Sunday, April 30, 2023

कथा क्र. 23 - संकल्पकारी कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 23 - संकल्पकारी कर्मवीर

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.



नुकतंच एका सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्ताने अंगापूर ता.जि.सातारा येथे जाणं झालं. अंगापूर म्हणजे माझी कर्मभूमी. येथील "जिल्हा परिषद केंद्रशाळा नं.1 अंगापूर" या शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या आंतरराष्ट्रीय शाळेत काही काळ काम करण्याची संधी मला मिळाली आणि यानिमित्ताने येथील अनेक शिक्षक व सेवाभावीवृत्तीच्या व्यक्तींशी स्नेह जुळला. 


शांत, सुस्वभावी आणि सेवावृत्ती सत्कारमूर्ती श्री.राजाराम कृष्णा जाधव सर आणि माझ्या मार्गदर्शिका, सहकारी शिक्षिका सौ. सुनिता यशवंत गरुड मॅडम यांनी अगदी अनपेक्षितपणे कर्मवीर पुतळा सुशोभीकरण कामासाठी देणगी दिली. या देणगीमुळे मी अक्षरशः भारावून गेलो. 


माझ्या विचारांची चक्र सुरू झाली. अंगापूर आणि कर्मवीर यांचं एक आगळंवेगळं नातं नजरेसमोर आलं आणि मग कथेचा विषय मिळाला. "संकल्पकारी कर्मवीर"


1922 साली सातारा जिल्ह्यातील अंगापूर येथे प्राथमिक शिक्षकांची एक परिषद भरलेली होती. कर्मवीर या परिषदेचे अध्यक्ष होते. त्या वेळी प्राथमिक शाळेत शिकवणारे बहुतेक शिक्षक हे व्ह.फा. (व्हर्नाक्युलर फायनल ) म्हणजे मराठी सातवी झालेले असत. 


"प्रत्येक गावात शाळा असली पाहिजे आणि त्या शाळेतला शिक्षक हा प्रशिक्षित असला पाहिजे." असे कर्मवीरांचे मत होते. परंतु प्रशिक्षणाकरिता अध्यापन विद्यालयाची उणीव होती. अध्यापन विद्यालयाचे महत्त्व लक्षात घेऊन कर्मवीरांनी ट्रेनिंग कॉलेज, अध्यापन विद्यालय सुरू करण्याचा संकल्प सोडला.


संकल्प सोडून पंधरा वर्षे उलटल्यावरही अध्यापक विद्यालयाची उभारणी अद्याप झाली नव्हती. याचं शल्य कर्मवीरांना टोचत होतं. तरीही ते योग्य वेळेची वाट पाहत होते. शेवटी ती वेळ आलीच.


भारतावर इंग्रजांचे राज्य होते. बादशहा पंचम जॉर्ज यांच्या कारकीर्दीस 25 वर्षे झाली असल्याने, सर्व साम्राज्यामध्ये रजत महोत्सव साजरा करावा, असे फर्मान निघाले. त्या वेळी सातारा जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून हमीद ए. अली होते. ते समाजसेवेचे चाहते होते. त्यामुळे त्यांचा कर्मवीरांच्या कार्याकडे अधिक ओढा होता. त्यांनी कर्मवीरांच्या वसतिगृहांना भेट दिली. 


"पंचम जॉर्ज कारकीर्दीचा रौप्यमहोत्सव साजरा करावा." अशी इच्छा कलेक्टर हमीद ए. अली यांनी कर्मवीरांना बोलून दाखविली. 

कर्मवीरांनीही त्यांना आश्वस्त केले.


रौप्य महोत्सवाच्या चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्याचे कर्मवीरांनी ठरविले. त्यांनी अद्ययावत अध्यापक विद्यालय काढण्याचा विचार हमीद अलींपुढे मांडला. 


कर्मवीर म्हणाले, "सिल्व्हर देणार असाल तर, सिल्व्हर ज्युबिली मोठ्या प्रमाणात साजरी करू."


हमीद अलींना कर्मवीरांची कल्पना आवडली. त्यांनी याकरिता एक हजार रुपयांची देणगी दिली आणि 16 जुलै 1935 रोजी फरासखान्यातील छापखान्याच्या इमारतीत, 'सिल्वर ज्युबली ट्रेनिंग कॉलेज' सुरू झाले आणि खऱ्या अर्थाने हे भारतात देशातील खाजगी संस्थांनी सुरू केलेले पहिले ट्रेनिंग कॉलेज ठरले.


कर्मवीरांनी त्यांच्या जीवनात अनेक संकल्प सोडले. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. "रयत" सारखी संस्था ही त्यांच्या संकल्पपुर्तीचं ज्वलंत उदाहरण आहे. आपला प्रत्येक संकल्प पूर्ण होतोच, त्यासाठी प्रयत्नांच्या जोडीला संयमाची साथ असणं गरजेचे. 


कर्मवीरांच्या दुधगांव येथील पुतळा सुशोभीकरणा चा संकल्प समस्त दुधगांवकरांनी सोडला. या कार्याला अनेक दातारांनी मदत केली आहे आणि करत आहेत, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार...!


धन्यवाद..!


No comments: