Sunday, March 2, 2025

शाळेच्या शताब्दी सोहळ्यात आठवणींचा साक्षीदार…

यशवंत - एक प्रेरणास्रोत

शाळेच्या शताब्दी सोहळ्यात आठवणींचा साक्षीदार…

श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.



शाळा ही फक्त शिक्षण देण्याची जागा नसते, ती आठवणींचे मोती गुंफणारे मंदिर असते. त्या भिंतींमध्ये असतात बालपणाचे खट्याळ क्षण, गुरुजींची शिकवण आणि मैत्रीच्या गोड आठवणी. अशाच एका शाळेने शंभर वर्षांचा प्रवास पूर्ण केला ती माझी शाळा अर्थात जिल्हा परिषद शाळा, कडवे बुद्रुक...! काल रविवार 1 मार्च 2025 रोजी या शाळेचा शताब्दी महोत्सव कडवे बुद्रुक ग्रामस्थांनी अतिशय उत्साहाने साजरा केला. 


काल संपूर्ण गाव नेहमीप्रमाणे एकत्र आला होता. सकाळी गावातून काढलेली ज्ञानदिंडी म्हणजे शाळेच्या आठवणींना दिलेली गुरुदक्षिणाच होती. हातात लेझीम, झांज शिक्षणाचे संदेश आणि डोळ्यांत असलेला अभिमान प्रत्येकाच्या मनात आपल्या शाळेविषयी असलेले प्रेम स्पष्ट जाणवत होते.


दुपारी चार वाजता मुख्य सोहळा सुरू झाला. यानिमित्ताने अनेक माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, शिक्षण विस्तारअधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. कित्येक वर्षांनी माजी विद्यार्थी आपल्या शाळेत परत आले होते. गुरुजींचे हात धरून, त्यांच्यासमोर नतमस्तक होत, “सर, आम्ही आज जे काही आहोत ते तुमच्यामुळेच.” असे म्हणणारे विद्यार्थी पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. इतर माजी शिक्षकांसह माझ्याही मनात अभिमान आणि कौतुकाची भावना दाटून आली.


काल मंचावर उभा राहून बोलताना शब्द थोडे अडखळत होते. कारण, मन आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत होते. सप्टेंबर 2018 साली मी या शाळेत तालुका अंतर्गत बदलीने रुजू झालो. येथे श्री. सुनील लोखंडे हे माझे होते. त्यांच्याकडे शाळेचा चार्ज होता. अतिशय धडपड्या, कृतिशील शिक्षक. खेळ अन् संगीत याची विशेष आवड त्यांना होती. येथे केवळ नऊ महिने सेवा देताना मला येथील गावकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, आणि सहकाऱ्यांचे जे प्रेम लाभले, त्याला तोड नाही. या काळात मिळालेल्या अनुभवांनी माझ्या आयुष्याला एक वेगळीच गती आणि दिशा प्राप्त झाली. या शाळेतूनच पुढे अंगापूरच्या आंतरराष्ट्रीय शाळेत माझी निवड झाली. हा माझ्या जीवनातला "माईलस्टोन" ठरला. 


कडवे बुद्रुक शाळेत काम करत असताना येथील ग्रामस्थांची शाळेविषयी असलेली तळमळ जवळून अनुभवत आली. पहिल्याच महिन्यात ग्रामपंचायतीने साऊंड सिस्टिम भेट दिली. लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स किट देखील उपलब्ध झाले. येथेच केंद्रस्तरीय, बीटस्तरीय क्रिडास्पर्धा, आणि "बालआनंद मेळावा" देखील दिमाखदारपणे साजरा झाला. हे कडवे बुद्रुक ग्रामस्थांशिवाय अशक्यच होते. 


याच कालावधीत शाळेच्या इतिहासातील पहिले स्नेहसंमेलन घेता आले. यासाठी यात्रा कमिटीने मोठे आर्थिक सहकार्य दिले. सोबतच कडवे बुद्रुकवासियांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत तब्बल 45 हजार रुपये बक्षीस स्वरूपात दिले. ही रक्कम माझ्या आजवरच्या शैक्षणिक कामगिरीत स्नेहसंमेलनातून जमा झालेली सर्वात मोठी रक्कम ठरली आहे.


1 मार्च मार्च दिवस आणखी एका कारणाने अविस्मरणीय ठरला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची "वही तुला" केली. एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने "ग्रंथ तुला, मिठाई तुला" केल्याचे पहिले होते. पण, माजी विद्यार्थ्यांकरवी आपली "वही तुला" होत आहे. ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. या वह्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. 


केवळ नऊ महिन्याचा अल्पकाळ सेवा करण्याची संधी मिळाली. परंतु, इथले ग्रामस्थ, इथले विद्यार्थी "आपल्याला अजूनही विसरले नाहीत." ही बाब माझ्यासाठी सुखावह आहे.


कालचा शताब्दी सोहळा हा केवळ एक साजरा केलेला दिवस नव्हता, तर पुढच्या पिढ्यांसाठी दिलेली प्रेरणा होती. येणाऱ्या काळातही कडवे बुद्रुक शाळेतील मुले शिक्षणाच्या जोरावर उंच भरारी घेत राहोत, शिक्षकांचा आदर करत राहोत आणि या शाळेचा गड असाच अभिमानाने उंच राहो. – हीच शुभेच्छा!


शाळेच्या शताब्दीनिमित्त पुन्हा एकदा… गावकऱ्यांना सलाम आणि ज्ञानाच्या पवित्र मंदिराला 

साष्टांग प्रणाम...!




No comments: