Tuesday, November 20, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 69

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 69*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*लल्ली एक शालेय मुलगी. तिच्या शाळेतील इतर मुली, तिला हत्तीचं पिल्लू म्हणून चिडवायच्या. आपलं हसं होतंय. याचं तिला खूप वाईट वाटायचं अन् आपल्या लठ्ठपणाचा ती तिरस्कार करायची.तिला रडू यायचं. तिच्या या लठ्ठपणाचा ती फक्त राग करत, रडतच बसली? कि,तिने काही करून दाखवलं? कोण ही लल्ली? जाणून घेऊ तिचा प्रवास. चला तर मग...*

लल्लीचा जन्म ३ जुलै १९८६ चा पंजाबमधील अमृतसरचा. तिचा जन्म झाला,तेव्हा तिचे वजन पाच किलो होते. जे सामान्य नव्हते. ती दोन वर्षाची असतानाच तिच्या वडीलांचा मृत्यू झाला. वयाच्या तेवीसाव्या वर्षीच तिच्या आईला वैधव्य आले. तिच्या आईने दुसरे लग्न करण्याऐवजी संघर्ष करण्याचा मार्ग निवडला. आईच्या याच विचाराचा प्रभाव  लल्लीवर पडला. 

लल्ली आता शाळेत जाऊ लागली. पण, तिच्या पुढे आता वेगळीच समस्या उभी राहिली. शाळेतील सर्वच मुली,तिला हत्तीचं पिल्लू म्हणून चिडवत असत. आपलं हसं होतय. याचं तिला वाईट वाटायचं अन् आपल्या लठ्ठपणाचा तिला प्रचंड राग यायचा, रडू यायचं. जसं शालेय जीवनात अनुभवलं, तसं कॉलेज जीवनातही. पण, वाईट वाटून घेणे थांबवून, तिने स्वतःला याची सवय करून घेतली होती. तिनं आपलं सारं लक्ष शिक्षणावर केंद्रित केलं. तिनं नेमबाजीत कौशल्य प्राप्त केलं. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पंजाबचे प्रतिनिधित्व केलं. अनेक मेडल प्राप्त केले. पण, घरातील आर्थिक समस्येमुळे तिला नेमबाजीत करीयर अर्धवट सोडावे लागले. याकाळात तिच्या नातेवाईकांनी तिला कसलेही आर्थिक सहकार्य केले नाही. पण,ती डगमगली नाही. आता तिने आपले लक्ष चित्रपटसृष्टीकडे वळविले. ती मुंबईला आली. तिच्या नातेवाईकांनी तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले. याकडेही तिने दुर्लक्षच केले. तिच्या लठ्ठपणामुळे तिला काम मिळणे कठीण झाले. म्हणून ती खचली नाही. तिने प्रयत्न सुरूच ठेवले. तिला एक संधी मिळाली. एक विनोदी कार्यक्रम स्पर्धा होती. "The Great Indian Laughter Challenge " असे त्या शो चे नाव होते. यात तिने सहभाग घेतला. तिला असं लक्षात आलं की, लोकांना आपल्या लठ्ठपणाचा अधिक आनंद होत आहे. तिने विचार केला, "ज्या लठ्ठपणामुळे आपलं बालपणापासून हसं झालं आहे, याच लठ्ठपणामुळे आपण स्वतः चं हसू करून घेऊ आणि लोकांना आनंद देऊ." तिने आपल्या लठ्ठतेचा विनोदनिर्मितीसाठी वापर सुरू केला. या शो मध्ये तिने लल्ली हे पात्र रंगविले आणि प्रसिद्ध केले. तिला लोकं लल्ली या नावानेच ओळखू लागले. या शो चा निकाल लागला. ती उपविजेती ठरली. पुढे कॉमेडी सर्कस 3, कॉमेडी नाईटस बचाओ, कॉमेडी नाईटस लाईव्ह,द कपिल शर्मा शो या सारख्या कार्यक्रमात तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. *ती लोकप्रिय लल्ली, कॉमेडी क्विन म्हणजेच भारती सिंग.*


*भारती सिंग चा हा प्रवास अतिशय विलक्षण असा आहे. जे लोक तिला फॅटी म्हणायचे, तेच आज तिच्यासोबत फोटो काढत असतात. जे नातेवाईक तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत, तेच आज तिच्याकडे आपल्या मुलांच्या भविष्याबाबत मार्गदर्शन घेत असतात. जे लोक तिच्या लठ्ठपणावर हसायचे, तेच आज तिचा हेवा करतात. पण, हे सारं कधी शक्य झालं? जेंव्हा भारती यांनी आपल्या लठ्ठपणाकडे ' शाप ' म्हणून न पाहता ' वरदान ' म्हणून पाहिले. प्रत्येकाच्या जीवनात समस्या असतातच.  म्हणून,आपणही आपल्या जीवनातील समस्यांकडे, संकटांकडे संधी म्हणून पाहिले, तर आणि तरच भारती सिंग यांच्यासारखे नेत्रदीपक यश आपल्याला मिळविता येईल. फोर्ब्स च्या 2016 सालच्या जगातील 100 विनोदी कलाकारांच्या यादीत भारती सिंग यांचा समावेश झाला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: