संवेदनशील बागणीकरांचे मनापासून कौतुक...!
श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023
"मानवतेची खरी ओळख ही संकटसमयी मिळालेल्या मदतीतून होते." हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे बागणीकर ग्रामस्थांनी. श्री. महावीर बुकशेटे या अंध व वयोवृद्ध व्यक्तीचा वीस वर्षांचा संघर्ष श्री. अभिजीत शेळके यांच्या एका बातमीमुळे उजेडात आला आणि त्यानंतर बागणी गावातील जनतेने जी सहानुभूतीपूर्वक आणि तातडीने मदतीची भूमिका घेतली, ती खरोखरच स्तुत्य आहे.
श्री. बुकशेटे यांच्या पत्नीचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांना 30 वर्षांचा मुलगा असून तो मतिमंद आहे. त्यांच्या घरात वीज नाही, पाणी नाही. 70 टक्के दृष्टिहीन असूनही ते दररोज पोटासाठी चिरमुरे विकतात. ही परिस्थिती वाचून अनेक बागणीकरांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. हे केवळ दान नाही, तर एका माणसासाठी जगण्याच्या आशेचा नवा किरण आहे. काहींनी जेवणाचा कायम स्वरुपी भार उचलला, कुणी आर्थिक मदत केली, तर कुणी नित्य उपयोगी साहित्य देऊन सहकार्य केले. या संवेदनशील कार्यात आमच्या जिल्हा परिषद शाळा बागणी नं. 2 च्या सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्याचा हातभार लावता आला. याचे विशेष समाधान आहे.
समस्त बागणीकरांची ही संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावना इतर गावांसाठी आदर्श ठरावी अशीच आहे. संकटात सापडलेल्या आपल्या समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या मदतीला धावून जाणं, हीच खरी ‘माणुसकीची' खरी खूण आहे. श्री. महावीर बुकशेटे यांच्यासारख्या गरजूंसाठी असा हात पुढे करणं ही आपल्या संस्कृतीतील माणुसकीची शिदोरी आहे.
श्री. अभिजीत शेळके, श्री. सागर आपटे, श्री. कीर्तीराज वंजाळे, श्री. संतोष शेळके, श्री. मुदस्सर वठारे यांच्यासोबत बागणीच्या सर्व ग्रामस्थांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि युवकांच्या पुढाकाराचे मनापासून अभिनंदन..!
ही एकजूट आणि माणुसकीची भावना असेच फुलत राहो. याच प्रामाणिक शुभेच्छा...!
धन्यवाद...!
No comments:
Post a Comment