Saturday, November 17, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 51

भारतीय गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून  सरकारने  चौथी एव्हरेस्ट शिखर मोहीम आखली होती. या मोहिमेत 16 सदस्य होते पैकी 5 महिला. चार टप्प्यात एव्हरेस्ट चढाई करायची होती.मोहीम सुरू झाली. जसजसे शिखर जवळ येऊ लागले तसतसे एक एक सदस्य माघारी परंतु लागले.जेंव्हा टीम तिसऱ्या टप्प्यात पोहचली,तेंव्हा चार महिलांनी मागे  फिरण्याचा निर्णय घेतला. एका महिलेचा अजून निर्णय व्हायचा होता. तिने कोणता निर्णय घेतला ?काय घडले असेल पुढे ? ती महिला कोण ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग.

उत्तराखंड राज्यात,हिमालयाच्या कुशीत 1954 साली तिचा जन्म झाला. तिचा जन्म एका गरीब कुटुंबातला. त्याकाळच्या समाजात मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जायचे. पण, तरीही तिच्या घरच्यांनी तिला शिकवले. तिने बी.एड. चे शिक्षण पूर्ण केले. ती शिक्षिका बनली. पण, तिने ती नोकरी सोडली.

नोकरी सॊडल्यावर तिने नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मौउंटेनियरिंग मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न केला. तिचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला. पण,दुसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली.

तिने हा अभ्यासक्रम उत्तमप्रकारे पूर्ण केला. यामुळेच तिची निवड भारतीय गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून  सरकारने आखलेल्या चौथ्या एव्हरेस्ट शिखर मोहीमेत झाली.

मोहीम सुरू झाली. पण,जसजसे शिखर जवळ येत होते, तसतसे एक एक सदस्य माघारी परतु लागले होते. जेंव्हा टीम तिसऱ्या टप्प्यात पोहचली, तेंव्हा चार महिलांनी मागे  फिरण्याचा निर्णय घेतला. कारण ही तसेच होते. कडाक्याची थंडी,श्वास घेताना येणारा अडथळा, जखमी झालेले सहकारी आणि ढासळत चाललेला आत्मविश्वास.

तिलाही या सर्वाचा त्रास झालाच आणि तिने निर्णय घेतलाच. पुढे जाण्याचा. कारण,तिचा आत्मविश्वास. तिला विश्वास होता शिखर गाठण्याचा आणि तिने तो गाठलाच. जगातील सर्वोच्च असणारे एव्हरेस्ट शिखर तिने काबीज केले. असा पराक्रम करणारी ती जगातली फक्त पाचवी महिला होती आणि भारताची पहिली महिला, अर्थात बच्छेन्द्री पाल.

ज्या समस्या इतरांना होत्या, त्याचं बच्छेन्द्री पाल यांना देखील होत्या. आपल्या इतर सहकाऱ्यांप्रमाणे बच्छेन्द्री पाल मागे फिरल्या असत्या,तर त्या आज कोठे असत्या ? त्या चार इतर महिलांच्या यादीत त्यांचाही समावेश झाला असता आणि बच्छेन्द्री पाल हे नाव आज कोठेही अस्तित्वात नसते. त्यांच्या या अतुलनीय पराक्रमाची दखल घेवून भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा किताब देवून सन्मानित केले आहे.

इथे शिव खेरा याचे एक वाक्य जाणीवपूर्वक लिहावेसे वाटते. ते म्हणतात,"विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत,ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात." जसे कि,बच्छेन्द्री पाल यांनी केले. म्हणूनच त्या यशाच्या शिखरावर पोहचल्या आणि म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.


No comments: