Sunday, September 1, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 108


🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 108*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

अमेरिका. बलाढ्य अमेरिका. हीच अमेरिका एकेकाळी कृष्णवर्णीयांवर मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार करायची. याच अमेरिकेतील श्वेतवर्णीय, कृष्णवर्णीयांना गुलाम म्हणून राबवायचे. कृष्णवर्णीयांचा मोठ्या प्रमाणात छळ करायचे. हे सगळं पाहून एका मुलाने ही गुलामगिरी संपुष्टात आणण्याचा निर्धार केला. त्या मुलाच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...

12 फेब्रुवारी 1809 मध्ये अमेरिकेतील एका निरक्षर, गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. तो नऊ वर्षाचा असतानाच, त्याच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. त्या सावत्र आईला, पहिल्या नवऱ्यापासून तीन मुले होती. सहाजिकच, तो या दोघांपासून दूर गेला. 

तो काळ म्हणजे कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीचा काळ. त्याकाळी श्वेतवर्णीय लोक, कृष्णवर्णीयांवर मोठा अन्याय, अत्याचार करायचे. त्यांना आपले गुलाम म्हणून ठेवायचे. गुलामगिरीचे जगणे काय असते ? हे त्याला खूप जवळून पहायला मिळाले होते. त्यामुळे गुलामगिरीच्या विरोधात त्याच्या मनात चीड निर्माण झाली होती. 

तो कुशाग्र बुद्धिमत्तेचा. परंतु वडिलांच्या गरीब परिस्थितीमुळे त्याला शिक्षण पूर्ण करण्यात खूप सार्‍या अडचणी आल्या. कसेबसे त्याचे शिक्षण पूर्ण झाले. "पुस्तक वाचणे" हा त्याच्या आवडीचा छंद. या छंदासाठी तो काहीही करायचा. पुस्तकांमुळे त्याचे मस्तक सुधारले आणि अन्यायाच्या विरोधात त्याच्या मनी चीड निर्माण झाली. " एक दिवस कृष्णवर्णीयांना, श्वेतवर्णीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचेच." हा निर्धार त्याने केला. 

वयाच्या 22 वर्षी त्याने मजुरी सुरू केली. 
कधी तो चौकीदार झाला, कधी दुकानदार. कधी त्याने दारू विक्रेता बनला. पण, कोणत्याच कामात त्याला यश मिळाले नाही. 

गरीब लोकांची होत असलेली पिळवणूक पाहून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याने कायद्याच्या शिक्षण घेतले. शिक्षण घेण्यासाठी तो कोणत्या विद्यालयात गेला नाही. केवळ पुस्तके वाचूनच तो शहरातील सर्वात प्रमाणिक वकील बनला. तो आपल्या अशिलांकडून खूप कमी पैसे घेत असे.

वयाच्या तेविसाव्या वर्षी, तो राजकारणात उतरला. त्याने आपली पहिली निवडणूक लढवली. पण, त्यातही तो अपयशी ठरला. तो तब्बल चार वेळा निवडणूक हरला. पण, प्रयत्न सोडला नाही. 

1860 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली. या ही निवडणुकीत त्याने आपली दावेदारी सिद्ध केली. या निवडणुकीत मात्र तो यशस्वी झाला आणि तो अमेरिकेचा 16 वा राष्ट्राध्यक्ष बनला. 

जो निर्धार त्यांनी खूप वर्षा आधीच केला होता. तो निर्धार त्याने अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्या झाल्या लगेचच पुर्णत्वास नेला. अमेरिकेतील गुलामगिरी त्याने मोडीत काढली. गुलामगिरी मोडीत काढून कृष्णवर्णीयांना जगण्याचा नवा मार्ग मिळवून देणारा, तो राष्ट्राध्यक्ष म्हणजेच अब्राहम लिंकन होय. 

अत्यंतिक गरीब कुटुंबात जन्म, शिक्षणासाठी हाल-अपेष्टा,प्रत्येक नोकरी-व्यवसायात अपयश, 
निवडणुकीत चार पेक्षा अधिक वेळा पराभव, तरीदेखील अब्राहम लिंकन यांनी आपला निर्धार सोडला नाही. प्रयत्न करणे थांबवले नाही. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आलेच. गुलामगिरी संपुष्टात आणण्याचा जो  निर्धार  त्यांनी खूप आधी केला होता, तो निर्धार त्यांनी पूर्ण केला.

निर्धार माणसाला यशस्वी बनवितो. आपला निर्धार किती पक्का आहे ? यावरच यश अवलंबून असते. याची जाणीव असायला हवी. 

लिंकन आपल्या आयुष्यात ज्या चार निवडणुका हरले, ते केवळ गुलामगिरी विरोधात होते म्हणूनच.

निवडणूक जिंकण्यासाठी, विजय होण्यासाठी त्यांनी आपला निर्धार, आपले ध्येय, बदलली नाही. म्हणूनच, पाचव्या प्रयत्नात का होईना पण, ते यशस्वी झालेच. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!

लिंकन यांचे प्रेरणादायी विचार 

◆ मला झाड तोडायला 6 तास द्या. नक्कीच त्यातील 4 तास कुऱ्हाड घासण्यासाठी खर्च करेल.

◆ जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीमध्ये वाईट शोधाल, निश्चितपणे तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये वाईट सापडेल.

◆ मी जिंकण्यासाठी बांधील नाही.पण, मी चांगलं आणि वाईट होण्यासाठी बांधील आहे.

◆ जेव्हा मी चांगलं करतो, तेव्हा मला चांगलं वाटतं. जेव्हा मी वाईट करतो, तेव्हा मला वाईट वाटतं. तो माझा धर्म आहे.

◆ नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प, हे इतर कोणत्याही संकल्पापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहेत.


लाईक करा. फॉलो करा. आपल्या प्रतिक्रीया नोंदवा.

No comments: