Monday, October 7, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 120

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 119*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


बापाचं स्वप्नं पूर्ण करणाऱ्या एका मुलीच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा....

18 जुलै 1996 रोजी मुंबईमध्ये श्रीनिवास आणि स्मिता या दाम्पत्याच्या पोटी तिचा जन्म झाला. 
तिचे वडील निष्णात क्रिकेटपटू. पण, व्यवसायामुळे त्यांना खेळाकडे लक्ष देता आले नाही. परंतु ते आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनविण्याचे स्वप्नं पाहत होते. त्यासाठी त्यांनी मुलाला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पण, झाले वेगळेच.

मुलाला प्रशिक्षण देताना नकळत मुलीला देखील क्रिकेटचे वेड कधी लागले ? हे कुणालाच कळले नाही. तेंव्हा वयाच्या सहाव्या वर्षापासून तिला  क्रिकेटचे बाळकडू मिळायला सुरुवात झाली. 

तशी ती उजव्या हाताची. पण,तिच्या प्रशिक्षकांनी तिला जाणीपूर्वक डावखुऱ्या हाताने सराव करण्यास सांगितले. सुरुवातीला ते जड गेले. परंतु, तिने ती कला नंतर हस्तगत केली. ती नऊ वर्षांची असताना महाराष्ट्राच्या Undar-15 च्या संघात खेळली. पुढे 11 व्या वर्षी Undar-19 च्या संघात महाराष्ट्राकडून खेळली. तिचा खेळ इतका अप्रतिम होता की, तिची प्रत्येक टप्प्यावर संधी मिळत गेली. प्रत्येक मिळालेल्या प्रत्येक संधीचं ती सोनं करत गेली.स्वतःला सिद्ध करत गेली.

जे स्वप्नं उराशी बाळगून ती खेळत होती, जे स्वप्नं तिच्या वडिलांनी पाहिलं होतं, ते स्वप्नं पूर्ण होण्याची वेळ आली. केवळ वयाच्या सतराव्या वर्षीच तिची भारतीय महिला संघात निवड झाली. तिने आपली निवड सार्थ ठरवली. 2018 सालातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही तिने पटकावला. अशी कामगिरी करणारी, ती केवळ दुसरीच महिला क्रिकेटपटू होती. ती महिला क्रिकेटपटू म्हणजेच सांगलीची स्मृती मानधना. 

ज्याला चित्रकार व्हायचंय. त्यांने नियमित चित्र काढण्याचा सराव करणे गरजेचे आहे. ज्याला उत्तम गायक व्हायचे आहे त्यांने नियमित रियाज करणे गरजेचे आहे. स्मृतीच्या बाबतीत, तिने आपले ध्येय फार आधीच निश्चित केले होते. त्यामुळे ती प्रचंड सराव करत होती. आजचे आपण पाहत असलेले तिचे यश, हे गेले दीड दशक ती करत असलेल्या सरावाचे फलित आहे. शेवटी सराव आणि सातत्य याखेरीज यश मिळणार नाही. 

भारतीय महिला क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी स्मृती पहिली खेळाडू आहे. 
आयसीसीच्या महिला संघामध्ये स्थान मिळवणारी स्मृती एकमेव खेळाडू आहे.
2019 पासुन  ICC क्रिकेट जागतिक क्रमवारीत स्मृती पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. इतका सारा पराक्रम करणारी स्मृती, विश्वचषक स्पर्धेपूर्वी, केवळ चार-पाच महिने अगोदर, मोठ्या दुखापतीला सामोरे गेली. या दुखापतीमुळे तिला नीट चालताही येत नव्हते. परंतु, भारतीय महिला संघाला विश्वचषक जिंकून द्यायचाच. या निर्धाराने तिने स्वतःला तयार केले. दुखापतीतून सावरली.  नव्या जोमाने, नव्या उत्साहाने तयारीला लागली. स्वतःला पुन्हा सिद्ध केले. उत्तम खेळ केला आणि संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेवून गेली. म्हणूनच ती एक यशवंत आहे. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!




No comments: