Saturday, November 17, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 52

जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला आपल्यामधील  क्षमतेचा शोध लागत नाही, तो पर्यंत ती व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होत नाही. 13 वर्षाची एक अशी मुलगी, जिला भरभर चालण्याची सवय होती. तिच्या मामाला तिच्यातल्या या क्षमतेचा शोध लागला. त्याने तिला शालेय स्पर्धेत धावण्याची प्रेरणा दिली. ती धावली आणि जिंकली. नुसती जिंकलीच नाही, तर तिने एक राष्ट्रीय रेकॉर्डच बनविले. ज्याची तिला अजिबात कल्पना नव्हती. ती मुलगी कोण ? या मुलीचे पुढे काय झाले? जाणून घेऊ आजच्या भागात....

केरळ या देवभूमीत पय्योली या खेड्यात, एक गरीब कुटुंबात जन्मलेली ही एक मुलगी. 13 व्या वर्षीच,एक धावण्याची शालेय स्पर्धा जिंकते आणि तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. ही स्पर्धा तिच्या जीवनातीला टर्निंग पॉईंटच ठरली.

ओ.एम.नाम्बीयर या प्रशिक्षकाच्या नजरेने, तिच्यातली क्षमता ओळखली आणि इथून सुरु झाला तिचा खरा प्रवास. सन 1980 साली केवळ 16 व्या वर्षीच ती भारताच्या ऑलम्पिक संघात सहभागी झाली.

आतापर्यंत एकाही महिलेला धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावता आले नव्हते. ती ही याला अपवाद नव्हती. ती अपयशी ठरली.

पण,ती खचली नाही आणि डगमगली नाही. तिने अन्य ठिकाणच्या स्पर्धात भारताची मन उंचावत ठेवली होती. तिने खुप खुप कष्ट केले आणि 1984 च्या ऑलम्पिक स्पर्धेत पुन्हा सहभागी झाली.

या स्पर्धेत ती फायनलपर्यंत पोहचली. अशी कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय महिला ठरली. या स्पर्धेत ती 4 थ्या क्रमांकावरच राहिली. पराभूत झाली. सेकंदाचा 100 वा भाग तिला देशासाठी धावण्यातलं महिलांसाठीचं पहिलं ऑलंपिक पदक मिळवून देण्यात कमी पडला. या पराभवापेक्षा तिच्या या सर्वोत्तम कामागिरीचीच अधिक चर्चा झाली. भारतासाठी धावण्यात पहिल्यांदाच सर्वोत्तम कामगिरी करणारी, ती महिला धावपट्टू म्हणजेच पय्योली एक्सप्रेस पी.टी. उषा.

ऑलम्पिकमध्ये उषा यांना पदक मिळविता आले नसले. त्यांनी इतर अन्य स्पर्धात भारतासाठी पदकांचे शतक जमविले आहे. त्यांच्या ऑलम्पिकमधील कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहे.

आपल्यात असलेल्या क्षमतेचा शोध आपल्याला जेव्हढ्या लवकर लागेल,तेव्हढ्या लवकर यश प्राप्ती होते. पी.टी.उषा यांचा हा प्रवास पुढील काळात महिलांसाठी अधिक प्रेरणादायी असा ठरला आहे.



No comments: