Friday, November 9, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 12



मुंबई......एक मायानगरी.एक स्वप्ननगरी,न झोपणारी,सदैव धावणारी मुंबई.इथल्या उंच इमारतीसारखीच उंच स्वप्न घेऊन कित्येक तरुण या शहरात रोजच येत असतात.आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात.पण, प्रचंड कष्ट,काम करण्याची गोडी,बुद्धिमत्ता आणि जिद्द हे गुण असणाराच या मुंबईत यशस्वी होतो.या लखलखत्या मुंबई नगरीत आपलंही एक घर असावं,आपणही आपलं नशीब आजमावावं या इराद्याने एक तरुण मुंबईत आला.त्याचीच ही कहाणी................

मुळचा साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील हा तरुण.
अभ्यासात जेमतेमच.
वडील मुंबईत कामगार आणि म्हणूनच शिक्षणासाठी हा लहानपणी मुंबईत आला.
काही वर्षे मुंबईत वडिलांसोबत काढली.वडील गावी परत आले.पण,हा काही परत आला नाही.त्याला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायचा होता.खुप मोठं व्हायचं होतं.त्यासाठी काहीही करायची तयारी या तरुणाची होती.यशस्वी होण्यासाठी त्याने केलेल्या कामाची यादी पाहिली तर,आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी सकाळी पेपरची लाइन टाकली.
घराघरात दुधाच्या बॅगा टाकल्या.
पेंटिंगची कामे घेतली.
डेअरीमध्ये अंगमेहनतीची कामे केली.
दिवसाला मिळणाऱ्या आठ रूपयांसाठी कोकाकोलामध्ये लोडरचे काम केले.
रोजगारासाठी टॅक्सी आणि कंडक्टरचा बॅच मिळवला.
सोसायटीमधल्या टाक्या स्वच्छ करण्याचा व्यवसाय केला.
स्वतःच्या या व्यवसायाची स्वतःच सायकलीवरून जाहिरात केली.
बिल्डींग स्वच्छ करणारी मशीन स्वतःच बनवली.
पोलिसांच्या स्विमींग पुलावर कोच म्हणून काम केले.
ही सारी कामे या तरुणाने केली.पण,अजूनही यशाचा मार्ग  काही सापडत नव्हता.
एक दिवस हा तरुण पासपोर्ट ऑफिसमध्ये गेला.तिथे एका एजेंटला त्यांने १० रुपयाचे फॉर्म्स २५ रुपयाला विकताना पाहिले. त्यांला या गोष्टीचे आश्चर्य वाटले. धंदा कसा करावा? याचं मिळालेलं पहिलं शिक्षण होतं ते. मुळातच जिद्दी असलेल्या या तरुणाने ठरवलं की,आपणही येथे बसून धंदा करायचा.पण, जुने एजेंट त्याला तिथे प्रवेश करू देत नव्हते.पण,त्या सर्वांवर मात करीत या तरुणाने आपले बस्तान बसवलेच.हाच त्या तरुणाच्या जीवनातील ”टर्निंग पॉईंट” ठरला.
तिकडे बिल्डींग स्वच्छ करण्याच्या व्यवसायाला चांगले दिवस आले होते.
बांधकाम व्यासायात पदार्पण केलं होतं.मुंबईत स्वतःचं घर झालं होतं.
शूझ बनवणारी कंपनी विकत घेतली.
हेल्मेट,सेल्फ्टी बेल्ट,जॅकेटचेसुद्धा उत्पादन सुरु केलं.
आधी दिवसाला आठ रुपये मिळविणारा वीस रुपये मिळवू लागला आणि पाहता पाहता वीसाचे शंभर,शंभराचे हजार,हजाराचे लाख आणि लाखाचे करोड बनले होते.
या तरुणाचा ब्रॅण्ड तयार झाला होता आणि हा ब्रॅण्ड म्हणजेच ‘जीवन इंडस्ट्रीज’चे मालक उत्तम केंजळे.

ज्याचा निश्चय ठाम असतो,त्याला पराभूत करणे जवळजवळ अशक्यच असते आणि श्री.उत्तम केंजळे यांच्या बाबतीत हे तंतोतंत खरे आहे. म्हणूनच ते मला एक यशवंत वाटतात.



No comments: