Sunday, August 11, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत गुरूंचा महिमा - भाग - 4

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *गुरूंचा महिमा - भाग - 4*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/08/3.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/08/4.html


ऑलम्पिक पदक विजेत्या दोन बॅडमिंटनपट्टू घडविणाऱ्या बॅडमिंटनच्या द्रोणाचार्याची ही प्रेरणादायी कथा...


16 नोव्हेंबर 1973 रोजी आंध्र प्रदेश मधील नागंदल येथे एका सधन कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणी त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली. पण, त्याच्या भावाने त्याला बॅडमिंटन खेळण्यास प्रोत्साहित केले. त्याला बॅडमिंटनची आवड निर्माण झाली. 


त्याने सुरवातीचे प्रशिक्षण एस.एम.आरिफ यांचेकडून तर, प्रकाश पदुकोण आणि गांगुली प्रसाद यांचेकडून पुढील प्रशिक्षण घेतले. कठोर मेहनत अन् परिश्रम घेत त्याने स्वतःला घडविले. बॅडमिंटन मध्ये स्वतःचे नाव निर्माण केले. 


सन 1996 मध्ये त्याने पहिले राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप विजेतेपद जिंकले आणि सन 2000 पर्यंत सलग पाच वेळा विजेतेपद पटकावत इतिहास निर्माण केला. त्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा अन् देशाचा लौकिक उंचावला. 


2001 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी त्याने महाप्रतिष्ठेची ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकली. या स्पर्धेनंतर हैद्राबादला घरी परतत असताना विजयी वीरासारखं त्याचं स्वागत झालं. त्याची मिरवणूक काढण्यात आली. चारीदिशांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. पण, मिरवणुकीच्या वेळी शेजारी बसलेल्या आईला तो सतत सांगत होता, 'खूप उशीर झालाय.' 


उशीर झालाय, तो या विजेतेपदासाठी. भारताला या क्षणाची खूप वाट बघावी लागली आहे. हे चित्र बदलायचं असेल तर चांगले प्रशिक्षण वर्ग भारतात तयार करावे लागतील. या उदात्त विचारातून ध्यास घेऊन, त्याने स्वत:चा प्रशिक्षण वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला. 


2003 साली खेळातून संन्यास घेत, बॅडमिंटन प्रशिक्षण वर्गाची सुरुवात केली. अकॅडमी सुरू करण्यासाठी सरकारने जमीन दिली खरी, पण ती उभी करण्यासाठी, स्वतःचे स्वप्नं सत्यात आणण्यासाठी, त्याने स्वतःचे घर गहाण ठेवले. 


बॅडमिंटनमधील त्याने केलेली कामगिरी पाहता त्याच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आपल्या शिष्यांकडून तो कठोर मेहनत करून घेऊ लागला. स्वतः त्यांच्या कच्च्या दुव्यांवर काम करू लागला. त्याचे अनुभव बॅडमिंटनमध्ये नामांकित शिष्य घडवू लागले. 


2012 पूर्वी भारताला बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात एकही ऑलम्पिक पदक जिंकता आले नव्हते. पण, 2012 सालच्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत सायना नेहवाल ने ब्राँझपदक तर, 2016 आणि 2020 सालच्या ऑलम्पिक स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने रौप्य व कांस्यपदक पटकावले. या दोन्ही पदक विजेत्या खेळाडूंनी एकाच प्रशिक्षकाकडून बॅडमिंटनचे धडे गिरवले. तो बॅडमिंटनचा द्रोणाचार्य म्हणजेच पुलेला गोपीचंद अर्थात पी. गोपीचंद होय. 


सायना नेहवाल , पी व्ही सिंधू , साई प्रणीत , पारुपल्ली कश्यप , श्रीकांत किदंबी , अरुंधती पानतावणे , गुरुसाई दत्त आणि अरुण विष्णू यांच्यासह अनेक बॅडमिंटनपटू तयार करण्यात आणि भारताचे नाव बॅडमिंटनमध्ये उंचावर नेण्यात पी. गोपीचंद यांचा सिंहाचा वाटा आहे.


एक बॅडमिंटनपट्टू म्हणून गोपीचंद यांची कामगिरी साधारण असली तरी देखील एक बॅडमिंटनचा प्रशिक्षक म्हणून असलेले त्यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे. ऑलम्पिक मध्ये त्यांना एकदाच खेळण्याची संधी मिळाली, पण देशासाठी पदक मिळवण्यात त्यांना अपयश आले. असे असले तरी आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी देशाला बॅडमिंटनचे तीन ऑलम्पिक पदक मिळवून दिले आहेत. म्हणूनच त्यांना बॅडमिंटनचे द्रोणाचार्य संबोधले जाते. 


बॅडमिंटन मधील पी. गोपीचंद यांच्या कार्याची दखल घेत, भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच, ते एक यशवंत आहेत. 


धन्यवाद...!

No comments: