Friday, November 9, 2018

यशवंत - एक प्रेरणास्त्रोत भाग 14

आज मकरसंक्रांती(14 जानेवारी 2018). आनंदाचा सण. आज सूर्य मकरराशीत प्रवेश करतो आणि एका नव्या पर्वाला सुरुवात करतो. आजपासून दररोज तिळाएव्हढा दिवस वाढत जातो. ज्यांच्या आयुष्यावर अपंगत्वाच्या रूपाने संक्रात आली,अशा कित्येक मुलांच्या जीवनात सुर्या सारखा प्रवेश करून, त्यांच्या जीवनातील अंधार घालवून, प्रकाश आणला. दुःख घालवून आनंद वाढवला. त्यांना स्वयं सिद्ध करायला लावणाऱ्या, केवळ अपंगाच्याच नव्हे तर धष्टपुष्टांच्या जीवनातही यशाचे बीज बोवणाऱ्या एका “मास्तरचा” हा प्रेरणादायी प्रवास.....

गुणवत्तापूर्ण शिक्षण हे फक्त शहरांचीच व श्रीमंतांचीच मक्तेदारी न राहता ग्रामीण भागातील श्रीमंत, गरीब, तळागाळातील सर्वांपर्यंतच पोहोचावे. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, मेहनती, धाडसी व संवेदनशील नवी पिढी तयार व्हावी. हा हेतु मनामध्ये ठेवून, स्वामी विवेकानंदाच्या विचाराने प्रेरित झालेल्या, एका मास्तरांनी आपल्या काही तरुण मित्रांसह २००५ साली खानदेशामध्ये एका स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेची स्थापना केली आणि सुरु केला प्रवास एका नव्या पर्वाचा.

आयुष्याच्या वाटेवर अनेक तरुणांच्या जीवनात निराशेचे क्षण येतात आणि हे तरुण भरकटण्याच्या मार्गावर असतात. यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. या तरुणांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवून निराशेचा अंधार दूर करणाऱ्यासाठी या मास्तरांनी आजवर महाराष्ट्रात १२०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. जवळजवळ ६ लाखांपेक्षा अधिक तरुणांना प्रेरणा दिली आणि मार्गदर्शन केले आहे. या व्याख्यानांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनाचा वापर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून केली जाते. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून आजवर १२०० पेक्षा अधिक तरुण-तरुणी अधिकारी झालेले आहेत.

सगळं कसं व्यवस्थित सुरु होतं. संस्थेची स्थापना होऊन 10 वर्षे झाली होती. संस्थेचा आणि मास्तरांचाही नावलौकिक झाला होता. चांगले पैसे मिळत होते. चार-पाच पुस्तकेही लिहून प्रकाशित झाली होती. महाराष्ट्राबाहेरही नाव झाले होते आणि याच कालावधीत एका प्रसिद्ध अंध उद्योजकाने या मास्तरांना अंधाचे अंधकारमय जीवन आणि त्यांचा संघर्ष याची जाणीव करून दिली आणि या मास्तरांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आणि जन्माला आली एक संस्था. या संस्थेच्या माध्यमातून अंध आणि अपंग याच्या जीवनाला नवा अर्थ आणि जगण्याची नवी दिशा देण्याचे काम २०१५ पासून हे मास्तर करू लागले.

महाराष्ट्रातील अनेक जिद्दी अपंगाना शोधून, त्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करून अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे हे मास्तर म्हणजेच ‘दीपस्तंभ फौंडेशन’ आणि ‘दीपस्तंभ, मनोबल’ चे संस्थापक मा.युजुर्वेन्द्र महाजन. 

अपंगांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे कार्य महाजन सरांनी केले आहे. महाजनसरांनी या विकालांगांना शोधले नसते, त्यांना प्रेरणा दिली नसती तर स्वतः सरांच्या जीवनात विशेष फरक पडला नसता. कारण,लेखक, यशस्वी मार्गदर्शक, प्रेरणादायी व्याख्याता म्हणून प्रसिद्धी,मानसन्मान आणि पैसा मिळत होता. असे असतानाही, ’समाजाकडून काही घेत असताना समाजाला काहीतरी परत द्यावे लागते.’ या भावनेतून अपंगाच्या समस्या जाणून त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्यात नवी उमेद निर्माण केली. म्हणून त्या अपंगांच्या जीवनात विशेष फरक पडला. हा आदर्श सरांकडून घेण्यासारखा आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

No comments: