Friday, October 4, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग -118

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 118*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.* 

वयाच्या 50 व्या वर्षी झालेल्या अपमानामुळे कौटुंबिक व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या एका महिलेचा हा प्रेरणादायी प्रवास....

26 सप्टेंबर 1964 रोजी शिक्षक असलेल्या पित्याचा पोटी तिचा जन्म झाला. दहा वर्षं नोकरी केल्यानंतर वडिलांनी नोकरी सोडली आणि आपल्या भावाच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायात हातभार लावण्यासाठी सहभागी झाले. तिचे वडील प्रचंड मेहनती असल्याने त्यांनी तो व्यवसाय नावारूपास आणला. परंतु, वडिलांचे आणि काकाचे पटले नाही. त्यामुळे वयाच्या 50 व्या वर्षी ते त्यातून बाहेर पडले. 

तिच्या वडिलांनी ती, एक बहिण आणि दोन भाऊ यांना सोबत घेऊन एका नव्या कंपनीची सुरुवात केली. एक अशी कंपनी जी, मराठी माणसांच्या मानसिकतेचा विचार करून पर्यटनाची उत्तम संधी उपलब्ध करून देत असे. 

वडिलांनी अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर अल्पावधीतच होती कंपनी नावारूपास आली. वय झाल्याने वडिलांनी कारभार तिच्या हातात दिला. ज्यावेळी ती त्या कंपनीची एमडी झाली, त्यावेळी ती कंपनी दोनशे कोटींची होती. तिने आपल्या कल्पकतेने, व्यवसाय चातुर्याने आणि मेहनतीने केवळ सात वर्षातच, ती कंपनी साडेसातशे कोटींवर नेली. 

हा व्यवसाय त्यांचा कौटुंबिक व्यवसाय. भावाच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे, तिला कशाचीही कल्पना न देता, एमडी पदावरून काढून टाकण्यात आले. तिची नेमणूक फक्त कंपनीची मेन्टोर ( सल्लागार ) म्हणून करण्यात आली. 

तिला या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला. जी कंपनी आपण प्राणपणाने जपली, तिला यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन पोहोचवले, त्याच कंपनीत तिला संतापजनक वागणूक मिळत होती. झालेला हा अपमान तिला मुळीच सहन झाला नाही आणि तिने कंपनीतून बाहेर निर्णय घेतला. तेही वयाच्या 50 व्या वर्षी. 

कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी तिच्याजवळ भविष्याची कोणतीही योजना नव्हती. हाती कसलेही भांडवल नव्हते. फक्त पाठीशी तीस वर्षाचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायातील अनुभव होता आणि यांचा अनुभवाच्या जोरावर तिने एका नव्या कंपनीची सुरुवात केली. केवळ दीडच महिन्यात तिने नव्या कंपनीची स्थापना केली. आपल्या अनुभवाच्या जोरावर केवळ पाच महिन्यात तब्बल 14000 पर्यटकांना, पर्यटनाची संधी उपलब्ध करून दिली. ज्या महिलेने वयाच्या पन्नाशीत हा पराक्रम केला. ती महिला म्हणजेच वीणा वर्ल्डच्या संस्थापिका वीणा पाटील होय.

शून्यातून विश्व निर्माण करणारी, हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जी काही महिला व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहेत, त्यापैकीच एक म्हणजे वीणा पाटील. आश्चर्यकारक रीतीने त्यांना केसरी टूर्स मधून बाहेर पडण्याची वेळ आली. बाहेर पडताना त्यांना जरी त्रास झाला असला, तरी ती त्यांच्यासाठी एक नवी संधी होती. 

ही तिच संधी होती, स्वतःला सिद्ध करण्याची...
ही तिच संधी होती, स्वतःच्या क्षमता तपासून पाहण्याची...
ही तिच संधी होती, स्वतःच्या मनगटात किती दम आहे ? हे दाखवून देण्याची...
हे तिच संधी होती, आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत हे दाखवून देण्याची 
ही तिच संधी होती, आपण काय चीज आहोत ? हे दाखवून देण्याची...

वीणा पाटील यांच्या प्रवासातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की, "आपल्या जीवनात ज्या काही वाईट घटना आपल्या सोबत घडत असतात. त्यातून नेहमी चांगलेच घडत असते. जे घडतं ते चांगल्यासाठीच ! " आपल्या सोबत घडणाऱ्या वाईट घटनांमुळे, स्वतःला सिद्ध करण्याची, आपल्या क्षमता तपासून पाहण्याची, आपण कोण आहोत ? आपण काय करू शकतोत ? हे जगाला दाखवून देण्याची संधी आपल्या मिळते. म्हणून, जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींकडे, घटनांकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघायला शिका, म्हणजे आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. 

आयुष्यातील ऐन उमेदीची 30 वर्षे केसरी साठी खर्च केल्यानंतर ही, वीणा पाटील यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. व्यवसायात आलेल्या प्रत्येक आव्हानांतून मार्ग काढत, त्यावर मात करत, त्यांनी आपला व्यवसाय उभा केला. केवळ सात वर्षातच त्यांनी शून्यातून सुरू केलेल्या कंपनीचा विस्तार साडे आठशे कोटी रुपयांपर्यंत नेला आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!



No comments: