Saturday, May 6, 2023

असे हे कर्मवीर - कथा क्र. 24 - समानतेचे धडे देणारे कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 24 - समानतेचे धडे देणारे कर्मवीर

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.



कालच लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतीशताब्दी समारोप संपन्न झाला. आमच्या जिल्हा परिषद शाळा बागणी नं. 1 व नं. 2 या शाळांमध्ये देखील मोठ्या उत्साहात हा समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त करताना महाराजांच्या काही आठवणींना उजाळा देता आला. गंगाराम कांबळे यांच्या चहाच्या टपरीवरील प्रसंग विद्यार्थ्यांना सांगताना महाराजांची पुरोगामी विचारासरणी फारच भावली. खरंतर कर्मवीर हे देखील शाहू महाराजांच्या मुशीतच तयार झालेले एक व्यक्तिमत्व. कोल्हापूर येथे शिक्षण घेत असताना काही काळ महाराजांच्या राजवाड्यात राहण्याचा योग कर्मवीरांना आला. यावेळी त्यांना महाराजांचे व्यक्तिमत्व जवळून अनुभवता आले. रयत शिक्षण संस्थेची उभारणी करताना कर्मवीरांना महाराजांचे विचार फार उपयोगी पडले. महाराजांच्या पुरोगामी विचारांचा पगडा कर्मवीरांवर पडला होता. त्यामुळे आजच्या कथेचा धागा मिळाला. जातीभेद, वर्णभेद मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मवीरांची आजची ही कथा...


कथा क्र. 24 - समानतेचे धडे देणारे कर्मवीर


एकदा कर्मवीर टाकळीभान गावात भेटीला गेला. त्या गावातली सभा संपल्यावर सगळी प्रमुख मंडळी जेवायला बसली. त्या वेळेपावेतो. कर्मवीरांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली होती. मोठ्या थाटात 30-40 जणांची पंगत बसली होती. जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात कर्मवीर खणखणीत आवाजात म्हणाले,

“अरेऽ माझा ड्रायव्हर उद्धव कुठे आहे ? त्याला जेवायला बसवा." 


"त्यालाही बसवतो अण्णा... पण तुम्ही सुरू करा." गांगरून यजमानांनी खुलासा केला. पण, त्याने कर्मवीरांचे मुळीच समाधान झाले नाही. 


“तसं नाही. आधी त्याला बसवा आणि याच पंगतीत बसवा. तो बसल्याशिवाय मी मुळीच घास घेणार नाही. त्याचंही ताट वाढा आणि मगच जेवणाला सुरुवात होईल.” कर्मवीर कडाडले.


कर्मवीरांचा तो अनपेक्षित रुद्रावतार पाहून स्थानिक यजमान पुरते गांगरून गेले. घाईघाईने त्यांनी उद्भवला बोलावून आणले. त्याचे पाटपाणी घेतले. त्याला सन्मानाने पंगतीत बसवले. त्याला सगळे पदार्थ वाढले. कर्मवीर स्थिर बसून हे सगळे बघत होते. हे सगळे झाल्यावर मग ते म्हणाले, “उद्धवऽ कर रे आता सुरुवात."


उद्धवने जेवायला सुरुवात केली. त्यानंतर मग “हंऽऽ आता करा सुरू...." असे कर्मवीर सर्वांना उद्देशून म्हणाले आणि त्यानंतर मग त्यांच्या आणि इतरांच्या जेवणाला सुरुवात झाली.


त्या वेळचा पंक्तिप्रपंच जातिभेदावर आधारलेला होता. तो चुकीचाच होता. एकेकाळी सज्जनगड आणि औदुंबर इथे तीर्थस्थानी होणाऱ्या पंक्तिप्रपंचावर कर्मवीरांनी आगपाखड केली होती. ब्राह्मणांना आणि ब्राह्मणेतरांना एकाच वेळी आणि एकाच जागी प्रसादाचे जेवण वाढले पाहिजे. हा त्यांचा तेव्हा आग्रह होता. टाकळीभानमध्येही उद्भवला आपल्याच पंगतीला बसवण्याचा त्यांचा आग्रह त्याच समानतेच्या भूमिकेतून होता.


कर्मवीरांनी समानतेचे तत्व तहयात पाळले. त्यांनी आपल्या कृतीतून समानतेचा धडा संपूर्ण महाराष्ट्राला दि

ला आहे. 


धन्यवाद..!


No comments: