🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 54*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत* ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पोस्टच्या शेवटी लिंकवर क्लिक करा.*
*एक तरुणी आपल्या भावासोबत बच्छेन्द्री पाल यांच्याकडे आली. तिने बच्छेन्द्री पाल यांच्यासमोर एव्हरेस्ट शिखर सर करण्याबाबतचा आपला मनोदय व्यक्त केला आणि आपल्याला प्रशिक्षण देण्याबाबत विनंती केली. पाल यांनी तिच्याकडे पुन्हा एकवार पाहिलं आणि "तुला हे जमणार नाही" असे सांगून तिला प्रशिक्षण देण्यास नकार दिला. पाल यांनी असे का केले? बरं जिला त्यांनी नकार दिला. ती तरुणी कोण होती? पुढे काय झालं? पाल यांनी तिला प्रशिक्षण दिलं का? त्या तरुणीचा मनोदय पूर्ण झाला का? यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील.जास्त उत्सुकता ताणून धरणार नाही.चला तर मग.*
12 एप्रिल 2011 च्या रात्री. एक तरुणी नोकरीच्या मुलाखतीसाठी रेल्वेने दिल्लीला निघाली होती. अचानक ती बसलेल्या डब्यात काही गुंड शिरले आणि त्यांनी प्रवाशांजवळील मुद्देमाल दमदाटी करून लुटण्यास सुरवात केली. गुंडांनी या तरुणीकडे असलेली सोन्याची चेन हिसकावून घेण्यास सुरुवात केली. पण,व्हॉलीबॉलची खेळाडू असलेल्या त्या तरुणीने जोरदार प्रतिकार केला. तिच्या प्रतिकाराने चिडलेल्या गुंडांनी तिला रेल्वेतून खाली ढकलले. या अपघातात त्या बिचारीला आपला पाय गमवावा लागला. हा अपघात मनावर खोल आघात करणारा होता.
''तिच्या जवळ तिकीट नव्हते म्हणून तिने स्वतःच उडी मारली.'' यासारख्या वर्तमानपत्रातील आणि टी.व्ही.वरील बातम्यांमुळे तर तिला फारच दुःख झाले. खुप मानसिक त्रास झाला. पण, तिने आपले मनोधैर्य खचू दिले नाही. अंगात खेळाडूवृत्ती ठासून भरलेली असल्याने, ती या कठीण प्रसंगालाही धैर्याने सामोरे गेली.
तिच्यावर झालेल्या टिकांना, तिने आपल्या कृतीतून उत्तर देण्याचा निर्धार केला आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडताच, ती तडक बच्छेन्द्री पाल यांच्याकडे गेली आणि आपला मनोदय सांगितला. तिच्या कृत्रिम पायाकडे पाहून त्यांनी सुरवातीला नकार दिला. पण, तिचा निर्धार पाहून पाल प्रशिक्षण देण्यास तयार झाल्या.
खरंतर प्रशिक्षण तिच्यासाठी एक अग्निपरीक्षाच होती. कृत्रिम पायाने होणारा त्रास, इतरांपेक्षा लागणारा वेळ यावर मात करून तिने प्रशिक्षणात A ग्रेड मिळविला. पण, खरा प्रवास अजून बाकी होता. ध्येयपूर्तीचा, स्वतःला सिद्ध करण्याचा, टीकाकारांना उत्तर देण्याचा.
ध्येयपूर्तीचा तिचा प्रवास शेर्पाच्या नकारानेच सुरु झाला. तिच्या सोबत येणाऱ्या शेर्पाने तिच्या कृत्रिम पायाकडे पाहून नकार दिला. पण नंतर तिचा निर्धार पाहून तोही तयार झाला.
*मजल दरमजल करत, अनेक संकटे झेलीत, थंडी व वादळांचा सामना करत, ठिकठिकाणी सांडलेले रक्त आणि प्रेते पाहत, डोळ्यादेखत पाय घसरून खोल दरीत पडणाऱ्या गिऱ्हारोहकाचा मृत्यू पाहत, अधुनमधून निसटणारा कृत्रिम पाय आणि संपत आलेला प्राणवायू या साऱ्या संकटांशी दोन हात करत ती पोहचली पृथ्वीवरील सर्वोच्च जागी,एव्हरेस्ट शिखरावर. एव्हरेस्ट शिखर सर करणारी ती तरुणी म्हणजेच अरुनिमा सिन्हा होय.*
अरूनिमा यांचा हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. पण, कठीण ही नव्हता. 'आकांक्षा पुढती, गगन ठेंगणे.' त्यांच्या आकांक्षा, त्यांचं ध्येय इतकं मोठं होतं की, त्यांच्या जिद्दीने, चिकाटीने आणि परिश्रमाने ते ठेंगणे झाले. त्या आपलं ध्येय साध्य करण्यात यशस्वी ठरल्या. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी यापेक्षा वेगळं काही करायची गरज आहे. असं मला वाटत नाही. आपल्याला काय वाटतं ??
*12 एप्रिल 2011 रोजी त्यांचा अपघात झाला होता आणि 21 मे 2013 च्या सकाळी त्या पृथ्वीवरील सर्वोच्च स्थानी उभ्या होत्या. अपघाताने अपंगत्व आलेल्या आणि एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या त्या जगातील पहिली अपंग स्त्री ठरल्या. म्हणूनच अरुनिमा सिन्हा एक यशवंत आहे.*
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार.
🛑 _*कृपया लेख नावासहच फॉरवर्ड करा...*_
धन्यवाद!!!!!
🎯 यापूर्वीचे सर्व लेखन वाचण्यासाठी व फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. *ब्लॉगला फॉलो करा...*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/54.html
🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत* ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/LOy85UK3yQB3yjyLH329zg
No comments:
Post a Comment