Monday, December 10, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 80

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 80*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

सेरेब्रल पाल्सीसारख्या महाभयंकर रोगाने त्रस्त असूनही, आपल्या स्वप्नांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या एका महिले चा प्रेरणादायी प्रवास, आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...

1974 साली तिचा जन्म न्यू जर्सी येथे एका पॅलेस्टिनी मुस्लिम कुटुंबात झाला. तिच्या आई-वडिलांचे ती चौथे अपत्य. त्यांना अगोदरच्या तीन मुली होत्या. वडिलांना मुलगा हवा होता. पण, मुलगी जन्माला आल्याने त्यांची थोडी निराशाच झाली. तिचा जन्म होण्याच्या वेळी मद्यधुंद डॉक्टर च्या चुकीमुळे, ऑपरेशन करताना, तिला काही काळ ऑक्सीजन पुरवठा खंडित झाला. परिणामी, तिला सेरेब्रल पाल्सीसारख्या महाभयंकर रोगाला बळी पडावे लागले. जन्माला येऊनही मृतासारखी तिची अवस्था बनली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती आयुष्यात कधीच चालू शकणार नव्हती. तिच्या वडीलांसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यांचा यावर विश्वासच नव्हता आणि त्यांनी ठरवले की, ‘आपल्या मुलीला तिच्या पायावर उभं करायचंच.’

सेरेब्रल पाल्सी हे वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या स्ट्रोकसारखे स्पेक्ट्रम आहे. तिच्या बाबतीत मेंदूतून तिच्या शरीराला संदेश चुकीच्या दिशेने जातात. या सर्व प्रकारांमध्ये तिच्या वडिलांनी तिला एक मंत्र दिला, “ तु हे करु शकतेस, होय तु हे करु शकतेस.” त्यांनी तिला त्यांच्या पायावर उभे राहून चालायला शिकवले. वडिलांची मेहनत फळाला आली आणि ती चालू लागली. 

वडिलांनी तिला डान्स स्कूल मध्ये पाठवले. ती  डान्स शिकली. वेगवेगळ्या समारंभात ती नृत्य करू लागली. वयाच्या बाराव्या वर्षी तिची निवड ‘डान्स एज्युकेटर ऑफ अमेरिका’ च्या वार्षिक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी झाली. तेथे एका संचालकाने उपस्थित मुलींना प्रश्न विचारला,“ तुमचे स्वप्नं काय आहे?” यावर ती म्हणाली, “मला  सेवियान ग्रोवरच्या ब्रिंग इन द नॉंईज, ब्रींग इन द फंक या गीतावर ब्रॉडवे इन या थेटर मध्ये नृत्य करायचे आहे ?” त्यावेळी संचालक म्हणाला, “मुली, तु एक अपंग आहेस. दुसरं स्वप्नं शोध.” या प्रसंगामुळे ती जराही निराश झाली नाही. कारण, तिच्या वडिलांनी दिलेल्या मंत्र, सदैव तिच्या सोबत होता. तिने आपले स्वप्नं बदलले नाही. ती शिकत राहिली. तिने अॅक्टींग साठीची पदवी प्राप्त केली आणि तिच्या करीयरची सुरुवात झाली. तिने काही चित्रपटांमध्ये ही काम केले. येथेही अपंगत्व आणि जातीयता या समस्या वारंवार तिच्या प्रगतीच्या आड येत राहिल्या. त्यामुळे तिने स्टँड-अप कॉमेडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. परंतु, ती आपलं स्वप्नं कधीच विसरली नाही. 

2010 साल तिच्यासाठी तिचं स्वप्नं पूर्ण करण्याची संधी घेऊन आलं. “Arab Gone Wild Standup Comedy Tour” या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती ब्रॉडवे इन या थेटर च्या स्टेजवर प्रथमच आली. ती आली, ते नृत्य करतच. “तु हे करु शकतेस, होय तु हे करु शकतेस.” असा मंत्र जपतच, ती दुसऱ्याच गीतावर नाचली. तिचं स्वप्नं पूर्ण झालं. यावेळी संपूर्ण सभागृह तिच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवत होते. कारण, ती सेरेब्रल पाल्सी ने त्रस्त होती म्हणून नाही, तर तिने ते कमविले होते म्हणून. आपलं स्वप्नं पूर्ण करणारी, ती अमेरिकेतील पहिली मुस्लिम महिला स्टँड अप कॉमेडीयन म्हणजेच मेसून जायद होय.

एका मुलाखतीत मेसून जायद म्हणतात, "माझ्या 99 समस्या आहेत. सेरेब्रल पाल्सी ही फक्त एक आहे." आपण आपल्या जीवनातील समस्यांना किती महत्त्व द्यायचं ? हेच त्यांच्या या वक्तव्यातून लक्षात येतं. किरकोळ अडचणी, समस्यांनी आपल्या ध्येयापासून विचलित होऊन, अर्ध्या वाटेतून माघारी परतणाऱ्या, शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या तरुणतरूणींसाठी, मेसून यांच्या वडिलांनी दिलेला मंत्र एक संजीवनी ठरेल. केवळ त्या संजीवनी मंत्राच्या जोरावर मेसून या सेरेब्रल पाल्सीने त्रस्त असून देखील, त्यांनी आपलं स्वप्नं पूर्ण केलं. आपणही त्यांचा संजीवनी मंत्र मनोमन जपला तर, नक्कीच यशस्वी होऊ. मेसून जायद यांचा स्वप्नंपूर्तीचा संघर्ष, आपणासाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.


No comments: