यशवंत - एक प्रेरणास्रोत
सर, मी तुमची फॅन आहे
श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.
माझ्या गावचा धडा या सांगली जिल्हा परिषदेच्या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या निमित्ताने शुक्रवारी दि. 27 डिसेंबर रोजी आटपाडी येथे जाणं झालं.
मध्यभागी उभ्या असलेल्या साधनाताईमाझ्या गावचा धडा उपक्रमांतर्गत आटपाडी तालुक्यातील शिक्षकांना धड्याचे लेखन कसे करावे ? याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सांगली जिल्ह्याची कोअरकमिटी आटपाडीला गेली होती. यात प्रामुख्याने डॉ. विमल माने मॅडम, लेखिका डॉ. स्वाती शिंदे (विटा), ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट (शिराळा), श्रीमती नसीमा मुजावर मॅडम (मिरज), श्री. दीपक माळी सर ( क. महांकाळ) इत्यादी मातब्बर लेखक मंडळी होती. मी देखील या कमिटीचा एक भाग होतो.
श्रीराम कॉलेजच्या सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लेखाधिकारी श्री. प्रशांत चंदनशिवे सर यांनी माझी ओळख सभागृहाला करून दिली. धड्याच्या लेखनासंदर्भात मार्गदर्शन करताना मी कसा लिहिता झालो ? माझे आजवरचे लेखन व त्याचे अनुभव आदी बाबी कथन केल्या. माझ्या गावच्या धड्यामध्ये नेमके कशा पद्धतीचे लेखन अपेक्षित आहे ? याबद्दल सविस्तर माहिती कार्यशाळेमध्ये सांगितली. कार्यशाळेत सहभागी शिक्षकांनी अगदी शांतपणे माझे विचार ऐकले. निर्धारित वेळेत मी माझे विचार मांडून आसनस्थ झालो.
कार्यशाळा सहा वाजता संपली. कार्यशाळा संपल्यानंतर एक मॅडम माझ्याजवळ आल्या. सौ. साधना चव्हाण असे त्यांचे नाव. त्यांना मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्यामुळे ओळखीचा प्रश्नच नव्हता. त्यांनी संभाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, "सर, तुमचे "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" मी नेहमी आवडीने वाचते. माझ्या मुलांना आणि विद्यार्थ्यांनाही तुमच्या प्रेरणादायी कथा जाणीवपूर्वक वाचून दाखवते. तुमच्या कथा वाचल्यानंतर प्रचंड प्रेरणा मिळते. ऊर्जा मिळते. थोडक्यात सांगायचं झालं तर सर, मी तुमची फॅन आहे."
साधना ताईंच्या प्रतिक्रियांनी मला झालेला आनंद अवर्णनीय होता. हा प्रसंग माझ्यासाठी खूपच वेगळा होता. कारण ही तसंच आहे. "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" बाबत आजवर हजारो वाचकांच्या हजारो लिखित प्रतिक्रिया मला प्राप्त झाल्या होत्या. फोनवरही तितक्याच प्रतिक्रिया मला मिळाल्या. परंतु, एखाद्या वाचकांनी समक्ष प्रतिक्रिया देण्याचा प्रसंग माझ्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होता. त्यामुळे, साधनाताईंच्या या प्रतिक्रियांनी मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
खरंतर, साधनाताईंचे आभार मानण्यासाठी हा लेख लिहिलेला आहे. कारण असं की, बऱ्याच दिवसापासून लेखनात आलेली मरगळ त्यांच्या प्रतिक्रियेमुळे दूर झाली आणि लेखनासाठी नवी ऊर्जा मिळाली.
साधनाताई आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.
धन्यवाद...!
No comments:
Post a Comment