Tuesday, November 20, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 68

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 68*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*1985 मध्ये केंद्र सरकारच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी विश्व बँकेने 450 कोटी डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा केली. या प्रकल्पाने तीन राज्यांचा दुष्काळ संपुष्टात येणार होता. या प्रकल्पाचे जिव्हढे फायदे होते. त्यापेक्षा अधिक तोटे होते. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आपली पीएचडी अर्धवट सोडून एक तरुणी पुढे आली. तिने या प्रकल्पाने होणारे नुकसान जगासमोर आणले. सरकारला या प्रकल्पाचा पुनर्विचार करायला भाग पाडले. आवाज उठविणारी ती तरुणी कोण ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..*

तिचा जन्म 1 डिसेंबर 1954 सालचा. मुंबईतील एका गांधीवादी विचारधारा असलेल्या कुटुंबातला. वडील वसंत खानोलकर स्वातंत्र्यसेनानी, तर आई इंदु महिलांसाठी कार्य करणारी समाजसेविका. आईवडिलांच्या या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव तिच्यावर पडला. तिला याचा लाभ भविष्यात सामाजिक जीवनात झाला. तिचं संपूर्ण शिक्षण मुंबई मध्येच झाले. 1976 साली TISS (Tata Institute Of Social Science) मध्ये तिने एम.ए.पूर्ण केलं आणि त्याच संस्थेत तिनं 2 वर्षे शिक्षक म्हणून कामही केलं. याच काळात तिने मुंबईतील सेवाभावी संस्थामध्ये काम करायला सुरुवात केली. सात वर्षे तिने मुंबईत काम केलं. तिचं लग्न झालं आणि लगेचच घटस्पोट देखील झाला. पुढे पीएचडीसाठी प्रवेश घेतला होता.

1985 साली वर्ल्ड बँकेने एका प्रकल्पासाठी कर्ज दिले. या प्रकल्पामुळे गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन राज्यातील पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघणार होता. या तीन राज्यांची भरभराट होणार होती. पण, या प्रकल्पाने 37000 हजार गावांचे, लाखो लोकांचे विस्थापन होणार होते. अनेक लोकं बेघर होऊन बेरोजगार होणार होते. सोबतच, पर्यावरणाची मोठी हानी होणार होती. यावर कहर म्हणजे, विस्थापित लोकांना मिळणारी मदत अतिशय तुटपुंजी होती. 

मुंबईत पीएचडी करणाऱ्या त्या तरुणीने या प्रकल्पातील विस्थापितांसाठी वाहून घेतले. वेळ कमी पडू लागला. म्हणून, पीएचडी अर्धवट सोडून तिनं स्वतःला या लढयात पूर्णपणे वाहून घेतलं. सुरुवातीला तिने या प्रकल्पाने पर्यावरणाचे होणारे नुकसान जगासमोर मांडले. पण, नंतर या प्रकल्पाने बाधित लोकांना अधिक सुविधा मिळाव्यात. यासाठी लढा उभारला आणि या लढ्याने ती बनली विस्थापितांचा, उपेक्षितांचा आवाज. *तो हा लढा होता, नर्मदा बचाव आंदोलनाचा आणि तो विस्थापितांचा, उपेक्षितांचा आवाज म्हणजे मेधा पाटकर होय.*

*काही लोकं केवळ स्वतःचा विचार करतात. पण, मेधाजी याला अपवाद आहेत. विस्थापितांना न्याय मिळवून देण्यासाठी पीएचडी अर्धवट सोडणं, आईच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी पुन्हा आंदोलनात सक्रिय होणं, सलग 22 दिवस उपोषण करणं, प्रसंगी जीव धोक्यात घालणं, या साऱ्या गोष्टी, त्यांची ध्येयाप्रती असलेली बांधिलकी दर्शवितात. ध्येय गाठण्यासाठी त्यांनी स्वतःला ज्याप्रमाणे झोकून दिलं, त्याप्रमाणेच आपणही झोकून दिलं पाहिजे. हाच धडा त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे.*

नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून विस्थापितांना न्याय मिळवून देण्याचे मोठं काम त्यांनी केले. या आंदोलनासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील, ऐन तारुण्यातील 16 वर्षे दिली आहेत. ' पर्यायी नोबल पारितोषिक ' म्हणून गणला जाणारा ' राइट लाइव्हलिहुड ॲवॉर्ड ' देऊन स्वीडन देशाने त्यांचा सन्मान केला आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: