Thursday, November 15, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 42

नुकतंच पहिलं महायुद्ध संपलं होतं. तणावपूर्ण वातावरण अजूनही होतंच. सगळीकडे मंदीची लाट उसळली होती. याच काळात एक मुलाचा जन्म झाला आणि मोठेपणी त्यानेच जगाला पैसे कमविण्याची आणि श्रीमंत बनण्याची दीक्षा दिली. तो जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी विराजमान झाला. तो यशवंत कोण ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..

तो सात वर्षाचा असताना त्याच्या हाती एक पुस्तक पडले. त्याने ते वाचले आणि प्रभावित झाला. त्यानं चंग बांधला पैसा कमविण्याचा,श्रीमंत बनण्याचा. त्यासाठी कितीही मेहनत करण्याची त्याची तयारी होती. कधी तो च्युईगंम विकायचा तर कधी कोकाकोला. कधी घरोघरी जाऊन वर्तमान पत्र विकायचा, तर कधी किराणादुकानात कामायला जायचा. वयाच्या 13 व्या वर्षी त्याने पहिल्यांदा इनकम टॅक्स भरला आणि वयाच्या 16 व्या वर्षीच तो लखपती बनला. ते केवळ आणि केवळ आपल्या मेहनतीच्या बळावरच...

आता त्याची पाऊले शेअर बाजाराकडे वळली. त्याचे वडील शेयर बाजारातच नोकरी करायचे. शेयरबाजाराचे ज्ञान एव्हढंच काय ? ते त्याला वारसाहक्काने मिळाले होते. त्याने गुंतवणूकीला सुरवात केली. अपुऱ्या ज्ञानाने त्याचे पहिल्या प्रयत्नात मोठे नुकसान झाले. या प्रसंगातून लवकरच तो बाहेर पडला. त्यातून तो शिकला कि, "वाईट प्रसंग आला तरी,स्थिर राहायचं,संयम सोडायचा नाही."

दिवस पुढे जात होते. त्याने शेयर बाजारात गुंतवणूक करण्याचा धडाका लावला. त्याच्या हाताला यश येत होते. मजल दर मजल करत तो एकेका कंपनीचा मालक बनत चालला होता. तो दिवस उजाडला आणि त्याने गेली 13 वर्षे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या बिल गेट्सलाही मागे टाकले. ती व्यक्ती जगातील सर्वाधिक श्रीमंत बनलेली व्यक्ती म्हणजेच म्हणजेच वारेन बफेट होय.

शेयर बाजारातील पहिल्या धक्क्यानंतर बफेटनी आपला धीर सोडला नाही. कष्ट केले. पुरेपूर अभ्यास केला. योग्य संधीची वाट पाहिली आणि सर्वात महत्त्वाचे अचूक निर्णय घेतले. म्हणून ते वयाच्या 78व्या वर्षी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकले. म्हणूनच ते यशवंत आहेत.

वयाच्या सातव्या आठव्या वर्षी सुरू झालेला श्रीमंत बनण्याचा प्रवास, वयाच्या 78 व्या वर्षी पूर्ण झाला. आजच्या युवकांना लवकरात लवकर श्रीमंत होण्याची मोठी इच्छा आहे. इच्छा असणे, वाईट नाही. परंतु त्यासाठी सातत्याने कष्ट करावे लागतात. यशाच्या शिखरावर पोहचण्याचा शॉर्टकट अजूनही निर्माण झाला नाही. याचं भान आजच्या तरुणांना असणं फार गरजेचं आहे.

सर्वाधिक श्रीमंत असलेले बफेट दान देण्यातही आघाडीवर आहेत. तिसाव्या वर्षी घेतलेल्या घरात ते आजही राहतात. त्याच्याकडे एकही चारचाकी वाहन नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या या माणसाकडून 'काटकसर' हाही गुण घेण्यासारखाच आहे. ज्यांना खरोखरीच श्रीमंत बनायचं आहे. त्यांनी वारेन बफेट यांचा जीवन प्रवास नक्की वाचवा.


No comments: