Tuesday, October 8, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 121

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 121*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आणि स्वतःच्या हिमतीवर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या एका तरुणीच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...

9 जानेवारी 2000 रोजी आसामसारख्या डोंगराळ राज्यातील एका खेडेगावात, एका गरीब शेतकऱ्याच्या पोटी, 6 मुलांनंतर जन्माला आलेली ती. लहानपणापासूनच प्रचंड चपळ. एकदा तर तिने धावत एका कार ला मागे टाकले होते. 

ती दोनच दिवस फुटबॉल शिकली. अन् तिसऱ्या दिवसापासून तिने गोल करायला सुरुवात केली. ती आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात केवळ शंभर रुपयांसाठी फुटबॉल खेळायला जायची. तिला फुटबॉल मधील स्ट्रायकर व्हायचे होते. शालेय जीवनात असतानाच फुटबॉल संघ निवड प्रक्रियेसाठी गेली. मैदानावरील तिची ऊर्जा, कामगिरी, धावपळ, चपळता पाहून एका प्रशिक्षकाने तिला फुटबॉलपटू न होण्याचा आणि अॅथलेटिक्स मध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. 

तिने हा सल्ला मानला आणि ती रेसिंग ची तयारी करू लागली. सर्वात वेगवान धावपटू होण्याचा तिने ध्यास घेतला. अंगभूत असणारे कौशल्य आणि तिची मेहनत या जोरावर ती शालेय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं जिंकू लागली. आता ती राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागली. परंतु, कमी अनुभव, कमी सराव यामुळे तिला राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अपयश आले. ती खचू लागली. परंतु, तिच्यात असलेल्या ऊर्जेची, क्षमतेची जाणीव असलेले एक प्रशिक्षक तिच्या घरी आले. त्यांनी तिला आपल्या सोबत ट्रेनिंग सेंटर मध्ये नेले. तिथे ती कसून सराव करू लागली. जीव तोडून मेहनत करू लागली. जिंकण्यासाठी कठोर मेहनत करण्याची तयारी आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती अनेक स्पर्धा लिलया जिंकू लागली. जुलै 2019 युरोपमध्ये धावण्याच्या स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारात, तिने केवळ 19 दिवसात 6 सुवर्णपदकं जिंकली आणि भारतीयांसह साऱ्या जगाची कौतुकाची थाप मिळविली. असा पराक्रम करणारी ती म्हणजेच हिमा दास...

काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील वर्तमानपत्राची बातमी वाचली. एका कॉलेज तरुणीने वडिलांच्या गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. गरीब घरात जन्माला येणे. हा दोष नाही. पण, परंतु गरीब म्हणून मरणे. हा दोष आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा, वेगवेगळ्या साधनांची कमतरता असून सुद्धा, हिमालयाच्या उंची इतकं उत्तुंग यश तिने गाठलं आहे. अजाणत्या वयात नेमका आपला आदर्श कोण आहेत ? यावर आपले भविष्य अवलंबून असते. आपला आदर्श जर हिमा सारख्या व्यक्ती असतील तर नक्कीच आपल्या आयुष्य यशाने भारून जाईल, याऊलट आपले आदर्श आर्ची-परशा असतील तर सैराटसारखे कोणीही मारून जाईल. 

आपल्या समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊन, त्याच्यावर मात करून, ती परिस्थिती आपल्याला बदलता येते. हिमा दास हे त्याचेच एक उदाहरण. तेंव्हा, समोर आलेल्या परिस्थितीला न घाबरता धैर्याने सामोरे जा. त्याच्याशी लढा. परिस्थितीचे गुलाम न होता. परिस्थितीला आपलं गुलाम बनवा. 

एकेकाळी अनवाणी सराव करणाऱ्या हिमाच्या नावाने आज जगातील सर्वाधिक खपाची शूज कंपनी शूज तयार करते आहे. म्हणूनच हिमा एक यशवंत आहे.


उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!



No comments: