Monday, November 19, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 65

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 65*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*एक विवाहिता, जिला स्वतःची दोन मुलं आणि मृत सवतीच्या चार मुली होत्या. नवरा कॉन्ट्रॅक्टर च्या हाताखाली काम करणारा एक साधा मजूर. मोठे कुटुंब तशा गरजा ही मोठया. पण,पगार मात्र छोटा. गरजा काही पूर्ण होत नव्हत्या. मग तिने कंबर कसली आणि तिच्या संसाराची गाडी रुळावर आणली. तिने एक असा काही पराक्रम केला कि,ती आशियातील पहिलीच महिला ठरली. चला तर मग जाणून घेऊ, आजच्या भागात, त्या विवाहितेबद्दल आणि तिच्या पराक्रमाबद्दल.*


भारतातील कोटयावधी तरुणांचे प्रेरणास्थान असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक असलेल्या कन्याकुमारीत 17 एप्रिल 1959 रोजी तिचा जन्म झाला. ती अगदी लहान असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला.म्हणून, तिच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. वयाच्या 14 व्या वर्षी ती चारचाकी वाहन चालवायला शिकली. बालपण तसे हलाखीतच गेले आणि तरुण झाल्यावर वयाच्या 19 व्या वर्षी तिला बापाने एका 4 मुली असलेल्या विधुराच्या गळ्यात मारली. लग्नानंतर हिला 2 मुलं झाली. कुटुंबाचा पसारा वाढला होता. पण, मजूर असलेल्या नवऱ्याच्या पगाराचा विस्तार काही होत नव्हता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते. काय करावे? असा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला होता. 

संकट म्हणजे संधी. तिच्यासाठी देखील संधीच. कारण, घर चालविण्यासाठी तिला घरातून बाहेर पडावे लागले. एका संस्थेत ती सचिव म्हणून काम करू लागली. घरातून बाहेर पडल्याने तिच्या प्रगतीला सुरुवात झाली.


तामिळनाडू परिवहन मंडळाने बस चालक पदासाठी जाहिरात दिली. तिला चारचाकी वाहन चालविता यायचे. नोकरीत महिलांसाठी 30 टक्के जागा आरक्षित ठेवल्या होत्या. त्यामुळे तिने यासाठी अर्ज केला. कित्येक दिवस तिला मुलाखतीसाठी बोलावणेच आले नाही. पण,ती आशावादी होती. तिने प्रयत्न सुरु केले. तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. पण,महिलांना चालक म्हणून नोकरीत घेण्यास शासन आणि प्रशासन दोन्हीही निरुत्साही होते. "या जगात खूपच कमी महिला, चालक म्हणून काम करता आहेत. आपण पुरुषांबरोबर काम करू शकाल का?"  असा प्रश्न तेथील अधिकाऱ्यांने तिला विचारला. पण, तिचा निर्धार पक्का होता. आपल्यावर उठलेल्या या प्रश्नाला पुढे तिने कृतीतूनच उत्तर दिले. तिच्या या निर्धारापुढे प्रशासनाला झुकावे लागले. 1993 साली वयाच्या 34 व्या वर्षी तिला नोकरी द्यावीच लागली. *ती आता पहिली महिला बस चालक बनली, केवळ भारतातीलच तर आशिया खंडातील पहिली महिला बस चालक. ती फर्स्ट लेडी म्हणजेच वसंतकुमारी.*


*वसंतकुमारी यांनी गाडीचं स्टेयरिंग त्या काळात सांभाळलं आहे, ज्या काळात महिला एकट्याने प्रवास करताना घाबरायच्या. आपल्या तान्हुल्यांना सोडून कधी त्या सकाळी 6 च्या शिफ्ट ला जायच्या, तर कधी रात्री 10 वाजता घरी यायच्या. ट्राफिक रुपी संकटांवर मात करत, त्या आपल्या संसाराचा गाडा चालविण्यात यशस्वी झाल्या. त्यांचा आत्मविश्वास एव्हढा मजबूत होता कि, त्यांच्या स्वप्नांच्या गाडीचा ब्रेकडाऊन कधी झालाच नाही. घरचे अत्यंतिक दारिद्र्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, महिला म्हणून असणाऱ्या मर्यादा, पुरुषांच्या बरोबरीने काम, वेळेत आणि कामात कसली ही सूट नाही, कोणतीही सहानभूती नाही, या सर्वांवर मात करून, महिलांनी परिस्थितीशी झगडून सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी प्रेरणा असणाऱ्या वसंतकुमारी एक यशवंत आहेत.*


No comments: