*डबडबलेल्या डोळ्यांनी शिवाजीरावांनी त्या खाजगी शाळेच्या स्कूल व्हॅनचे स्टिअरिंग घट्ट पकडले होते. ही गाडी चालवून मिळणाऱ्या पगारातून त्यांना घराचा गाडा हाकायचा नव्हता, तर आपल्या मुलीचे राजनंदिनीचे अडकलेले भविष्य सोडवायचे होते.*
एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या राजनंदिनीसाठी शिक्षणाची वाट सुरुवातीपासूनच काट्याकुट्यांची होती. तिच्या आई-वडिलांनी मोठ्या आशेने एका खाजगी शिक्षण संस्थेत तिचा प्रवेश निश्चित केला खरा, पण ढासळलेली गुणवत्ता, वाढती फी आणि नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे तिथले शिक्षण तिच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले. शेवटी नाईलाजाने वडिलांनी तिला तिथून काढून जिल्हा परिषद शाळेत घालण्याचा निर्णय घेतला.
*परंतु, गरिबीची थट्टा तिथेच थांबली नाही. खाजगी शाळेने कागदोपत्री दाखला हातात टेकवला, पण ऑनलाइन पोर्टलवरून तिला 'Detach' करण्यास स्पष्ट नकार दिला. "आधी थकीत फी भरा, मगच पोर्टलवरून नाव कमी करू," असे ठाम उत्तर व्यवस्थापनाकडून मिळाले. हातावर पोट असलेल्या वडिलांकडे एकाच वेळी इतके पैसे भरायची ताकद नव्हती. आपल्या लेकीचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्या बापाने एक कठोर निर्णय घेतला. ज्या खाजगी संस्थेने अडवणूक केली होती, त्याच शाळेच्या बसवर त्यांनी दोन महिने ड्रायव्हर म्हणून काम केले. अहोरात्र कष्ट करून घामाच्या पैशातून जेव्हा त्यांनी फीचा पै-पै चुकता केला, तेव्हा कुठे राजनंदिनी खऱ्या अर्थाने मोकळी झाली आणि जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी बनली.*
जिल्हा परिषद शाळेच्या वातावरणात राजनंदिनी विरघळून गेली. तिसरी ते पाचवीपर्यंतचे तिचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. मनामध्ये नवोदय विद्यालयात जाण्याचे मोठे स्वप्न होते, पण नशिबाने साथ दिली नाही आणि ते स्वप्न अपूर्णच राहिले. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही तिला अपयश आले. एकामागून एक येणाऱ्या या अपयशांनी ती काहीशी खचली होती, पण तिच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी तिची साथ सोडली नाही. त्यांनी *तिला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर प्रतिकूल परिस्थितीत पाय घट्ट रोवून कसे उभे राहायचे, याची दिशा दाखवली.*
शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तिच्यातील जिद्द पुन्हा जिवंत झाली.
काळ पुढे सरकला आणि राजनंदिनी आठवीत पोहोचली. नुकताच 'NMMS' परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि संपूर्ण पंचक्रोशीत तिचे नाव गाजू लागले. माध्यमिक विद्यालयात पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये *ती एकमेव अशी विद्यार्थिनी ठरली, जिने थेट शिष्यवृत्तीवर आपले नाव कोरले होते. ४८,००० रुपयांची ही शिष्यवृत्ती तिच्या संघर्षाचे फळ म्हणून तिच्यासमोर उभी होती.*
आज सकाळी जेव्हा ती शाळेत आली आणि तिने कृतज्ञतेने आपल्या शिक्षकांचे पाय धरले, तेव्हा तिच्या डोळ्यांतील चमक सांगत होती की तिचा संघर्ष वाया गेला नाही. पेढ्याचा पुडा हातात घेऊन आलेल्या वडिलांच्या चेहऱ्यावर आज दोन महिने बस चालवल्याचा थकवा नव्हता, तर एक असीम समाधान होते. तिची आई गदगदल्या स्वरात जेव्हा म्हणाली, *"सर, तुम्ही रस्ता दाखवला आणि माझ्या लेकीचे सोने झाले,"* तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मराठी शाळेच्या गुणवत्तेची प्रचिती आली.
*खाजगी शाळांच्या झगमगाटापेक्षा जिल्हा परिषद शाळेतील संस्कार आणि शिक्षकांचे निस्वार्थ मार्गदर्शन एका सामान्य कुटुंबातील मुलीला यशाच्या शिखरावर नेऊ शकते, हे राजनंदिनीने सिद्ध करून दाखवले आहे. म्हणूनच, ती एक यशवंत आहेत.*
*NMMS परीक्षेतील यशाबद्दल राजनंदिनी तुझे मनःपूर्वक अभिनंदन...! यशवंत हो...!*
*धन्यवाद...!*

No comments:
Post a Comment