Thursday, December 6, 2018

यशवंत–एक प्रेरणास्त्रोत भाग 76

एक नऊ वर्षाची, आपल्या आईसोबत राहणारी मुलगी. आई अत्यंत गरीब त्यामुळे दिवसभर तिला नोकरीसाठी बाहेर रहावे लागे. याच काळात त्या नऊ वर्षाच्या मुलीचे शारीरिक शोषण होऊ लागले. मुलीने याबाबत आपल्या आईला कल्पना दिली. पण, आपली मुलगी खोटे बोलत असावी. म्हणून, आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्या नऊ वर्षाच्या मुलीला त्या वातावरणात राहणे मुश्कील होऊ लागले. म्हणून, ती घर सोडून पळून गेली. पुढे काय झाले असावे? कोण ती यशवंत?? जाणून घेऊ आजच्या भागात.

29 जानेवारी 1954 रोजी एका कृष्णवर्णीय कुटुंबात, कुमारी मातेच्या पोटी तिचा जन्म झाला. आई वडिलांपासून वेगळी राहत असल्यामुळे, शिवाय आईची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे, तिची रवानगी आजीकडे झाली. आजी धार्मिकवृत्तीची. तिला चर्चमध्ये घेऊन जायची. सहाजिकच तिच्यावर अतिशय उत्तम प्रकारचे धार्मिक संस्कार झाले. वयाच्या तिसर्‍या वर्षीच तिच्या मुखातून उपदेशात्मक बोल येऊ लागले. चर्चमध्ये ती भाषण देऊ लागली. यामुळे तिला “द प्रीचर अर्थात उपदेशक” म्हणून हाक मारली जाऊ लागले.

आपल्या आजी च्या सानिध्यात अतिशय उत्तम प्रकारे तिचे बालपण व्यतीत होत होते. हा काळ तिच्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता. पण, नियतीच्या मनात काही औरच होते. आजीचे वयोमान आणि बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला पुन्हा आपल्या आईकडे राहायला यावे लागले. आईकडे रहायला आल्यानंतर काही दिवसातच तिचे शारीरिक शोषण होऊ लागले. याबाबत तिने आपल्या आईला कल्पना दिली. पण, आपली मुलगी खोटे बोलत असावी. म्हणून आईने त्याकडे दुर्लक्ष केले. तिच्यावर होत असलेला अत्याचार आणि सभोवतालचे नकारात्मक वातावरण यात तिची घुसमट होऊ लागली. बंड करण्याचे, बाहेर पडण्याचे विचार येऊ लागले आणि म्हणून वयाच्या चौदाव्या वर्षी आईच्या पर्समधून पैसे चोरून तिने घर सोडले. पण थोड्याच कालावधीत आईने तिला शोधून काढले. तिचं हे बंडखोर वागणं आईला मुळीच आवडलं नाही आणि म्हणून आईने तिची रवानगी तिच्या वडिलांकडे केली.

वडिलांच्या छत्रछायेत तिच्या आयुष्याची नवी पहाट झाली. तिच्या जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. हा प्रसंग तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. वडिलांनी तिच्या जीवनाला नवा आकार दिला,शिस्त लावली आणि तिचा आत्मविश्वास जागा केला. आपला भूतकाळ विसरून ती मोकळा श्वास घेऊ लागली. शाळेत ती सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागली. नाटक, वादविवाद,भाषण यासारख्या स्पर्धामध्ये अव्वल स्थानी येऊ लागली. एका स्थानिक रेडिओ स्टेशन घेतलेल्या स्पर्धेत तिने पहिला क्रमांक पटकावला आणि तिला त्या रेडिओ स्टेशनवर दुपारच्या बातम्या वाचण्याची संधी मिळाली. आपला भारदस्त आवाज बोलण्याच्या अद्भुत शैलीने ती सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करू लागली.

तिच्या रेडिओ आणि टीव्ही च्या करिअरची सुरुवात झाली. पण, तो काळ मोठा संघर्षमय होता. त्या काळात टीव्ही क्षेत्रात श्वेतवर्णीय लोकांचे वर्चस्व होते. एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तीला तेथे आपले स्थान बळकट करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागे. नेमका हा संघर्ष तिच्या वाट्याला आला. तिचे बातम्या वाचण्याचे कौशल्य अतिशय प्रभावी असूनही तिच्या बॉस ने  “तु बातम्या वाचण्याच्या लायकीची नाहीस.” असे म्हणून तिला कामावरून काढून टाकले. या प्रसंगानंतर तिला तिच्या आयुष्यात अनेक संधी प्राप्त झाल्या. त्या प्रत्येक संधीचं तिनं आपल्या आवाजाच्या जोरावर सोनं केलं.

पण, तिला टेलिव्हिजनच्या जगामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी 8 सप्टेंबर 1986 या दिवसाची वाट पाहावी लागली.  हा दिवस तिच्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण. कारण, याच दिवशी तिच्या संकल्पनेतून एका कार्यक्रमाचा जन्म झाला आणि त्या कार्यक्रमाने केवळ अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगभरातील दर्शकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला प्रचंड प्रसिद्धी, पैसा आणि मानसन्मान प्राप्त झाला. या कार्यक्रमामुळेच ती यशाच्या अत्युच्य शिखरावर पोहचली. तो कार्यक्रम म्हणजेच “The Oprah Winfrey Show” आणि ती यशवंत म्हणजेच ओपरा विनफ्रे.

आज ओपरा विनफ्रे ज्या स्थानावर विराजमान आहेत. त्या स्थानावर पोहोचण्यासाठी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. अस्थिर बालपण, बालवयातील शोषण, नकारात्मक परिसर, टी.व्ही जगतात कृष्णवर्णीय म्हणून करावा लागलेला संघर्ष गुणवत्ता असतानाही डावलली गेलेली संधी, या आणि यासारख्या अनेक संकटांवर मात करत, प्रत्येक अडचणींवर बंडाचा झेंडा फडकावत त्या विसाव्या शतकातील सर्वाधिक श्रीमंत आफ्रिकन अमेरिकन  महिला बनल्या. शिवाय अमेरिके चा सर्वोच्च नागरी सन्मान “प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रिडम ” त्यांना मिळाला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.




3 comments: