Friday, November 16, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 49

एका 28 वर्षाच्या तरुण आणि यशस्वी बॉक्सरने 40 वर्षाच्या,निवृत्त झालेल्या बॉक्सरला लढाईसाठी खुलं आव्हान दिलं. 40 वर्षाच्या त्या बॉक्सरसाठी हा सामना खुप प्रतिष्ठेचा होता.कारण,तो आजपर्यंत सलग 49 सामने जिंकला होता.तो अपराजित होता. या सामन्यावर सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. काय झाले असेल त्या सामन्यात?कोण जिंकलं असेल?काय झालं असेल त्या 40 वर्षाच्या बॉक्सरचे?तो 40 वर्षाचा बॉक्सर कोण?जास्त उत्सुकता ताणणार नाही. चला तर मग.जाणून घेऊ आजच्या यशवंताबद्दल.

वयाच्या 7 व्या वर्षीच त्याने बॉक्सिंग चे ग्लोव्हज हातात चढवले होते. कारण, त्याचे वडील एक बॉक्सर होते. सर्वकाही ठीक चालले होते. तोच त्याचा मोठा भाऊ आणि वडील अंमली पदार्थांची विक्री करताना पोलिसांना सापडले. हे कमी कि  काय? त्याची आई देखील अंमली पदार्थाच्या अधीन गेली होती. ती ही पोलिसांच्या ताब्यात.तुरुंगात. आता त्याच्या जीवनात संपुर्ण अंधारच निर्माण झाला. पण,अंधारानंतर उजेड ठरलेलाच असतो. असचं काहीसं त्या बॉक्सर च्या बाबतीतही घडलं. त्याच्या आजीनं त्याचा सांभाळ केला आणि बॉक्सिंगसाठी प्रेरणा दिली.

त्यानं घाम गाळायला सुरुवात केली आणि वयाच्या 15 व्या वर्षीच त्याने अमेरिकेतील मानाच्या बॉक्सिंग स्पर्धेत, आपल्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने थोर असलेल्यांना पराभूत करून आपला ठसा उमटवला. एव्हढचं नाही तर त्याने बॉक्सिंग स्पर्धेतील मानाचा असा "गोल्डन ग्लोव्हज पुरस्कार" ही मिळवला. त्याच्या यशाची कमान चढतीच राहिली. वयाच्या 38 व्या वर्षी तो निवृत्त झाला.

2017 साली कॉर्नर मॅगरेग्रोर या नावाजलेल्या 28 वर्षीय तरुण बॉक्सरने ललकारले. तेंव्हा या 40 वर्षाच्या बॉक्सरने ते आव्हान स्वीकारले. त्याला पराभूत केले आणि 3 हजार कोटी रुपयांचे बक्षीस ही जिंकले. तो अपराजित बॉक्सर म्हणजेच फ्लॉइड मेवेदर होय.

कॉर्नर मॅगरेग्रोर चे या सामन्यात फारसे नुकसान झाले नसावे. पण, मेवेदरचे खुप नुकसान झाले असते. त्याला अपराजित राहता आले नसते. यासाठी त्याने खुप घाम गाळला. आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावले आणि तो अजिंक्य ठरला.  म्हणूनच, तो एक यशवंत आहे.

' अपराजित राहणं ' हा नशिबाचा भाग नाही. तर तो कर्तृत्वाचा भाग आहे. संकटांना आपल्यावर त्यानं कधी 'हावी' होऊ दिले नाही. आपल्या समोर आलेल्या संकटाना ' नॉक आऊट ' केलं. आपण ही आपल्या समोरील संकटांना 'हावी' होऊ न देता 'नॉक आऊट' करूया. पण, अपराजित राहण्यासाठी मेवेदरने किती घाम गाळला असावा ? याचा शोध नक्की घ्या. बोध घ्या आणि यशवंत व्हा.


ही पोस्ट आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि नावासह शेयर करा.

Please Follow My Blog.


No comments: