Friday, November 9, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 11


आबा.आबा हे नाव वाचताच. दोन चित्रं डोळ्यासमोर उभी राहतात. एक म्हणजे डोक्यावर फेटा,अंगात अंगरखा,धोतर नेसलेले आणि पायात करकरणारे पायताण असणारे आबा आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील आबा.


पण,या दोन्ही आबांपेक्षा वेगळा असा आणखी एक आबा आहे, ज्याचे वडील पांडुरंगाचे भक्त होते. म्हणून, त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी हा आजही पायी वारी करतो. ज्या शेतात त्याची आई कामाला गेली, त्या शेताची त्यांने खरेदी केली. शेळीने हरभरा खाल्ला म्हणून ज्या रानमालकाने त्याला बेदम मारले, त्याची ३५ एकर जमीन याने खरेदी केली.

गरीब घराण्यात जन्माला येऊनही आज त्याचा करोडोंचा TURNOVER आहे.


हे त्याला कसं शक्य झालं? असं त्याने काय केलं की,त्याने त्याच्या भूतकाळावर मात केली आणि सर्वांनाच हेवा वाटेल असे उद्योजकीय विश्व निर्माण केले? हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा तुम्हा वाचकांना लागलेली असेल. चला तर मग आपण जाणून घेऊया या आबाच्या यशाचे रहस्य…..

वडील चर्मकार.
तीन एकर जमीन.पण असून नसल्यागत.
प्राथमिक शिक्षण गावात.तर पुढील शिक्षण तासगाव येथे.
१९७२ चा काळ. आबा त्यावेळी अकरावीला होता. प्रचंड मोठा दुष्काळ. आबाचे वडील  बोर्डिंगवर  भाकरी घेऊन  आले आणि म्हणाले, ”गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही. तुम्ही धीर सोडू नका. गाडगी-मडकी मोडू; पण शिकायची काळजी कर. माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.” वडिलांचे हे निर्वानीचे शब्द आबाच्या काळजाला भिडले, खूप शिकायचं,मोठं व्हायचं. आबानं पक्क केलं. आबा मन लावून शिकला. इंजिनिअर झाला आणि माझगाव डॉकमध्ये नोकरीला लागला.

१९९२ सालचा एक प्रसंग. आबा सारखाच एक जर्मन इंजिनिअर.आबाचा बॉस झाला.आबाचे आणि त्याचे काम आणि कामाचे स्वरूप एकच.आबाचे काम त्याच्यापेक्षा काकणभर सरसच.एक दिवस आबाच्या पाहण्यात त्या जर्मन इंजिनिअरची SALARY SLIP आली आणि आबाला धक्काच बसला. आबाला जेवढा पगार वर्षाला मिळायचा,तेवढा पगार त्या जर्मन इंजिनिअरला एका महिन्याला मिळायचा.
ती SLIP पाहून आबाला वाटले कि,आपल्या जगण्यात काही अर्थच नाही.

या प्रसंगातून आबा खुप काही शिकला.वेळेचे गणित मांडले.वाया जाणारा वेळ शोधला आणि आबाला जाणवलं कि,या वाया जाणाऱ्या वेळेचा सदुपयोग केला तर आपणही खुप श्रीमंत होऊ.त्याने एक निश्चय केला आणि नोकरीचा राजीनामा दिला.एका कंपनीची स्थापना केली.त्या कंपनीचं नाव आहे “दास ऑफशोअर”.आणि मालक आहेत “अशोक खाडे”.

“दास” कंपनीने ओएनजीसी, ब्रिटिश गॅस अशा नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलय. या समूहाच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्‍ट्‌स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत सात कंपन्या  आहेत.

अबुधाबीचे प्रिन्स शेख महमंद बिन खलिफा बिन झायर अल नयन हे आबांचे भागीदार आहेत.


यश हे जातपात,धर्म,पंथ,भाषा पाहून मिळत नाही.यश हे कुणालाही मिळतं.केवळ ते यश मिळवण्यासाठी प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी असे पुरक गुण  माणसात असले पाहिजेत.

मराठी समाजात एक विषय नेहमी चघळला जातो. तो असा की मराठी माणूस हा एकमेकांचे पाय खेचतो, तो आळशी आहे, तो उद्योग करत नाही. पण या सर्व गोष्टी अंधश्रद्धा आहेत, श्री.अशोक खाडे यांनी सिद्ध करून दाखवले;आणि म्हणूनच आबा मला एक यशवंत म्हणून खुप भावतात.


1 comment:

Anonymous said...

Pls put photos of the peple about you writing...at end..