Saturday, November 17, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 53

20 सप्टेंबर 2000 साली भारतातील सर्वच वर्तमानपत्रात पहिल्या पानावर एका तरुणीचा फोटो झळकत होता. सगळीकडे तिचे कौतुक सुरु होते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत केवळ तिच्याच नावाची चर्चा सुरु होती. कोण होती ती तरुणी? असा कोणता पराक्रम तिने केला? जाणून घेऊ आजच्या भागात..

आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम मध्ये एका रेल्वे कॉन्स्टेबलच्या घरी 1 जून 1975 रोजी तिचा जन्म झाला. पदरी पाच मुलीच. पण, प्रत्येक मुलीचे लाड घरच्यांनी पुरविले.

बालवयातच तिला वेटलिफ्टिंगची आवड निर्माण झाली. वयाच्या 13 व्या वर्षीच तिने आपले कसब विविध पातळीवरील स्पर्धात दाखवायला सुरु केली. 1992 च्या आशियाई स्पर्धेत तिने सिल्वर मेडल मिळविले आणि ती जगभरात ती प्रसिद्ध झाली. तिची घोडदौड चालूच राहिली.

पण, तिच्या या घोडदौडीला 1996 साली ब्रेक लागला. एथेन्स येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती सपशेल अपयशी ठरली. भारी अपयश आणि मानहानी सहन करावी लागली. पण, तरीही तिच्या अथक परिश्रमाने तिची निवड सिडनीमधील ऑलंपिक स्पर्धेसाठी झालीच. तिच्या निवडीवर टीकाकारांनी राळ उठवली."सरकारच्या पैशावर सहलीसाठी जातात."अशी टीकाही तिच्यावर झाली. पण,ती शांत राहिली. कारण तिचा स्वतःवर विश्वास आणि आपल्या मेहनतीवर विश्वास होता. तिने आपले संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर आणि खेळावर केंद्रित केले.

अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला. तो क्षण आला. त्या क्षणाला डोळ्यात भरून घेण्यासाठी केवळ 7 चं भारतीय प्रेक्षक उपस्थित होती. तो क्षण म्हणजे विजयाचा,तो क्षण म्हणजे आनंदाचा, तो क्षण म्हणजे जल्लोषाचा. तो ऐतिहासिक क्षण म्हणजेच  ऑलंम्पिकमध्ये भारताला महिलांकडून पहिलं वैयक्तिक पदक. आणि वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक  मिळवून देण्यासाठी जिणं जिवाचं रान केलं, ती तरुणी म्हणजेच कर्णम मल्लेश्वरी होय.

कर्णम यांनी आपल्या हिंमतीच्या आणि ताकदीच्या जोरावर भारतासाठी पदक मिळविले. आलेलं अपयश आणि झालेल्या टीका, त्यांनी मनावर घेतल्या नाहीत. आपल्या ध्येयावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्या जराही विचलित झाल्या नाहीत. आपल्या कृतीने त्यांनी आपल्या टीकाकारांचे तोंड बंद केले.पी.टी.उषा यांच्या नंतर ऑलम्पिक मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या त्या एकमेव महिला ठरल्या. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.

ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असताना अनेक अडचणी येतात. अपयश येतं. अपयश आलं की, टीकाही होतेच. पण, त्या टीका फारशा गांभीर्याने घेवू नका. त्याच्याकडे सकारात्मकतेने पहा. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित ठेवा आणि आपलं काम करत रहा. तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचला की, तुमच्या निंदकांचे तोंड आपोआप बंद होईल.

No comments: