🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *मैत्रीचा प्रीतिसंगम...*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
मैत्री... हा असा एक धागा आहे जो वेळेसोबत अधिक घट्ट होत जातो. आज या गोष्टीचा पुन्हा एकदा मनापासून प्रत्यय आला. आमच्या डी.एड.च्या बॅचचे तीन जिवलग मित्र *अविनाश कर्पे, मुर्गेश पाटील आणि संजय दडस* यांनी नुकतंच विभागीय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवत 'केंद्रप्रमुख' या मानाच्या पदाला गवसणी घातली. याच यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आज आम्ही सर्व मित्रांनी कराड येथे कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर एक खास भेट ठरवली होती.
मित्रांच्या यशाचं कौतुक करण्याची ओढ इतकी होती की, प्रत्येकाने ५० ते ७० किलोमीटरचा प्रवास अगदी हसत-खेळत आणि उत्साहाने पार केला. संजय थेट माळशिरसवरून आला. अविनाश कर्पे देऊरहून, तर शहाजी बुधावले पुसेगावहून हजर झाले. आटपाडीहून विजय नरळे, सागर देशमुख आणि इराप्पा कराडे आवर्जून आले होते. अमोल माळी खानापूरहून, तर एम.पी. पाटील, राहुल कोळी आणि पांडुरंग पोळ हे तिघे तासगावहून आले. मी स्वतः दुधगावहून आणि रणजीत पाटील वशीहून कराडला पोहोचलो.
तसं पाहायला गेलं तर, कर्मवीर बचत गटाच्या माध्यमातून आम्ही डी.एड.चे मित्र दरवर्षी न चुकता एखादी ट्रिप काढतोच. अगदी मागच्याच मे महिन्यात आम्ही दांडेलीला गेलो होतो. त्यामुळे बऱ्याच जणांच्या भेटीगाठी होत असतात, आमचं एकत्र येणं घडत असतं. पण आजची भेट खऱ्या अर्थाने खूप वेगळी आणि खास होती.
आजच्या या भेटीत माझ्या मनाला सर्वात जास्त सुखावून गेली ती *इराप्पा कराडे* आणि *सागर देशमुख* यांची उपस्थिती! साधारणपणे कराडे सरांना भेटून तब्बल दहा वर्षे उलटून गेली होती आणि सागरलाही पाहून चार-पाच वर्षे झाली असतील. इतक्या वर्षांनी त्यांना पाहिलं आणि जुन्या आठवणींचा अक्षरशः पूर आला.
या भेटीत पुन्हा एकदा आमच्या डी.एड.च्या त्या सोनेरी दिवसांना उजाळा मिळाला. जुन्या गप्पा, एकमेकांची काढलेली फिरकी आणि निरागस हसू... सगळं काही नव्याने जगता आलं. मित्रांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. त्यांच्या ज्ञानाचा आणि यशाचा हा आलेख असाच वाढत राहो, याच माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा!
मित्रांचा सत्कार करताना खरंच आज ऊर अभिमानाने भरून आला होता. कृष्णा-कोयनेच्या साक्षीने झालेली आजची ही भेट मनाच्या डायरीत सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावी अशीच संस्मरणीय ठरली. आजचा दिवसच इतका भारावून टाकणारा होता की, कित्येक दिवसांनी मला पुन्हा एकदा माझ्या भावना शब्दांत मांडण्याचा मोह आवरता आला ना
ही.
धन्यवाद...!

No comments:
Post a Comment