Saturday, April 25, 2026

दीपकमल - कर्तव्य, कर्तृत्व अन् कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम



यशवंत - एक प्रेरणास्त्रोत


दीपकमल - कर्तव्य, कर्तृत्व अन् कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम


शिक्षण क्षेत्राच्या क्षितिजावर जेव्हा निष्ठेचा सूर्य तळपतो, तेव्हा समाजऋणाचे आणि ज्ञानदानाचे एक अनोखे पर्व आकाराला येते. अशाच एका ध्येयप्रेरित पर्वाची सांगता आज होत आहे. श्री. दीपक आनंदराव कोडग सर आज आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत; त्यानिमित्ताने सर आणि सौ. कमल दीपक कोडग मॅडम या उभयंतांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा एकत्रित घेतलेला हा मागोवा...

'शिक्षक' हा केवळ पेशा नसून ते एक जीवनव्रत आहे, हे या दांपत्याने आपल्या प्रदीर्घ प्रवासातून सिद्ध केले आहे. शांत, संयमी आणि तितकाच प्रसन्न स्वभाव असलेल्या या दांपत्याकडे पाहिले की, 'Made for each other' या उक्तीचा सार्थ प्रत्यय येतो. शास्त्रातील ३६ गुणांच्या पलीकडे जाऊन विचारांचे आणि स्वभावाचे जे अद्वैत त्यांच्यात पाहायला मिळते, ते आजच्या धकाधकीच्या काळात खरोखरच विरळ आहे.

सत्य वचन आणि सत्य आचरण हेच ज्यांच्या जीवनाचे अधिष्ठान राहिले आहे, अशा या उभयतांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रामाणिकपणाचे तेज सदैव झळकत राहिले. सौ. कोडग मॅडम या दुधगावच्या, म्हणजेच माझ्या गावच्या कन्या असल्याने त्यांच्याशी असणारे नाते केवळ व्यावसायिक न राहता ते 'आत्या' या शब्दातील ओलाव्यापर्यंत जाऊन पोहोचले. नात्यांची गुंफण कशी करावी आणि ती आपुलकीने कशी जपावी, याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे.

याच आपुलकीची प्रचिती आम्हाला आमच्या यशाच्या क्षणी आली. २०२२ साली जेव्हा सौ. राजश्रीने राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत यश मिळवले, तेव्हा आमची पहिलीच भेट असूनही त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला घरी बोलावून जो गौरव केला, तो प्रसंग आमच्या स्मृतीच्या गाभाऱ्यात आजही जिवंत आहे. स्नेहाचा हा ओघ इथेच थांबला नाही; तर २०२६ च्या राज्यस्तरीय स्पर्धेतील माझ्या यशाची बातमी मिळताच, त्यांनी स्वतः आमच्या घरी येऊन जो कौटुंबिक जिव्हाळा दर्शवला, त्याने आम्ही भारावून गेलो.


कर्तृत्वाचे असे उत्तुंग शिखर गाठूनही त्यांच्यातील साधेपणा हा हिऱ्यासारखा पैलू पाडलेला वाटतो. त्यांचे केवळ बाह्य जीवनच नव्हे, तर कौटुंबिक जीवनही तितकेच त्यागमयी राहिले आहे. मॅडमच्या बंधूंच्या दीर्घ आजारपणात संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ बनून उभे राहणे असो, किंवा आईच्या आजारपणात तळहाताच्या फोडाप्रमाणे घेतलेली काळजी असो; या दांपत्याने माणुसकीचा आणि कौटुंबिक कर्तव्याचा जणू हिमालयच उभा केला आहे. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती आणि मदतीसाठी नेहमीच तत्पर राहणारे त्यांचे हात, हे त्यांच्या निर्मळ अंतःकरणाचे प्रतिबिंब आहे.

शिक्षक म्हणून अध्यापनाचे पवित्र कार्य करताना त्यांनी केवळ अक्षरांची ओळख करून दिली नाही, तर हजारो विद्यार्थ्यांना जगण्याची नवी दृष्टी आणि मूल्ये दिली. म्हणूनच, आज त्यांचे असंख्य विद्यार्थी समाजात ताठ मानेने वावरत असताना या गुरुवर्य दांपत्याच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले आहे, असे म्हणावे लागेल.

अशा प्रकारे, श्री. दीपक कोडग सर आणि सौ. कमल कोडग मॅडम यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ सेवेच्या चौकटीत न बांधता, ते निष्ठेच्या आणि समर्पणाच्या गंधाने सुगंधित केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि मूल्यांशी कधीही तडजोड न करता त्यांनी जे यश संपादन केले, ते केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या शब्दांत माणुसकीचा ओलाव्यासोबतच समाजाप्रती असलेली कृतज्ञता नेहमीच दिसून आली. त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणाचा प्रकाश आहे आणि ज्यांचे आयुष्य म्हणजे ध्येयवादाची एक अखंड गाथा आहे; म्हणूनच, श्री. कोडग सर आणि सौ. कमल मॅडम आपण उभयंत खऱ्या अर्थाने 'यशवंत' आहात.

आपल्या कार्याचा हा गौरवशाली वारसा नव्या पिढीला सदैव प्रेरणा देत राहील. सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा विराम नसून, तो एका नव्या आनंदी अध्यायाचा प्रारंभ आहे. सरांचे ज्ञान आणि मॅडमची माया यांचा आशीर्वाद आम्हा उभयंतांवर असाच कायम राहो. आपल्या पुढील आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाचा, समाधानाचा आणि निरामय आरोग्याचा लाभावा, हीच ईश्वराकडे मनापासून प्रार्थना!

शुभेच्छुक

श्री. संदीप पाटील व सौ. राजश्री पाटील, दुधगांव

No comments: