🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 122*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
गुलामगिरीचे, अनाथाचे जगणे वाट्याला आलेल्या एका गुलामाचा, एक गुलाम ते एक यशवंत होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवासाची ही संघर्षमय गाथा...
12 जुलै 1864 रोजी अमेरिकेतील एका गरीब, निग्रो दांपत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. अमेरिकेतील तत्कालीन सामाजिक परिस्थतीत श्वेतवर्णीय, कृष्णवर्णीयांना गुलाम म्हणून राबवून घ्यायचे. त्यांच्यावर प्रचंड अन्याय करायचे. साहजिकच एका कृष्णवर्णीय कुटुंबात जन्माला आल्याने, त्याच्या आई-वडिलांना आणि त्याला देखील गुलामगिरीच्या भयंकर यातना सहन कराव्या लागल्या.
त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. तो थोडा मोठा झाल्यावर त्याच्या आईला काही लोकांनी पळून नेले. अनाथाचे जीवन त्याच्या वाट्याला आले. एका दयाळू श्वेतवर्णीय कुटुंबाने त्याचा सांभाळ केला. तो दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्र एका गोठ्यात काढायचा.
तो लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा. त्यामुळे मालकिणीने शिकवलेले प्रत्येक काम, तो एका प्रयत्नात शिकायचा. शेती हा त्याचा आवडता विषय. त्यामुळे शेतातील प्रत्येक काम, तो अतिशय आवडीने आणि तन्मयतेने करायचा. त्याला शिकण्याची प्रचंड इच्छा होती. पण, त्या काळी शिक्षण ही फक्त श्वेतवर्णीयांची मक्तेदारी होती. हे जेव्हा त्याला समजलं, तेव्हा त्याला प्रचंड दुःख झालं.
' जेव्हा आपण एखादी इच्छा व्यक्त करतो, तेव्हा ती पूर्ण करण्याचे कित्येक मार्ग आपोआप तयार होतात. फक्त आपली इच्छा प्रामाणिक असणे. फार महत्त्वाचे आहे.' त्या निग्रो बालकाची शिक्षण घेण्याची इच्छा खूप प्रामाणिक होती. म्हणूनच, त्याच्या दयाळू मालकाने त्याला आपल्या घरी प्रारंभिक शिक्षण देण्यास सुरुवात केली.
प्रारंभिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी, निग्रो मुलांसाठी असलेल्या एकमेव शाळेत पाठवण्यात आले. घराघरात जाऊन भांडी घासणे, झाडू मारणे, कपडे धुणे यासारखी कामे करून, प्रसंगी उपाशी राहून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. हायस्कूल मध्ये त्याने सर्वाधिक गुण मिळविले. पुढे कॉलेज मधील शिक्षणासाठी त्याला तो केवळ निग्रो आहे. म्हणून प्रवेश नाकारला. पण, शिकण्याची प्रामाणिक इच्छा असल्याने, त्याला इंडियानो येथील कॉलेजमध्ये रसायन आणि वनस्पतीशास्त्र विषयासाठी प्रवेश मिळाला. येथे देखील त्याने प्रचंड मेहनत करून, चांगले गुण मिळविण्यात यशस्वी झाला. पुढे त्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर नोकरी मिळाली. काही कालावधीनंतर त्याने नोकरी सोडली आणि एलबामा सारख्या मागास भागात काम करण्यासाठी निघून गेला. येथे त्याने एक शेती शाळा सुरू केली. त्यात अनेक प्रयोग करून, शेती किती किफायतशीर आहे ? हे पटवून दिले. सव्वाशे वर्षांपूर्वी शेतीत अनेक प्रयोग करणारा, तो शास्त्रज्ञ म्हणजेच जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर होय.
कार्व्हर यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. गुलामगिरीचे, अनाथांचे जगणे वाट्याला आले, निग्रो म्हणून अनेक वेळा शिक्षणाचा हक्क डावलण्यात आला. शिक्षण घेण्यासाठी अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण, तरीही त्यांनी संघर्ष केला. यावरूनच, कार्व्हर यांची जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्या कष्टदायी जीवनातून दिसते.
कितीही वेळा ठेच लागली ? तरी प्रयत्न करणे थांबवायचे नाहीत. ही शिकवण आपल्याला मिळते. थोडे जरी अपयश आले, तरी आपण नशिबाला दोष देतो वा इतर कारणं पुढे करतो. पण, शेवटपर्यंत संयम ठेवून प्रयत्न करायचे. मात्र आपल्याकडून राहून जाते. कार्व्हर प्रयत्नशील म्हणूनच, ते यशस्वी शास्त्रज्ञ होऊ शकले. म्हणूनच, कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!
शेतकरी शेतात राबतो. पण, आपल्या शेतमालाची किंमत तो कधीच ठरवू शकत नाही.तो शेतीसाठी ज्या ज्या बाबींची खरेदी करतो. त्यांच्या किमतीवरदेखील त्याचं नियंत्रण नाही. यामुळे बऱ्याचदा पिकाचा उत्पादनखर्च बाजारात ठरलेल्या त्याच्या विक्री-किमतीपेक्षा जास्त होतो. म्हणजेच, शेती करून शेतकऱ्याला नफा मिळण्याऐवजी तोटाच होतो. ही सर्वमान्य समस्या. पण, काव्र्हर यांनी यावर उपाय म्हणून मोलवृद्धी (व्हॅल्यू अॅडिशन) हा प्रकार शोधून काढला. पिकाची विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून, विविध अन्नपदार्थ बनवले आणि ते विकले, तर त्यातून जास्त नफा मिळतो, हे या मोलवृद्धीचे तत्त्व.
No comments:
Post a Comment