🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *मित्रवर्य बाबूराव कुडचे याच्या केंद्रप्रमुख परीक्षेतील यशाच्या निमित्ताने...*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
माझा जिवलग मित्र बाबूराव संगाप्पा कुडचे याने नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या खात्यांतर्गत झालेल्या केंद्रप्रमुख/केंद्र समन्वयक परीक्षेत २०० पैकी तब्बल १७० गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्ह्यातही त्याने प्रथम क्रमांक पटकावला. ही बातमी ऐकली आणि मन खरंच आनंदाने भरून आले. मित्र म्हणून अभिमान वाटावा असा हा क्षण आहे.
२००९ पासून बाब्या माझा मित्र आहे. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आमची ओळख झाली आणि हळूहळू ती घट्ट मैत्रीत बदलली. एकाच जिल्ह्यातील आणि एकाच तालुक्यातील असल्यामुळे आपुलकी अधिक वाढली. पुढे आम्ही रूम पार्टनरही झालो. त्या काळात संदीप कातोरे (नगर), तुषार गाडेकर (मंचर), सिद्धेश्वर गुळवे (धाराशिव), संदीप पोपळघट (नगर), योगेश्वर वसावे (नंदुरबार), बाळासाहेब गोटे (बुलढाणा) आणि अभियंता निलेश कांबळे (सातारा) असे आम्ही सर्वजण पालघर जिल्ह्यातील मनोर येथे एकत्र राहायचो. तो काळ खूप आठवणींनी भरलेला आहे.
तो बरडेपाडा-सावरे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होता. शिक्षणसेवक कालावधीत २०११ साली बाबूला स्पर्धा परीक्षेचं अक्षरशः वेड लागलं. त्याचा फोकस फक्त अभ्यासावर असायचा. तो सतत वाचत असायचा, अभ्यास करत असायचा. त्याने मलाही स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला दिला होता. पण त्या वेळी मी ते मनावर घेतले नाही. उलट आम्ही सगळे रूम पार्टनर कधी कधी त्याची चेष्टाही करायचो. पण, बाब्याने कधीही आपलं ध्येय सोडलं नाही.
त्याच्या मनात प्रचंड जिद्द होती. अपयश आले तरी तो खचला नाही. अनेक वेळा परीक्षा दिल्या, अनेकदा अपयशही आले. पण त्याने प्रयत्न थांबवले नाहीत. त्याची चिकाटी आणि मेहनत पाहिली की खरंच आश्चर्य वाटायचं. यश त्याला लगेच मिळालं नाही, पण त्याने आशा सोडली नाही. आज वयाची चाळीशी गाठूनही त्याची शिकण्याची आणि अभ्यास करण्याची भूक तशीच आहे.
२०१९ साली सांगली जिल्ह्यात बदली झाली. सध्या तो कवठेमहांकाळ तालुक्यातील धुळगाव स्टेशन येथे कार्यरत आहे. बदली झाल्यानंतर त्याच्यावर शेतीचीही जबाबदारी आली. खटावसारख्या दुष्काळी भागात शेती सांभाळणे सोपे नव्हते. पण, त्याने तेही आव्हान म्हणून स्वीकारले. शाळेची जबाबदारी, वयस्कर आई-वडिलांची सेवा, मुलांचे शिक्षण आणि शेतीची कामे करत असतानाही त्याने अभ्यास सोडला नाही.
या सगळ्या प्रवासात त्याला सौ. सोनाली वहिनी यांचीही मोठी साथ मिळाली. घराची जबाबदारी सांभाळत त्यांनी बाबूला नेहमी अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. कोणत्याही मोठ्या यशामागे कुटुंबाचा आधार असतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
आज त्याच्या त्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे. केंद्रप्रमुख परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवणे ही छोटी गोष्ट नाही. हा फक्त निकाल नाही, तर जिद्द, चिकाटी आणि संयम यांचा विजय आहे.
मित्र म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो. त्याची ही यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे. परिस्थिती कशीही असो, प्रयत्न सोडले नाहीत तर यश नक्की मिळते, हे बाब्याने आपल्या आयुष्यातून दाखवून दिले.
माझ्या या जिवलग मित्राचे आणि सोनाली वहिनींचेही सॉलिड अभिनंदन. पुढील आयुष्यातही त्याला असेच मोठे यश मिळत राहो, हीच मनापासून शुभेच्छा...!
धन्यवाद...!

No comments:
Post a Comment