Saturday, November 10, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 19

पुस्तक म्हणजे गुरू. पुस्तक म्हणजे मार्गदर्शक आणि पुस्तकांमुळेच विचारांची बैठक तयार होते. नवा विश्वास, नवी दिशा, नवी उमेद मिळते ती या पुस्तकांमुळेच. अनेक यशवंतांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य पुस्तकच आहेत. हल्ली आत्महत्या म्हणजे एक फॅडच झाले आहे. जरा कुठे पराभव दिसू लागला कि, चालले आत्महत्या करायला. असाच एक तरुण आत्महत्या करण्याच्या इराद्याने बाहेर पडला. पण, त्याच्या हाती एक पुस्तक पडले आणि बदल घडला. त्या पुस्तकामुळे त्याचे संपूर्ण जीवनच बदलले . पुस्तकांमुळे कोणता परिणाम झाला? पुढे त्याचे काय झाले?.....पाहूया तर मग....

किसन नावाचा एक संवेदनशील तरुण. नुकताच सैन्यदलात भरती झाला होता. सगळे कसे मस्त चालले होते. पण,किसन मात्र मनातून अस्वस्थ होता. अस्वस्थतेचे कारण कर्ज आणि प्रेम यापैकी काहीच नव्हते. जगण्यासाठी माणसाची चाललेली धावपळ,राग,लोभ,द्वेष,एकमेकांची फसवणूक हे सारे पाहून किसन अस्वस्थ झाला होता. निराश झाला होता. 

अनेक प्रश्नांची उत्तरे त्याला हवी होती. त्याचे जीवन नकारात्मक विचारांनी भरून गेले होते आणि आत्महत्या करण्याचा विचारही त्याच्या मनात वरचेवर यायचा. आपल्याला जीवन का नकोसे झाले आहे ? याबद्दल त्याने एक चिट्ठी लिहिली.
उद्विग्न मनःस्थितीत तो एका रेल्वे स्थानकाकडे निघाला. स्थानकावर एका पुस्तकांवर त्याची नजर पडली. पुस्तकाचे नाव होते, “CALL TO THE YOUTH FOR NATION”आणि लेखक होते स्वामी विवेकानंद.

किसनने ते पुस्तक वाचले आणि त्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्या पुस्तकाने त्याला जीवन जगण्याची नवी प्रेरणा मिळाली आणि आपले संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण करण्याचे त्याने ठरवले.

निवृत्त होऊन किसन गावी आला. आपल्या गावाचा विकास केला. आपल्या गावाचा संपूर्ण जगासमोर आदर्श या त्याने घालून दिला. तो किसन म्हणजेच “किसन बाबुराव हजारे.” म्हणजेच अण्णा हजारे.

आण्णांनी त्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन स्वतःचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले. या समाजाला आंदोलनाच्या माध्यमातून बरेच अधिकार प्राप्त करून दिले म्हणूनच आण्णा खरेखुरे यशवंत आहेत.

प्रत्येकाच्या जीवनात आशा-निराशेचे क्षण येतच असतात. पण, आत्महत्त्या हा त्यावरचा उपाय नाही. पुस्तके आपल्या जीवनात निराशेचा अंधार दूर करून आशेचा दिवा पेटवतात आणि आपले जीवन प्रकाशमय करून टाकतात.

आणांच्या आयुष्यातील त्या परीक्षेच्या काळात जर त्यांना पुस्तकाची साथ मिळाली नसती तर.... आणांच्या या यशस्वी जीवनमागील प्रेरणास्रोत हे पुस्तकच आहे. त्यांच्या जीवनातील हा प्रसंग बरेच काही सांगून जातो. तेंव्हा टोकाचा निर्णय घेण्या अगोदर एकदा विचार करा. जीवनातील हरेक संकटासाठी एक मार्ग नक्कीच असतो. त्यासाठी कधी पैसा, तर कधी माणसं आणि कधी कधी वेळ द्यावा लागतो.


No comments: