Wednesday, November 21, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 75

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 75*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

*एक दिवस ती आपल्या मैत्रिणीबरोबर तृतीय पंथीयांच्या एका गल्लीमध्ये गेली. त्याठिकाणी तिला एक भयानक वास्तव पाहायला मिळाले. तृतीयपंथीयांच्या जीवनात येणारे प्रसंग तिला पाहायला मिळाले. त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना, प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. केवळ 20 रुपयांसाठी तिच्यासारख्याच एका तृतीयपंथीयाला आपले शरीर विकावे लागले. या प्रसंगाचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. पुढे काय झाले ?? कोण ती तृतीयपंथीय जाणून घेऊ आजच्या भागात..*

1979 साली त्याचा जन्म ठाणे जिल्ह्यातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याची आई त्याला लाडाने राजू म्हणायची. राजू पाच - सहा वर्षांचा असेल तेव्हाची घटना. एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त तो आपल्या गावी गेला होता. या ठिकाणी त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले. हे अत्याचार एकदा - दोनदा नाही, तर दोन-तीन वर्षे सलग चालूच राहिले. यामुळे त्याच्या मनात भीतीचे आणि न्यूनगंडतेचे वातावरण निर्माण झाले. कालांतराने त्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी राजूने आवाज उठवला. या प्रसंगाचे खोल परिणाम त्याच्या बालमनावर झाला. 

राजूला नृत्याची खूप आवड. तो भरतनाट्यम नृत्यात पारंगत झाला. वयाच्या बाराव्या वर्षीच त्याने स्वतःचा नृत्य प्रशिक्षण वर्ग (डान्स क्लास) सुरू केला. त्याचे अनेक विद्यार्थी बुगी-वुगी सारख्या नृत्यावर आधारित असलेल्या कार्यक्रमांमध्ये चमकले. तो एक उत्तम नृत्यशिक्षक बनला. तो कमवता झाला, स्वावलंबी बनला.

राजू एक पुरुष होता. परंतु, त्याच्या मनाच्या खोल गाभाऱ्यात एक स्त्री लपलेली होती. त्याला मुलींसारखे कपडे घालण्याची,वागण्याची, नटण्या-मुरडण्याची इच्छा निर्माण व्हायची आणि तो वागायचाही तसाच. या काळात त्याला एक गोष्ट कळली. कळली म्हणण्यापेक्षा समाजाने त्याच्या निदर्शनास आणून दिली. तो पुरुष जरी असला तरी त्याचे वागणे,बोलणे,चालणे, हावभाव,त्याच्या हालचाली,त्याचे राहणीमान हे सर्व एका स्त्री सारखेच होते. त्यामुळेच राजू समाजामध्ये चर्चेचा आणि थट्टेचा विषय बनला. समाजाच्या या चर्चेने त्याला कळले की, तो पुरुष जरी असला, तरी तो स्त्री आहे. तो पुरुषी नाही आणि तो स्त्री ही नाही. लोक त्याला हिजडा,छक्का,तृतीयपंथी, किन्नर,  समलिंगी अशा एक ना अनेक नावांनी त्याला संबोधून, त्याच्याकडे तिरस्कारी नजरेने पाहू लागले. सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. पण,त्याचे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळे, तो घाबरला नाही, डगमगला नाही. तो धैर्याने सामोरा गेला. त्याने उत्तम प्रकारचे शिक्षण घेतले. 
याच काळात त्याची मैत्री त्याच्यासारख्याच इतरांशी झाली. या ठिकाणी त्याने एका गुरूंचे दास्यत्व स्वीकारले आणि राजू "तो" चा "ती" झाली.

1999 सालची एक घटना. एक दिवस ती आपल्या लता गुरु या मैत्रिणीबरोबर तृतीय पंथीयांच्या एका गल्ली मध्ये गेली. त्याठिकाणी त्याला एक भयानक वास्तव पाहायला मिळाले. 20 रुपयांसाठी तिच्यासारख्याच एका तृतीयपंथीयाला आपले शरीर विकावे लागले. या प्रसंगाचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला आणि तिने लता गुरू यांच्या नेतृत्वाखाली दाई वेल्फेअर असोसिएशन सुरू झाली. एड्स प्रतिबंध आणि काळजी यांच्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हिजडा समाजासाठी कार्य करणारी ती संस्था. हिजडा समाजासाठी समाजसेवेचे तिने टाकलेले हे पहिले पाऊल होते. समाजाच्या हक्कांसाठी तिने न्यायालयीन लढाई सुरू केली. याच काळात तिने एक याचिका दाखल केली. समानतेची वागणूक मिळावी. यासाठीची ती याचिका होती. सोळा वर्षे ती लढली. 15 एप्रिल 2014 साली ती जिंकली. देश स्वतंत्र झाल्यानंतर 67 वर्षांनी, सातत्याने समाजाची अवहेलना सहन करणाऱ्या, रोजगाराची आणि शिक्षणाची संधी नाकारल्या जाणाऱ्या तृतीय पंथीयांना सर्वोच्च न्यायालयाने एक कायदेशीर अस्तित्व बहाल केले. हे कायदेशीर अस्तित्व जिच्यामुळे तृतीयपंथीयांना लाभले, ती तृतीय पंथीय म्हणजेच *लक्ष्मीनारायण त्रिपाठी होय.*

लक्ष्मी त्रिपाठी यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकत असताना एक गोष्ट लक्षात आली की, स्व चा शोध लागला की, व्यक्तीला त्याच्या जीवनाचं ध्येय सापडतं, साध्य सापडतं. ज्यावेळी आपण कोण आहोत ? आणि काय करू शकतो ? याची त्याला जाणीव होते, केवळ त्यावेळीच त्याला यशाचा मार्ग ही सापडतो. मग तुमच्यावर होत असलेल्या, टिकांचे तुम्हांला काहीही वाटत नाही. ज्या क्षणी लक्ष्मी त्रिपाठी यांना स्व ची निर्मिती जाणीव झाली, त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या टीकांकडे दुर्लक्ष करून, मनावर न घेता, त्या समस्येला सामोरे गेल्या. आपल्यातील क्षमतेची त्यांना जाणीव झाली. त्यामुळेच ,कालांतराने या समस्येशी लढताना, लढ्याची धार अधिक तीव्र झाली.

आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला आपण वाचा फोडली पाहिजे. आपले हक्क आपण मिळवले पाहिजेत. त्यासाठी मोठा संघर्ष केला करण्याची तयारी असली पाहिजे. जोपर्यंत, आपल्याला विजय प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण संघर्ष कायम ठेवला पाहिजे. लक्ष्मी त्रिपाठी यांचा जीवन प्रवास हा याचसाठी अधिक प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: