भाग - 103
🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 102*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
जगाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे एका अंध व्यक्तीच्या प्रेरणादायी प्रवासाची ही कथा...
त्याचा जन्म फ्रान्स मधील एका खेड्यातील गरीब आणि कष्टकरी कुटुंबातला. त्याचे वडील जिनगर (घोड्याचे खोगीर, इ. कातडी माल तयार करणारे कारागीर) होते. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेला तो सर्वांचाच अतिशय लाडका.
तो नियमितपणे वडिलांबरोबर कार्यशाळेत जाई. कार्यशाळेत जाणे आणि त्यांचे अनुकरण करणे. त्याला भलतेच आवडे. कार्यशाळेत अनेक प्रकारच्या धारदार वस्तू असायच्या. एखादी धारदार वस्तू त्याच्या हाती लागून अघटित घडू नये. म्हणून वडील त्याच्यावर सतत लक्ष ठेवून असायचे.
तो साधारण तीन वर्षांचा असेल एक दिवस वडील कार्यशाळेत मित्राशी बोलत होते. तेवढ्यात त्या तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या हाती एक सुई लागली. काही क्षणातच त्या सुईने त्या लहानग्याच्या डोळ्याचा वेध घेतला आणि क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले. या अपघाताने त्या लहानग्याला आपले दोन्ही डोळे गमवावे लागले. त्याला कायमचे अंधत्व आले.
वयाच्या सातव्या वर्षी गावातील एका धर्मगुरुंच्याच्या पुढाकाराने त्याचे शिक्षण सुरू झाले. सुरुवातीची दोन वर्ष तो गावातील शाळेतच शिकला. आपल्या श्रवण शक्तीच्या जोरावर त्याने ज्ञानग्रहण केले. त्याच्या अभ्यासातील प्रगतीने सर्वच अचंबित झाले. कालांतराने त्याला पॅरिसमधील अंधांच्या शाळेत प्रवेश मिळाला. येथेही त्याने आपल्या बुद्धीची चमक दाखविली. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय तो या शाळेत शिकला. सहा वर्षात त्याने अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्याच शाळेत सुरुवातीला स्वयंसेवक आणि नंतर शिक्षक म्हणून काम करू लागला.
शिक्षण घेत असताना त्याला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली कि,आपण 'लाईन टाईप ' लिपीचा वापर करून केवळ वाचनच करू शकतो. ते ही मर्यादितच. आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या लिपीचा वापर करून लिहिता येत नाही. याचं प्रचंड दडपण त्याच्यावर येई. आपल्याला आपल्या भावना लिखित स्वरूपात व्यक्त करता आल्या पाहिजेत. यासाठी त्याची धडपड सुरू असायची. दिवसरात्र तो याच विचारात मग्न असायचा.
" इच्छा असेल तर मार्ग दिसेल. " असे म्हणतात. पण, ते या अंध तरुणाच्या बाबतीत सत्यात उतरले. एके दिवशी त्याला एक सैन्य अधिकारी भेटला. त्याच्या हाती चामड्याचे काही तुकडे होते. या अंध तरुणाने ते स्पर्श करून बघितले. त्यावर उभे आडवे टिंब उभारले होते. अधिक माहिती विचारली असता त्याला समजले कि, सैनिकांना विशेष संदेश आणि आदेश देण्यासाठी अशा प्रकारच्या पत्रांचा वापर केला जातो.
या प्रसंगाने त्या अंध तरुणाच्या डोक्यात असलेल्या कल्पनेने, मूर्त स्वरूप धारण केले. ज्या धारदार सुई ने त्याला अंध केले होते, त्याच सुई चा आधार घेऊन त्या अंध तरुणाने एका नव्या लिपीचा शोध लावला. ज्यामुळे अंधांच्या जीवनातील अंधार नाहीसा झाला. कायमचा. जी लिपी अंधांच्या जीवनात नवा प्रकाश घेवून आली ती लिपी म्हणजेच ब्रेल लिपी. आणि तिचा उद्गाता म्हणजेच......... बरोबर ओळखलंत लुई ब्रेल.
समस्या सर्वांनाच असतात. त्याच्यासोबत कण्हत जगायचं की, त्याच्यावर मात करत मार्गक्रमण करायचं. हे ज्याच्या त्याच्या हाती असतं. रडत बसणारी यशस्वी होतील का???
लुई यांना लिपीचा शोध लावण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. परंतु, त्यांना त्याचा प्रसार करण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला आहे. सुरुवातीला 'लाईन टाईप ' लिपी च्या समर्थकांनी त्यांना खुप त्रास दिला. विरोध केला. ब्रेल लिपी अभद्र म्हणून थट्टा केली जाऊ लागली. इतकंच काय ! तर लुई यांच्याच शाळेत ब्रेल लिपी लिहिण्या वाचण्यावर बंधन घालण्यात आले. तरी देखील यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. ब्रेल लिपी आज असंख्य अंधांना काळोखातून प्रकाशाकडे नेत आहे. म्हणूनच, ते एक यशवंत आहेत.
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!
4 comments:
अप्रतिम
Nice intiative
An inspiring truth.
लुई ब्रेल यांच्या महान कार्याला सलाम.
ही माहिती आमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी पाटील सर आपलेही आभार .
Post a Comment