून, प्रतिबंध करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. म्हणूनच त्यांना तिहार जेल चे तिहार आश्रम करता आले. शिवाय निवृत्त झाल्यावर तब्बल 10 वर्षांनी राज्यपाल पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळता आहेत. त्यांनी त्यांच्या कृतीतून जगाला दाखवून दिले की, महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणतेही काम लिलया करू शकतात. 

वास्तविक पाहता किरण बेदी यांना पारंपरिक मार्ग निवडण्याचा पर्याय होता. पण, त्यांनी वेगळा पर्याय निवडण्याचे धाडस केले. आपण चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतो. तेचतेच ते मार्ग पुन्हा पुन्हा धुंधाळत असतो. परंतु मित्रांनो एखादी नवी पाऊल वाट आपण स्वतः निर्माण करण्याचं धाडस केलं पाहिजे. कारण,आज जी पाऊल वाट आपण निर्माण करता आहात, कदाचित ते करत असताना आपल्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, भविष्यात हीच पाऊल वाट एखाद्या महामार्गात परावर्तित होते आणि हेच टीकाकार तुमच्या मार्गाने यायचा निर्णय घेतात. किरण बेदी यांनी नवा मार्ग निवडण्याचं धाडस केलं. म्हणूनच, त्या पहिल्या महिला आय.पी.एस. होऊ शकल्या. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*

धन्यवाद...


No comments: