Tuesday, May 9, 2023

असे हे कर्मवीर समारोप निमित्ताने

आज 9 मे कर्मवीरांचा स्मृतिदिन. यानिमित्ताने कर्मवीरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!




दुधगांव, ता. मिरज या माझ्या गावी कर्मवीरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण कार्य गावातील ग्रामस्थांनी सुरू केले आहे. तब्बल 34 वर्षांपूर्वी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसहभागातूनच कर्मवीरांच्या पुतळ्याची उभारणी केली होती. तब्बल साडेतीन दशकांनंतर कर्मवीरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू झाले. या कामी तब्बल 15 लाखांचा निधी खर्च होणार आहे. दुधगांव मधील आणि परिसरातील तसेच, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक कर्मवीरप्रेमीने सुशोभीकरणासाठी सढळ देणगी देऊन सहकार्य केले. यामुळेच सुशोभीकरणाच्या कामाने गती घेतली. काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच लोकार्पण सोहळाही संपन्न होईल.


सुशोभीकरण कामाच्या निमित्ताने समिती गठीत करण्यात आली. पारदर्शकता हा महत्वाचा दुवा, जो समितीने कायम जपला आहे. अनेकदा बैठकीचे आयोजन केले गेले. यात दर आठवड्याला एक लेख, बातमी प्रसारित करण्याचा विषय चर्चेला आला. समितीतल्या एका सदस्याने मला लेख लिहिण्याविषयी आग्रह केला. मी होकार दिला. खरंतर कर्मवीरांचा संपूर्ण जीवनपट मी बारकाईने कधीच अभ्यासला नव्हता. या निमित्ताने तो अभ्यासता येईल, असा माझा होकारा मागील स्वार्थीभाव.


सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात येईतोपर्यंत दर रविवारी एक कथा लिहिण्याचं आणि प्रसारित करण्याचं मी पक्क ठरवलं. लगेच, कर्मवीर सार्वजनिक वाचनालयातून कर्मवीरांच्या जीवनावर आधारित दोन-तीन पुस्तके आणली. माझं कर्मवीर पारायण सुरु झालं. कथा मालिकेला काय नाव द्यायचं ? याचा फार विचार करावा लागला नाही. "असा हा कर्मवीर" हे नाव पक्क केलं होतं. 


27 नोव्हेंबर 2022 रोजी पहिली कथा प्रसारित केली. दोन तीन भाग लिहिले. पण, नंतर काही वाचक मित्रांनी "असा हा कर्मवीर" ऐवजी "असे हे कर्मवीर" असा बदल नावात सुचविला. हा बदल मी तात्काळ स्वीकारला. आजवर तब्बल 24 कथा लिहून पूर्ण झाल्या आहेत.


"असे हे कर्मवीर" लिहिताना कर्मवीरांचे कार्य, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू जवळून अभ्यासता आले. कर्मवीरांचा आचार, विचार आणि संचार वाचताना अंगावर शहारे आले. माहित नसलेल्या अनेक घटना वाचनात आल्या. अनेकदा त्यांचा खडतर प्रवास वाचताना थक्क व्हायला झालं. धाडसी व बंडखोर वृत्ती, तत्वनिष्ठ व स्पष्टवक्ता स्वभाव, प्रचंड ध्येयवादी, कठोर मेहनती, दृढनिश्चयी वृत्ती, कर्तव्य परायण, पारदर्शी व्यवहार, पुरोगामी विचारवंत आदी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू प्रकर्षाने जाणवले आणि त्यांनी प्रभावित देखील केले. आज कर्मवीरांच्या स्मृतीदिनानिमित्त या कथा मालिकेचा समारोप करतोय. 


खरंतर या लेखनातून कर्मवीरांचे कार्य व पुतळा सुशोभीकरणाची सद्यस्थिती फोटोंच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवता आली. देणगी साठी आवाहन करता आलं. अनेक दातारांनी देणगी देतेवेळी "असे हे कर्मवीर" चा आवर्जून उल्लेख केल्याचे समितीतील काही प्रमुख सदस्यांनी कळविले. याबरोबरच माझ्यावर विश्वास ठेऊन माझ्या संपर्कात असलेल्या काही शिक्षक बंधू भगिनींनी पुतळा सुशोभीकरणासाठी निधी दिला. हेही या कथामालेचं यश म्हणता येईल.


कथा मालिकेला महाराष्ट्रातील अनेक वाचकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. नेहमीप्रमाणे लेखाचं आणि लेखनाचं भरभरून कौतुक झालं. या निमित्ताने अनेक नवीन मित्रांचा परिचय झाला आणि जुन्या मित्रांशी असलेलं नातं अधिक घट्ट झालं. चौकटीच्या बाहेर जाऊन लेखन करता आलं. खऱ्या अर्थानं कर्मवीर समजून घेता आलं. 


आज कर्मवीरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने "असे हे कर्मवीर" या कथामालेचा समारोप करतोय. आशा आहे की, ही कथा मालिका आपणांस आवडली असेल. लवकरच भेटू पुन्हा एखाद्या नव्या विषयांसह... तोपर्यंत नमस्कार...! धन्यवाद...

No comments: