Friday, November 9, 2018

यशवंत — एक प्रेरणास्रोत भाग 10

एका तळ्यात होती
बदके पिले सुरेख,
होते कुरूप वेडे
पिल्लू तयात एक.....

हे गीत बऱ्याचवेळा आपण ऐकलेले आहे.नुसते ऐकलेच नाही.तर,गुणगुणलेले सुद्धा आहे.अतिशय सुरेख असा भावार्थ असलेले हे गीत. या गीतातील प्रत्येक शब्द्नशब्द आपल्याला स्वतःची ओळख करून देतो. जसं या गीतातील पिल्लाला आपण कोण आहोत? हे माहीतच नसतं. बऱ्याच कालावधी नंतर त्याला आपली स्वतःची ओळख समजते. पण,त्यासाठी त्याला बरेच वाईट प्रसंग, अपमान आणि आव्हानांना सामोरे जावे लागते. अगदी तशाच एका पिल्लाची ही प्रेरणादायी कहाणी..........



एका सुज्ञ आणि सुजाण सरपंचाचा हा मुलगा.

गावात वडिलांना प्रचंड मान. पण,याच्या गुणांमुळे वडिलांना नेहमीच मान खाली घालावी लागली.

कॉप्या करून हा दहावी पास झाला.

बापाच्या हट्टापायी याने सायन्स अडमिशन घेतले. पण,सायन्समधला ‘स’ सुद्धा याला कधीच समजला नाही.

कसाबसा बारावी पास झाला. तेही दहावी सारखेच.

बारावीनंतर आता काय? तर B.Com करायचं ठरवलं. तेही केलं.

आता M.Com तरी करायला हवे होते पण,महाशयांनी M.A. केलं. असा हा याच्या जीवनातील उतरता आलेख.

असाच एक दिवस टपरीवर बसला होता. पोलीस आले आणि त्याला घेऊन गेले. अटक केली पण गुन्हा नोंद केला गेला नाही. राजकीय वैरातून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले गेले होते. वडिलांनी त्याला सोडवले.घरासमोर जीपमधून उतरताना वडिलांचा मित्र त्याला म्हणाला, “तु ना तुळशीच्या वृंदावनात आलेले गांजाचं झाड आहेस. म्हणून तुझी ही अवस्था आहे.’’

वडिलांच्या त्या मित्राचे बोल त्याच्या मनात ठिणगी निर्माण करून गेली. आणि याच ठिणगीचं रुपांतर एका वणव्यात झालं आणि हा वणवा PSI होऊन गेला. हा वणवा म्हणजेच PSI संतोष अंबटकर.

संतोष यांच्या जीवनातील हा प्रसंग त्यांना अजून खोलात जायला कारणीभूत ठरला असता. पण,त्यांनी या प्रसंगातून सकारात्मक प्रेरणा घेतली आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून, स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवलं. म्हणूनच मला श्री.संतोष अंबटकर एक ’यशवंत’ वाटतात.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक बऱ्या वाईट घटना घडत असतात. खरंतर त्या घटना आपल्याला घडवत असतात.  आपल्याला देवपण बहाल करण्यासाठी, आपल्यातील वाईटाला बाजूला काढून, आपल्यातील उत्तमाला जगासमोर आणत असतात.  त्यामुळे अशा घटनांमुळे निराश न होता, त्याला सकारात्मक नजरेने पाहा. आपण यशाच्या शिखरावर पोहचाल.


No comments: