Sunday, November 4, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग-1

भिलाटीसारख्या आदिवासी गावात जन्मलेला एक मुलगा.

आईच्या गर्भात असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्याला आपल्या वडिलांचा चेहराही पाहणे नशीबात नव्हते.

घर म्हणजे झोपडीच.उसाच्या पाल्याने शाकरलेली. कौलारूही घर असतं हे ज्याला शाळेची इमारत पाहिल्यावर माहिती झाले असा तो.

कोणतंही आर्थिक पाठबळ नाही.घरात कोणीही शिकलेलं नाही. अशाही परिस्थितीत तो मुलगा शिकला आणि 200 पैकी 192 मार्क मिळवून मुंबई मधील केईएम हॉस्पिटलच्या एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवले. चार वर्षे कठोर परिश्रम करून चार वर्षे डिस्टिंगशनमध्ये पास झाला. 

असाच एक दिवस एक तरुण मित्र त्याच्याकडे आला आणि म्हणाला, 

''माझ्याकडे युपीएससी चा एक फॉर्म एक्स्ट्रा आहे. तू भरणार काय?'' 

याने विचारले, ''किती रुपये लागतील?'' 

'फक्त 20 रुपये' मित्र म्हणाला. 

फॉर्मची किंमत केवळ 20 च  रुपये होती. म्हणून त्याने फॉर्म भरला. एव्हढी वाईट आर्थिक परिस्थिती त्या तरुणाची होती.

फॉर्म भरला म्हणून अभ्यासाला सुरुवात केली. 8 तास एंटर्नशिप आणि 8 तास अभ्यास. केवळ दीड महिने अभ्यास करून हा तरुण युपीएससी ची प्रिलीम पास झाला. केवळ वर्षभरातच तो मुख्य परीक्षा पास झाला.  नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल तालुक्यात या तरुणाला पहिली पोस्टिंग मिळाली. 

 आपल्या गरिबीवर,आपल्या बुद्धिमतेच्या आणि कठोर मेहनतीच्या जोरावर यश मिळवणारा तो तरुण म्हणजेच डॉ.राजेंद्र भारुड. 


मी गरीब आहे.माझे आईवडील अडाणी आहेत.माझा जन्म खेड्यात झाला आहे.अशी एक ना अनेक कारणे डॉ.भारुड यांना सांगता आली असती. पण,परिस्थितीवर मात करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. यशस्वी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पण परिस्थितीची कारणे सांगून,ध्येयापासून दूर जाणाऱ्या  तरुणांसाठी डॉ.राजेंद्र भारुड यांचा हा प्रवास प्रेरणादायी असा आहे.

म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

1 comment:

Anonymous said...

Very impressive character