Thursday, November 8, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 3


विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेली ही एक सावित्रीची लेक.

नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले.(चिंधी म्हणजे कापडाचा फाटलेला तुकडा).

शिक्षण जेमेतेम मराठी चौथी

चिंधी चा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी शी झाला.
घरी प्रचंड सासुरवास होता.. ढोरासारखी मेहनत करावी लागे.

अठराव्या वर्षापर्यंत चिंधी ची  तीन बाळंतपणं झाली.

ती चौथ्या वेळी गर्भवती असताना तिने तिच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. लढा जिंकला पण तिला या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. तिच्या या धैर्याने गावातील जमीनदार दुखावला गेला.

मग जमीनदारने चिंधीच्या पोटातील मूल आपलेच असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात चिंधी च्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या चिंधीला त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. नवऱ्याने हाकलल्यानंतर सख्ख्या आईनेही पाठ फिरवली.

चिंधी ने आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण "लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल." म्हणून चिंधी मागे फिरली. मग भीक मागत पोट भरणे सुरू झाले.भीक मागणे, स्टेशनवर झोपणे, उपाशी राहणे या सारख्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण,21 वर्षाची चिंधी डगमगली नाही.

चिंधी पुण्यात आली. रस्त्यावर तिला एक मुलगा रडत बसलेला दिसला. मुलाला घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली. तिथे तक्रार नोंदवून घेतली नाही.

चिंधी ने मुलाला सांभाळण्याचे ठरवले. पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले तिला भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते तिने अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये. अशी तिची इच्छा होती.

आणि म्हणून ही चिंधी बनली ’अनाथांची यशोदा’
ही अनाथांची यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ...

सिंधुताईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे.

त्यांच्या या छत्रछायेखाली त्यांचा नवरा सुद्धा आला. पण,नवरा म्हणून नाही मुलगा म्हणून...

आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे. सिंधुताई सपकाळ एक खरीखुरी यशवंत आहे.





1 comment:

Nagraj said...

Inspiring story, written very well.

Great theme of publishing stories of struggle resulting in success....

Am very happy to see this program being run by teachers...