Friday, November 9, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 13

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. पर्यायाने शेतकरी हाच या व्यवस्थेचा कणा आहे. आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतो. तो शेतात राबतो,पिकवतो म्हणूनच आपण पोटभरून खाऊ शकतो. पण,गेल्या काही दिवसापासून देशभरात कर्जमाफी आणि शेतकरी संप हे मुद्दे चर्चिले गेले. याला कारण असे कि,आर्थिक परिस्थितीला कंटाळून आजवर कित्येक शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या. आजवर अनेकवेळा कर्जमाफी देऊनही या आत्महत्यांचे प्रमाण काही कमी झाले नाही. या आत्महत्या कशा थांबवता येतील?या प्रश्नाचे उत्तर अजूनही सरकारला सापडले नाही. पण,पुण्यातील एका माऊलीला या प्रश्नाचे उत्तर सापडले.त्या माऊलीचा हा प्रेरणादायी प्रवास.....

पुण्याच्या मुळाशी चा हा माऊली.
वडील शेतकरी.परंपरागत पद्धतीने शेती करणारे.

शेतीत फायदा नाही म्हणून माऊलीने दहावीनंतर ऑफिस बॉयची नोकरी पत्करली.बारा वर्षें नोकरी केली.

माऊलीच्या आयुष्यास कलाटणी मिळाली ती एका बातमीमुळे.ती बातमी ही होती, ‘‘10 गुंठ्यात 12 लाखाचे उत्पन्न.”

माऊली त्या शेतकऱ्यास जाऊन भेटला. तो फुलांची शेती करत असे. माऊली त्या शेतकऱ्याचे यश पाहून भारावला. स्वतःच्या शेतीत तोच प्रयोग करण्याचे ठरवले. नोकरीचा राजीनामा दिला.फुलांची शेती करण्याचा चंग बांधला आणि झपाटून कामाला लागला. बऱ्याच प्रयत्नांतून बँकेने दहा लाख कर्ज दिले आणि या माऊलीने “पुण्यातील पहिलंवहिलं पॉलिहाऊस उभं केलं.” आणि फुलांची हायटेक शेती सुरू केली.

पाणी, वीज, खतं आणि मजूर या सगळ्या गोष्टींचा कमीत कमी वापर सोबत बाजारपेठेवरही लक्ष.या गोष्टींमुळे माऊलीने “दहा लाखाचं कर्ज अवघ्या एका वर्षात फेडलं.”

या पराक्रमाने बघता बघता माऊली हिरो झाला. वर्तमानपत्रे,टी.व्ही.वर माऊली झळकू लागला. माऊलीकडे कित्येक शेतकरी मार्गदर्शन घ्यायला येऊ लागले आणि यातून निर्माण झाली एक संस्था...... ‘अभिनव फार्मर्स क्लब’. या गटात भागातील 305 शेतकरी सहभागी झाले. माऊलीने या साऱ्या शेतकऱ्यांची घडी व्यवस्थित बसविली परिणामतः त्या सर्व 305 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी ‘305 मारुती 800’ गाड्या विकत घेतल्या.

सध्या ‘अभिनव फार्मर्स क्लब’ या गटात 45000 शेतकरी आहेत. ग्रुपकडून केली जाणारी शेती पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने केली जाते. ‘अभिनव फार्मर्स क्लब’ ला या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

केवळ “दहावी शिक्षण” झालेला माऊलीने आजवर 35 पेक्षा जास्त देशाचे दौरे केलेले आहेत. जे एखाद्या IT इंजिनीअर ला देखील जमले नसेल. हा माऊली म्हणजेच श्री.ज्ञानेश्वर बोडके.

भारतीय समाज शेतीकडे ‘डबघाईला आलेला व्यवसाय’ म्हणून पाहत असताना श्री.ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवण्याची ‘सिस्टिम’ शोधून काढली. ती यशस्वीपणे राबवली. डबघाईला आलेल्या शेतीला आणि शेतकऱ्यांना यांच्या प्रयत्नाने सुग्गीचे दिवस आले आहेत. त्यांना नुकतेच राष्ट्रपती पारितोषक जाहीर झाले आहे. 

घरच्यांचा विरोध,आर्थिक परिस्थिती आणि अल्पसंतुष्टीवृत्तीला श्री.ज्ञानेश्वर बोडके बळी पडले असते.तर,आज ते कोठे असते?त्याच ऑफिसमध्ये...ऑफिसबॉय म्हणून...आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना श्री.बोडके यांना लाख संकटे आली असतील पण,तरीही डगमगले नाहीत.आणि शेती फायद्याची कशी ??हे सिद्ध करून दाखविले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

आज(13 जानेवारी 2018) या माऊलीला प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा लाभ मु.पो.घारेवाडी,ता.कराड येथील बलशाली युवा हृदय संमेलन मध्ये मिळाला.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह.तो पर्यंत नमस्कार.

🛑  कृपया लेख नावासहच फॉरवर्ड करा...

धन्यवाद!!!!!


No comments: