Friday, November 16, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 50

आयुष्य म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजेच आयुष्य. संघर्ष काहीजणांना जन्माला आल्यानंतर करावा लागतो. तर काहीजणांच्या संघर्षाची सुरुवात आईच्या गर्भातच होते. पण,तरीही काही लोकं संघर्ष करतात,संकटावर मात करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवतात. मग,त्यांचा जीवनप्रवास आपल्यासाठी प्रेरणादायी होऊन जातो. आज एका अशा यशवंताचा प्रवास आपल्यासमोर मांडणार आहे कि, ज्याचा संघर्ष पाहिल्यावर आपण आपल्या आयुष्यातील संकटांमुळे कधीच निराश होणार नाही. आपण आपल्या जीवनाकडे अधिक सजगपणे पाहायला लागू. चला तर मग जाणून घेऊ आजच्या यशवंताबद्दल....

तो ऑस्ट्रेलियातला.जन्माला आला तेव्हा त्याला हात आणि पाय दोन्हीही नव्हते. त्याला आयुष्य जगण्यासाठी संघर्षाशिवाय पर्यायच नव्हता. बरं,हा संघर्ष केवळ शारीरिक नव्हता. तर मानसिकही होता. परिसरातील आणि शाळेतील मित्रांच्या थट्टेचा तो विषय बनला. त्याच्या व्यंगावर होणारे विनोद आणि कुत्सित हसणे, यामुळे तो पार वैतागून गेला होता. त्याने आपलं आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानं आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. पण,तो सपशेल अपयशी ठरला.

या प्रसंगातून तो कसाबसा सावरला. एकेदिवशी एका वृत्तपत्रातील बातमीने त्याचे लक्ष वेधले. एक अपंग व्यक्ती आपल्या अपंगत्वावर मात करून कसा यशस्वी झाला? याची ती बातमी होती. त्या बातमीने त्याच्यातील नैराश्य नाहीसे झाले. त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने आपल्यातील 'बेस्ट' चा शोध घेतला. आणि वयाच्या 17 व्या वर्षीच त्याने चर्च मध्ये भाषण दिले. तिथून त्याने मागे वळून पाहिलेच नाही. वयाच्या 20व्या वर्षी तो जगातील एक प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ता बनला. तो प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ता म्हणजेच निकोलस वुजीसिक.

आपल्या अपंगत्वावर मात करणारा निक पोहणे,फुटबॉल खेळणे,चित्र काढणे,मासे पकडणे,संगणक चालविणे यासारख्या अनेक गोष्टी लिलया करू शकतो. व्याख्याने देण्यासाठी तो आजवर 60 पेक्षा अधिक देश फिरला आहे. म्हणूनच तो एक यशवंत आहे.

जी लोकं आपल्या आयुष्यातील बारीकसारीक गोष्टींबद्दल तक्रार करत असतात. त्या सर्वांसाठी निक चा हा प्रवास, एक चपराक आहे. शिवाय ज्या अपंग व्यक्ती आपल्या वाट्याला आलेल्या अपंत्वामुळे स्वतःला आणि नशिबाला कोसत असतात. आपल्या जीवनात करण्यासारखं काहीच नाही. असं मानत असतात. त्या सर्वांसाठीच निक चा हा प्रवास दिशादर्शक आणि प्रेरणादायी असा आहे. 

जगात अशक्य असं काहीच नसतं. याचा शोध निकच्या प्रवासातून लागतो. त्याच्यातून बोध घेऊया आणि यशवंत होऊया.

ही पोस्ट आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि नावासह शेयर करा.

Please Follow My Blog.


No comments: