Monday, August 3, 2020

श्री. नितीन जाधव सर - प्रश्ननिर्मितीतला 'बापमाणूस'

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *श्री. नितीन जाधव सर - प्रश्ननिर्मितीतला 'बापमाणूस'.*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही उक्ती आपण नेहमीच वापरतो. कोणतीही वस्तू काटकसरीने वापरून थोडी थोडी शिल्लक टाकली, तर काही दिवसातच तिचा मोठा साठा आपल्याकडे होतो. या उक्तीचा वापर करून अनेकांनी आपल्याकडील संपत्ती वाढविली आहे. याच उक्तीचा वापर करून सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षक श्री. नितीन जाधव सर यांनी मोठी बँक निर्माण केली आहे. ती बँक नेमकी कोणती ? हे आज आपण जाणून घेणार आहोत....

श्री. नितीन जाधव सर हे जावळी तालुक्यातील आपटी या शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली 23 वर्षे ते जावळी खोऱ्यात ज्ञानदानाचे पवित्र कार्य अतिशय तन्मयतेने करत आहेत. या 23 वर्षात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आणि ते यशस्वीही केले आहेत.

त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल पं.स.जावळी चा 2008 साली विशेष पुरस्कार आणि 2011 साली तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. शिवाय, 2019 साली जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे.

श्री. सुनिल शेडगे सर लिखित, दै. सकाळच्या ' उपक्रमशील शिक्षक ' या वैशिष्ट्यपूर्ण सदरात त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

लॉकडाऊन च्या काळात एकीकडे सर्वच 'लॉक' असताना शालेय शिक्षण मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. याच काळात श्री जाधव सर यांनी *"आजची प्रश्नमंजुषा "* हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. दररोज दहा प्रश्न. असे या उपक्रमाचे स्वरूप. त्यात पहिले 7 प्रश्न विषयांवर, 8 वा प्रश्न सातारा जिल्ह्यावर आणि उरलेले दोन प्रश्न चालू घडामोडींवर आधारित असायचे. सुरुवातीला केवळ आपली शाळा आणि केंद्र यांना डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेल्या या उपक्रमाने आधी जावळी, मग सातारा जिल्हा आणि सरतेशेवटी सारा महाराष्ट्र व्यापला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सरांची प्रश्नमंजुषा पोहचली. केवळ शालेय विद्यार्थीच नव्हे, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी ही प्रश्न मंजुषा सोडविली आहे. यावरून प्रश्नांचा दर्जा आणि या उपक्रमाची फलश्रुती लक्षात येईल.

काहींना हे 10 प्रश्न *'केवळ'* वाटत असतील. पण, कोरोना संकटात ,चेक पोस्टवर नाइट ड्युटी बजावताना, रात्री दोन वाजेपर्यत जागून त्यांनी आव्हानात्मक प्रश्न तयार केले आहेत. याची आपणास कदापि कल्पना नसेल. प्रश्नमंजुषा सोडविणारा, पटकन सोडवून बाजूला होतो. पण, निर्मात्याला मात्र असे करता येत नाही. कारण, त्यात मोठी Attachment असते. ते केवळ तोच जाणतो.

दररोज 10 प्रश्न तेही सलग 100 दिवस. तब्बल 1000 प्रश्नांची निर्मिती करूनच हा प्रवास थांबला. हा एक आगळावेगळा विक्रमच म्हणावा लागेल. एका थेंबाने सुरू झालेल्या या उपक्रमाचे रूपांतर एका मोठ्या जलाशयात झाले. एका प्रश्नाने सुरू झालेला हा प्रवास एका मोठ्या प्रश्नपेढीत रूपांतरित झाला. केवळ स्वतःपुरता सुरू झालेला हा उपक्रम साऱ्या राज्याचा झाला. *हे साध्य झाले, ते केवळ सातत्य, अखंडता  आणि नियमितता यामुळेच.*

त्यांच्या या उपक्रमाची दखल दै. सकाळ आणि रयतेचा वाली या डिजिटल शैक्षणिक दैनिकांनी घेतली आहे. शिक्षक मंच सातारा या समूहाने त्याचा मोठा प्रसार केला.

श्री.जाधव सर जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी गेली एक दशकभर प्रश्न निर्मिती करता आहेत. आजवर त्यांनी तब्बल 6000 हून अधिक दर्जेदार प्रश्नांची निर्मिती केली आहे. म्हणूनच ते प्रश्ननिर्मितीतील 'बापमाणूस' आहेत.

श्री. जाधव सर यांनी "आजची प्रश्नमंजुषा" हा उपक्रम सलग 100 दिवस उत्तमपणे राबविला. त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!!!

श्री. जाधव सरांची "आजची प्रश्नमंजुषा" हा उपक्रम आज जरी थांबला असला तरी, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना या उपक्रमाची कमतरता भासत राहील. लवकरच ते पुन्हा हा उपक्रम सुरू करतील. अशी आशा आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

धन्यवाद....

🎯 *"आजची प्रश्नमंजुषा "* साठी खालील लिंकवर क्लिक करा.


No comments: