Friday, November 16, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 46

ब्राझील एक बलाढ्य देश. या देशाने जगाला अनेक दिग्गज फुटबॉलपट्टू दिले आहेत. या देशाच्या फुटबॉल संघाने 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे. पण,या देशाचे एक स्वप्न गेली 116 वर्षे अपूर्ण होतं. ते स्वप्नं एका रायझिंग स्टार ने पूर्ण केले.ते स्वप्नं नेमके कोणतं ? आणि तो रायझिंग स्टार कोण ?जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..

त्या रायझिंग स्टार चा जन्म अत्यंत गरीब आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या, एका फुटबॉल वेड्या व्यक्तीच्या कुटुंबात झाला. वडिलाचे आणि त्याचे नाव एकच. लोक बापाला सिनियर आणि पोराला ज्युनिअर म्हणायचे. सिनियर खूपच गरीब. घरात कमावणारा एकच आणि खाणारे अर्धा डझन. अभ्यास करायला गेला, तर लाईट नाही आणि झोपायला गेला, तर एक गादी अन झोपणारी चार.ही अशी अवस्था. पण,विलक्षण अवस्थेत सिनियर ने ज्युनिअर ला फुटबॉलपट्टू करण्याचा विडा उचलला होता. त्यासाठी सिनियर ने जीवाचे रान केले. बापाच्या कष्टाचे पोरानं चीज केलं. अन वयाच्या 10 व्या वर्षीच तो एका खाजगी क्लब ला जोडला गेला. त्याचा खेळ बहरू लागला. वर्षभरातच त्याची निवड सिनियर संघात झाली. वयाच्या 14व्या वर्षीच साऱ्या जगाची नजर ज्युनिअर वर खिळली. स्पेन ने ज्युनिअर ला खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. पण,ज्युनिअर ने देशप्रेमखातर तो नाकारला. पुढे काही कालावधीनंतर त्याची निवड ब्राझील च्या मुख्य संघात झाली. आपल्या खेळाच्या जीवावर तो काही वर्षांतच संघाचा कर्णधार बनला आणि 116 वर्षे अपूर्ण असलेलं ऑलम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदकाचं स्वप्नं त्यानं पूर्ण केलं. तो रायझिंग स्टार म्हणजेच नेमार ज्युनिअर.

झोपडपट्टीसारख्या नकारात्मक वातावरणात वाढलेला, गरिबीमुळे तडजोड करावी लागलेला नेमार आपल्या गुणवतेच्या आणि कौशल्याच्या जोरावर यशाच्या शिखरावर विराजमान झाला. आपली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तो आपल्या देशाचे, आपल्या वडिलांचे स्वप्नं पूर्ण करू शकला. म्हणूनच तो एक यशवंत आहे.

माणूस ज्या वातावरणात जन्माला येतो, वाढतो, त्या वातावरणाचा प्रभाव त्याच्यावर पडतोच.  कोकिळेच्या घरट्यात कावळ्याचे पिल्लू वाढले, तर ते कोकिळेसारखेच गाईल. पण, कावळ्याच्या सहवासात कोकिळेचे पिल्लू वाढले, तर मात्र ते कावळ्यासारखेच गाऊ लागेल. नेमकं आपण कोणाच्या सहवासात आहोत? कावळ्याच्या की कोकिळेच्या ? याचा शोध घ्या. बोध घ्या आणि यशवंत व्हा.





No comments: