Sunday, November 3, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 125

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 125*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

लेई नामक महाविद्यालयीन तरुणाने स्टीव्ह जॉब्स यांच्यासारखे बनायचं स्वप्नं पाहिलं. स्टीव्ह जॉब्स यांच्यासारखे बनण्याच्या संघर्षमय प्रवासाची ही प्रेरणादायी कथा...

16 डिसेंबर 1969 रोजी चीन मधील एका छोट्या शहरात लेई चा जन्म झाला. अनेक यशस्वी व्यक्तींचे जीवन जसे संघर्षमय होते. तसे लेईचेही होते. अनेक तडजोडी करत, एका गजबजलेल्या आणि तणावग्रस्त अशा औद्योगिक वसाहतीत बालपण गेले. लहानपणापासूनच प्रचंड मेहनती आणि हुशार असलेल्या लेर्इ ने कॉम्पुटर सायन्स मधील पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या जीवनावर सर्वाधिक परिणाम करणारी व्यक्ती म्हणजे स्टीव जॉब्स. त्यांच्यासारखं बनण्याचा त्याचा इरादा होता. 

1992 साली kingsoft कंपनीत नोकरीला सुरुवात केली आणि केवळ 6 वर्षातच तो या कंपनीचा CEO बनला. याच काळात त्याने नोकिया आणि मोटोरोला सारख्या आघाडीच्या मोबाईल कंपन्यांसोबत काम केले.

याच कंपनीत काम करता-करता लेईने सन 2000 साली एक ऑनलाईन पुस्तक विक्री करणारी वेबसाईट सुरू केली. या वेबसाईट च्या माध्यमातून त्याने खूप पैसे कमावले. 2004 साली त्याने ही वेबसाईट अमेझॉन या कंपनीला विकली. या व्यवहारातून लेईला प्रचंड पैसे मिळाले. 

पण, लेई अजूनही समाधानी नव्हता. त्याच्यात अजून काही वेगळे करण्याची ऊर्मी होती. म्हणून त्याने 2010 साली एका कंपनीची स्थापना केली. ही कंपनी  Google Andriod Base Custam Rom सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम करायची. या कंपनीने विकसित केलेले फर्मवेयर अतिशय दर्जेदार होते. त्यामुळे ते अल्पावधीतच नावारूपास आले. फर्मवेयर म्हणजे एक असे सॉफ्टवेअर की, जे अँप्लीकेशन आणि ऑपरेटिंग सिस्टिमच्या सिंक्रोनाईझेशनमध्ये सेलफोन ची कार्ये नियंत्रित करते. 

आता लेई चा आत्मविश्वास अधिक वाढला होता. त्याने आता मोबाईल हार्डवेयर क्षेत्रात पाऊल टाकायचे ठरवले आणि त्याने सुरुवात केली. 2011 साली त्यांनी स्वतःचा पहिला स्मार्टफोन बाजारात आणला. बाजारात या स्मार्टफोन ला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. मग त्याच वर्षी आपला दुसरा स्मार्टफोन बाजारात आणला. केवळ 11 महिन्यातच 10 मिलियन मोबाईल्सची विक्री झाली. आता त्याला परदेशी बाजारपेठाही खुणावू लागल्या. भारतात त्याचे स्मार्टफोन अधिक लोकप्रिय झाले होते. केवळ 24 सेकंदात 40000 स्मार्टफोनची विक्री झाली आणि ही स्मार्टफोन कंपनी जगभरातील सर्वात लोकप्रिय कंपनी बनली. ती स्मार्टफोन कंपनी म्हणजेच शाओमी आणि त्याचा मालक म्हणजेच  लेई जून. 

लेई यांच्या जीवन प्रवासातून एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे ध्येय निश्चिती. तुम्हाला कोण बनायचे आहे ? काय करायचे आहे ?  हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला यशाचे मार्ग मिळत नाहीत. केवळ मला हे करायचे आहे. हे ठरवणे म्हणजे ध्येयाची स्पष्टता नव्हे, तर मला हे का करायचे आहे? किती वेळात करायचे आहे ? व कुणासाठी करायचे आहे ? याची सुस्पष्ट उत्तरे मिळवणे म्हणजे ध्येय स्पष्ट करणे होय. लेई यांचे ध्येय स्पष्ट होते. म्हणूनच, ते आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच लेई ने स्टीव जॉब्स सारखे होण्याचे स्वप्नं पाहिले होते. आज शाओमी कंपनीच्या मोबाईल्स ना "अँपल ऑफ चायना" म्हणून ओळखले जाते. तर लेई जून यांना "चीनचा स्टीव जॉब्स" म्हणून ओळखले जाते. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!





No comments: