Tuesday, November 20, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 67

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 67*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



*7 जुलै 2016 रोजी एक बातमी सर्व वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेलवरती झळकत होती. आंतरराष्ट्रीय मेरिटाईम संस्था (IMO) ने "अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ऍट सी " हा पुरस्कार प्रथमच एका महिलेला प्रदान केला होता आणि प्रत्येक भारतीयाला अभिमानही वाटला. कारण, तो पुरस्कार प्राप्त करणारी महिला भारतीय होती. कोण आहे ती महिला? काय तिचा पराक्रम? जाणून घेऊ आजच्या भागात.*


तिचा जन्म केरळचा. कोदूनगलर सारख्या खेडेगावातला./समुद्र किनारा जवळच असल्यानं, तिथं तिचं फिरणं अन भटकणं व्हायचं. समुद्राच्या लाटा जेंव्हा तिच्या पायाला स्पर्श करायच्या, तेंव्हा तिच्यावर स्वार होऊन सफरीला जाण्याचा विचार तिच्या मनात यायचा. त्यामुळंच तिने नौसेनेत जाण्याचं स्वप्नं पाहिलं.

पदवी प्राप्त केल्यावर नौसेनेत जाण्यासाठी रेडिओ कोर्स करण्याची इच्छा तिनं आपल्या घरच्यांना बोलून दाखवली. मुलींमध्ये असणारा नाजूकपणा, समुद्रातील धोके आणि जोखमीची नोकरी या सर्वांची जाणीव असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिच्या या निर्णयाला विरोध केला. पण,जीवनात काहीतरी वेगळं करून दाखविण्याची प्रबळ इच्छा मनी बाळगणाऱ्या तिने, कुटुंबीयांना राजी केलंच. रेडिओ कोर्स,जहाजातील संवाद प्रणाली याचं प्रशिक्षण उत्तमप्रकारे पूर्ण करून तिने शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळविली आणि समुद्र सफरीला जाण्याचं, नेव्हीत जाण्याचं स्वतःचं स्वप्नं तिनं पूर्ण केलं. तिच्या आवडीच्या कामात ती रमत होती आणि रोमांचकारी प्रवासाचा आनंद घेत होती. 2012 साली तिला एक संधी चालून आली. संधी होती नेव्ही कॅप्टन बनण्याची. तिनं या संधीचं सोनं केलं आणि *ती बनली देशातली पहिली महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन.*


2015 सालची एक घटना. कॅप्टन पदाचा पदभार सांभाळून दोन वर्षाहून अधिक काळ लोटला होता. ती 'संपूर्ण स्वराज्य' जहाजावर तैनात होती. रात्रीचे अकरा वाजले होते. समुद्रात प्रचंड वेगाने वारा वाहत होता. जोराच्या लाटा उसळत होत्या. एकदम भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. मासेमाऱ्यांची एक नाव या वादळात सापडली असल्याची बातमी तिला समजली. अवघ्या पाचच मिनिटांत तिने बचाव कार्य हाती घेतले. पण,जोरदार वारा आणि भयानक उसळणाऱ्या लाटा यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. तिच्या टीमने दोनदा प्रयत्न केला. पण, अपयशी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात, त्या मच्छिमारांना वाचविण्यात तिला यश आले. तिच्या या साहसाचं जगभर कौतुक झालं. तिच्या या पराक्रमाबद्दल आंतरराष्ट्रीय मेरिटाईम संस्था (IMO) ने *"अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ऍट सी " हा पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला. हा पुरस्कार मिळविणारी ती जगातील पहिली महिला ठरली. ती सुपरवुमन म्हणजेच राधिका मेनन होय.*

*राधिका यांचा पहिली महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर आहे. समुद्रातील वारा आणि लाटा यातून प्रवास करणं जोखमीचं तर होतंच. पण, घरच्यांचा विरोध, काम करण्यासाठी घरापासून दीर्घकाळ दूर राहणे, आई बनल्यानंतर बाळापासून दूर राहण्याचं दुःख, कौटुंबिक जबाबदाऱ्या, पहिली महिला कॅप्टन म्हणून जबाबदारी पार पाडताना, निर्णय घेताना आलेल्या समस्या यासारख्या अडचणी नजरेआड करून चालणार नाही.*

*राधिका यांचा धाडसी,चिकाटी आणि धैर्यवान स्वभाव, काहीतरी वेगळं करून दाखविण्याची प्रबळ इच्छा, इच्छापूर्ती साठी आवश्यक शक्ती हे गुणविशेष राधिका यांच्या अंगी आहेत. यामुळेच त्यांना "अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ऍट सी " हा पुरस्कार मिळाला. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: