Monday, November 19, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 62

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 62*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



*8 मार्च 2011 चा दिवस. पुणे ते मुंबई धावणाऱ्या रेल्वेतील एका महिलेचा तेथील काही लोकांनी सत्कार केला आणि ती रेल्वे मुंबईकडे रवाना झाली. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वर त्या महिलेचा सत्कार करण्यासाठी मुंबईच्या तत्कालीन महापौर उपस्थित होत्या. काय कारण असावे बरे त्या महिलेच्या सत्काराचे? कोण ती महिला? जाणून घेऊ आजच्या भागात.*


2 सप्टेंबर 1965 रोजी तिचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी मातापित्यांच्या पोटी झाला. बालपणापासून अभ्यासात हुशार. त्यामुळे तिची कराड शासकीय तंत्रनिकेतन येथे इलेक्ट्रिक इंजिनियरिंग च्या डिप्लोमासाठी निवड झाली. तिचा डिप्लोमा कोर्स पूर्ण झाला. आता काय करायचं?असा प्रश्न तिच्या समोर निर्माण झाला. नोकरी हाच पर्याय. महिलांना कंपनीत नोकरी मिळायची. पण, वेळीअवेळी कामावर जावं लागण्यामुळे ती नोकरी टिकवणं महिलांसाठी मुश्किल होतं.


1986 साली तिच्यासाठी एक संधी चालून आली. संधी होती रेल्वेतील चालक पदासाठी. तिने जाहिरात वाचली. महिला अर्ज करू शकतात असे वाचल्यावर तिने अर्ज केला. तिने परीक्षा दिली. सायको टेस्ट झाली. मेडिकल झाले आणि तिची निवड झाली. इथंपर्यंतचा तिचा प्रवास तसा अतिशय सोपा होता. पण,पुढचा प्रवास अवघड होता. तिच्यासोबत रेल्वे प्रशासनासमोरही मोठे आव्हान होते. कारणही तसेच होते. यापूर्वी कोणत्याही महिलेने रेल्वे चालवली नव्हती. तिला हे जमेल का? ती हे करू शकेल का? हे प्रश्न जसे प्रशासना पुढे होते, तसेच ते तिच्या समोरही होतेच. पण, तिने हे आव्हान पेलले. मन लावून ट्रेनिंग पूर्ण केले.आणि ती बनली *भारतातील पहिली महिला रेल्वे चालक. ती म्हणजेच सुरेखा यादव.*

सुरेखा यांचा प्रवास जरी सोपा वाटत असला, तरी तो म्हणावा तितका सोपा नाही. मोठ्या जिद्दीनं आणि चिकाटीने त्यांनी काम केलं. त्यांनी केवळ लोकल रेल्वेच चालवली असं नाही, तर त्यांनी मालगाडी सुद्धा यशस्वीपणे चालविली आहे. 8 मार्च 2011 रोजीच्या महिलादिनी, त्यांनी पुणे ते मुंबई प्रवास करणारी, अत्यंत अवघड मार्गाने जाणारी, वेळेत पोहचण्यासाठी प्रसिद्ध असलेली, मेल गाडी श्रेणीतील डेक्कन क्वीन नावाने प्रसिद्ध रेल्वे चालवली. मेल रेल्वे चालवणारी केवळ भारतातीलच नव्हे, तर आशियातील त्या पहिल्याच महिला चालक बनल्याने त्यांच्या पहिल्या प्रवासाची सुरुवातही अन् शेवटही सत्कारानेच झाली.

*सुरेखा यांचा रेल्वेतील नोकरी करायची कि नाही?याचा विचार जेंव्हा सुरु होता, तेंव्हा त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आलेली संधी साधण्याचा निर्णय घेतला. आपल्याही जीवनात महत्वाचे निर्णय घेताना असे प्रसंग निर्माण होतात. त्यावेळी आपण पुढेच जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे. मी महिला आहे. मला हे जमेल का? अपयश आलं तर लोक हसतील. माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, ही आणि यासारखी अनेक कारणे देऊन सुरेखा यांना आलेली संधी सोडता आली असती,जी 1986 साली रेल्वेच्या भरतीसाठी आलेली जाहिरात पाहून भारतातील त्याकाळी अनेक पात्र असणाऱ्या महिलांनी सोडली. सुरेखा यांनी संधी ओळखली आणि त्या संधीचं सोनं केलं. म्हणूनच त्यांचा फर्स्ट लेडी म्हणून भारत सरकारने सन्मान केला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: